युरोपातल्या इसिसच्या दहशतवादी कारवाया वाढतच जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 03:45 AM2017-08-30T03:45:05+5:302017-08-30T03:45:31+5:30

दोन आठवड्यांपूर्वी स्पेनमधल्या बार्सिलोनातल्या लास रॅम्बलास या हमरस्त्यावरच्या भर गर्दीत दहशतवाद्यांनी एक व्हॅन घुसवून घातपात घडवून आणला होता. बार्सिलोनापाठोपाठ दुसरा हल्ला जवळच्या कॅम्ब्रिल्स या ठिकाणी झाला.

Isis terrorist activities in Europe | युरोपातल्या इसिसच्या दहशतवादी कारवाया वाढतच जातील

युरोपातल्या इसिसच्या दहशतवादी कारवाया वाढतच जातील

Next

प्रा. दिलीप फडके,  (ज्येष्ठ विश्लेषक)
दोन आठवड्यांपूर्वी स्पेनमधल्या बार्सिलोनातल्या लास रॅम्बलास या हमरस्त्यावरच्या भर गर्दीत दहशतवाद्यांनी एक व्हॅन घुसवून घातपात घडवून आणला होता. बार्सिलोनापाठोपाठ दुसरा हल्ला जवळच्या कॅम्ब्रिल्स या ठिकाणी झाला. बार्सिलोनात खूप मोठा घातपात घडवावयाचा त्या अतिरेक्यांचा इरादा होता. या दहशतवाद्यांनी एलकनार शहरात स्फोटके साठवली होती. त्याच्या स्फोटात एक घर उद्ध्वस्त झाले व त्यात एक जण ठार झाला. बॉम्ब तयार करण्याच्या नादात हा स्फोट झाला. पाठोपाठ फिनलँडच्या टुर्कू शहरात एका व्यक्तीने अनेकांवर चाकूहल्ला केला. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठहून अधिक जखमी झाले. जर्मनीतील वुप्पेर्टल शहरात एकाची भोसकून हत्या करण्यात आली. पाठोपाठ मागच्याच आठवड्यात ब्रुसेल्समध्ये सैनिकांवर चाकूहल्ला करणाºया दहशतवाद्याचा खातमा केला गेला. यावर्षीच्या जूनमध्ये ब्रुसेल्सचा झालेला स्फोट ताजा असतानाच हा दुसरा हल्ला झालेला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये युरोपातल्या अनेक देशांमध्ये होत असलेल्या घातपाती कारवायांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. डेली मेलमध्ये इसोबेल फ्रोड्शाम यांनी दहशतवादाची दोन वर्षे या वार्तापत्रात याचा सविस्तर आढावा घेतला आहे. या काळात पश्चिम युरोपातल्या देशांमध्ये १६ मोठे दहशतवादी हल्ले झाले आणि त्यात जवळपास साडेतीनशेपेक्षा जास्त निरपराध नागरिकांचा बळी गेला असा आढावा त्यांनी मांडला आहे. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, स्पेन, बेल्जियम हे देश हल्लेखोरांच्या कारवायांचे मोठ्या प्रमाणावर लक्ष झाले आहेत, हे त्यांनी नमूद केले आहे. यातल्या प्रत्येक घटनेत जिहादींनी अतिशय क्रूरपणाने आणि निर्दयीपणाने हल्ले केले होते. सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण व्हावी हा या मागचा उद्देश असला तरी सामान्य लोकांनी अशा हल्ल्यांनी घाबरून न जाता आपले दररोजचे व्यवहार सुरू ठेवलेले आहेत आणि अशा हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांबद्दल सहानुभूती व्यक्त होते आहे. त्यांना मदत करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत याचा मुद्दाम उल्लेख केला आहे. लोकांच्या मनातल्या या भावनेचे प्रकटीकरण करण्यासाठी चार दिवसांपूर्वी बार्सिलोनाच्या रस्त्यांवरून जवळपास पाच लाख लोकांचा एक मोर्चाच काढला गेला. बार्सिलोनाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या वा जखमी झालेल्यांमध्ये ३४ देशांमधल्या लोकांचा समावेश होता. साहजिकच त्या हल्ल्याचे पडसाद सगळ्या जगात उमटणे क्रमप्राप्तच होते. लहानशा गावातल्या डझनभर अतिरेक्यांनी हा कट कशारीतीने रचला आणि अमलात आणला याची माहिती वॉशिंग्टन पोस्टमध्ये सौंद मेखेंनत आणि विल्यम बूथ यांनी दिलेली आहे. युनूस अबुयाकुब या २२ वर्षांच्या मोरोक्कोमध्ये जन्म झालेल्या तरुणाने ती व्हॅन चालवली होती. पायी चालणाºया लोकांच्या अंगावर ती गाडी घातल्यावर तो फरार झाला अशी बातमी होती. नंतर त्याला पोलिसांनी मारल्याच्या बातम्यादेखील आल्या आहेत. पण हे सगळे तरुण एका इमामाच्या प्रभावाखाली होते आणि कट्टरतावादी विचारांनी पछाडलेले होते अशी माहिती त्यातून मिळते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे सगळे मोरोक्कोमधून आलेले आहेत. याचा अर्थ उघड आहे. मध्यंतरी मध्य आशियामधून युरोपातल्या अनेक देशांमध्ये जे स्थलांतरित निर्वासित आले आहेत त्यांच्या प्रभावामुळे तिथल्या दहशतवादी घटना वाढलेल्या आहेत. यातला कट्टरतावादी इस्लामी प्रभाव सहज लक्षात येण्यासारखा आहे. रॉयटर्सच्या स्तंभलेखिका फातिमा भोजानी यांनी लिहिलेल्या वार्तापत्रात स्वत:च्या मूळच्या प्रदेशात हार होऊनसुद्धा इस्लामी स्टेटचे हल्ले कसे वाढत आहेत याचा आढावा घेतलेला आहे. मागच्या एका वर्षात जगभरात इसिसने १४००हून जास्त दहशतवादी हल्ले केले आणि त्यात सात हजारांहून जास्त लोक मारले गेलेले आहेत. २०१५ च्या तुलनेने इसिसच्या दहशतवादी कारवायांमध्ये २० टक्के वाढ झालेली आहे. जगभरातल्या एकूण सगळ्या दहशतवादी कारवाया जवळपास दहा टक्क्यांनी कमी होत असताना इसिसच्या दहशतवादी कारवायांमध्ये झालेली ही वाढ विशेष चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. लहान गटांच्या किंवा एकट्यादुकट्या अतिरेक्याच्या माध्यमातून अशा कारवाया घडवण्याचे एक नवे तंत्र यात पहायला मिळते आहे याचा उल्लेख देखील त्यांनी केलेला आहे. तुम्हाला अद्ययावत स्फोटके, बॉम्ब किंवा बंदुकीच्या गोळ्या मिळाल्या नाहीत तर दिसेल त्याचा हत्यार म्हणून वापर करा. अगदी एखाद्या श्रद्धावान नसणाºया (म्हणजेच इस्लामेतर) अमेरिकन किंवा फ्रेंच माणसाचे डोके दगडाने ठेचा किंवा त्यांच्या अंगावर तुमची गाडी घाला असे इसिसचा प्रवक्ता असणाºया अबू महंमद अल अदनानी याने तीन वर्षांपूर्वीच सांगितलेले होते. अबू जरी हवाई हल्ल्यात मारला गेलेला असला तरी त्याचा उपदेश त्याच्या तरुण अतिरेकी दहशतवाद्यांनी अमलात आणलेला आहे हे नक्की. इसिसच्या रुमिया या प्रकाशनात अतिरेकी दहशतवादी हल्ले कसे करावेत याचे सविस्तर मार्गदर्शन केले जाते, याचा उल्लेख देखील फातिमा भोजानी यांनी केलेला आहे. रुमियाचे हे अंक पीडीएफ फॉर्ममध्ये कुणालाही इंटरनेटवर सहजतेने उपलब्ध आहेत हे विशेष आहे. रुमियाच्या जून-जुलैच्या अंकात जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये इसिसच्या विचारांनी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा देशवार अहवालच वाचायला मिळतो आहे. न्यूयॉर्क टाइम्सने या विषयावर लिहिलेल्या आपल्या संपादकीयात या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या काही प्रश्नांचा विचार केला आहे. काही धर्मवेड्या अतिरेकी तरुणांच्या अशा दहशतवादी कारवाया बंद करता येणार नाहीत हे निखळ सत्य आहे. असे हल्ले करण्यासाठी जागतिकस्तरावरचे नेटवर्क लागत नाही. बार्सिलोनात आणि त्याच्या आधी रोम, लंडन, नाईस, स्टॉकहोम अशा अनेक ठिकाणी हे दिसले आहे.
मानवाधिकार, सहिष्णुता, अल्पसंख्याकांचे अधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या पद्धती मानणाºया समाजात आपण याचा सामना कसा करतो हा खरा प्रश्न आहे. दहशतवादाचा यशस्वीपणाने सामना करण्यासाठी आपापसात एकोपा राखत सर्व प्रयत्नांमध्ये जागरुकतेने पोलीस व प्रशासन यंत्रणेशी संपूर्ण सहकार्य करणे आणि लोकशाही, स्वातंत्र्य आणि जनतेचे अधिकार यांना प्राधान्य देण्याच्या आपल्या जीवनमूल्यांवर निष्ठा ठेवणे हाच अशा घटनांना सामोरे जाण्याचा योग्य मार्ग आहे असे स्पेनचे पंतप्रधान मारीयानो रजोय यांनी यावर जे सांगितले आहे तेच योग्य आहे असा सूर टाइम्सच्या संपादकीयात सापडतो आहे. तो नक्कीच चुकीचा नाही. परवाचा ब्रुसेल्समधला हल्ला देखील याच इसिसच्या दहशतवादी कारवायांचाच एक भाग होता. थॉमस डिसिल्व्हा रोझा या पत्रकाराने त्या हल्ल्याची जी माहिती दिलेली आहे त्यात हल्लेखोराने इस्लामशी संबंधित घोषणा देत हल्ला केला होता असे सांगितलेले आहे. पहिला हल्ला अयशस्वी झाल्यावर दुसºया हल्ल्याची संधी मिळण्यापूर्वीच त्याला टिपण्यात आले. यापुढच्या काळात युरोपातल्या इसिसच्या दहशतवादी कारवाया वाढतच जातील असेच दिसते आहे.

Web Title: Isis terrorist activities in Europe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.