भारताचा चमकता व कमवता तारा ‘इस्रो’!

By विजय दर्डा | Published: September 24, 2018 11:54 PM2018-09-24T23:54:17+5:302018-09-25T00:09:53+5:30

आपण जे चित्र पाहत आहात ते एप्रिल १९७५ मधील आहे. तेव्हा अग्निबाणाचे सुटे भाग सायकलवरून आणि ‘आर्यभट्ट’ या भारताच्या पहिल्या उपग्रहास बैलगाडीतून प्रक्षेपण स्थळावर नेण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत भारताने अंतराळ संशोधन क्षेत्रात प्रदीर्घ आणि अभूतपूर्व वाटचाल केली आहे.

ISRO : India's shining and earning star | भारताचा चमकता व कमवता तारा ‘इस्रो’!

भारताचा चमकता व कमवता तारा ‘इस्रो’!

Next

- विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड, लोकमत समूह)

स्तंभासोबत आपण जे चित्र पाहत आहात ते एप्रिल १९७५ मधील आहे. तेव्हा अग्निबाणाचे सुटे भाग सायकलवरून आणि ‘आर्यभट्ट’ या भारताच्या पहिल्या उपग्रहास बैलगाडीतून प्रक्षेपण स्थळावर नेण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत भारताने अंतराळ संशोधन क्षेत्रात प्रदीर्घ आणि अभूतपूर्व वाटचाल केली आहे. अंतराळात आपला झेंडा फडकविणाऱ्या जगातील मोजक्या देशांत आता भारताचा समावेश होतो. यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या (इस्रो) वैज्ञानिकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. ‘इस्रो’ची औपचारिक स्थापना १५ आॅगस्ट १९६९ रोजी झाली. पण भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे पितामह डॉ. विक्रम साराभाई यांनी ‘इस्रो’ च्या स्थापनेची तयारी १९६३ पासूनच सुरू केली होती. तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी डॉ. साराभाई यांच्यावर ही जबाबदारी सोपविली होती.
दुर्दैवाने डॉ. साराभाई यांचे नेतृत्व ‘इस्रो’ला फार काळ मिळू शकले नाही. परंतु त्यांच्यानंतरही प्रो. सतीश धवन, प्रो. उडुपी रामचंद्र राव, प्रो. यू.आर. राव,
जी. माधवन नायर या माजी आणि के. सिवान या विद्यमान अध्यक्षांनी ‘इस्रो’ला उत्तुंग शिखरावर नेले.
ते अभिमानास्पद आहे. इंदिरा गांधी व अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह सर्वच पंतप्रधानांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमास मनापासून पाठिंबा दिला, त्यामुळे या यशात त्यांचाही वाटा नक्कीच आहे. आज अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी जगातील अनेक देश भारताची मदत घेतात. यावरून आपले कसब व गुणवत्ता दिसून येते. उपग्रह प्रक्षेपणाच्या बाजारपेठेत ४१ टक्के वाटा असलेल्या अमेरिकेचा आजही वरचष्मा असला तरी भारतानेही चार टक्के बाजारपेठ काबीज केली आहे. आपला उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च इतरांच्या तुलनेत कमी असल्याने ‘इस्रो’ याहून मोठी झेप घेईल, यात शंका नाही. तुलनाच करून सांगायचे तर अमेरिकेला जे काम करायला ६६ रुपये लागतात तेच काम भारत एक रुपयात करत आहे. रशियाचे उपग्रह प्रक्षेपणही कमी खर्चाचे असले तरी ते आपल्या तुलनेत चारपट महाग आहे. यात गुणवत्तेसोबत श्रीहरीकोटा या ‘इस्रो’च्या प्रक्षेपण स्थळाचेही महत्त्व आहे. ‘ग्लोबल पोझिशनिंग’च्या दृष्टीने श्रीहरीकोटा एक आदर्श ठिकाण आहे. म्हणूनच जगातील अनेक देश आपले उपग्रह भारताकडून सोडून घेऊ इच्छितात. भारतावरील विश्वास वेगाने दुणावत आहे. गेल्या वर्षी १५ फेब्रुवारीस एकाच वेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडण्याचा नवा विक्रम करून भारताने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. त्याआधी रशियाने २०१४ मध्ये एका वेळी ३७ उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते.
‘इस्रो’ची गुणवत्ता व क्षमता आकडेवारीवरूनही स्पष्ट होते. ‘इस्रो’ने आतापर्यंत २८ हून जास्त देशांचे २३९ उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले आहेत. नक्की आकडेवारी उपलब्ध नसली तरी आतापर्यंत उपग्रह प्रक्षेपणातून ‘इस्रो’ने ५,६०० कोटी रुपयांची कमाई केली असावी, असा अंदाज आहे. म्हणजेच ‘इस्रो’ हा पोसावा लागणारा पांढरा हत्ती न राहता आता ती एक कमावती संस्था झाली आहे. सध्या जगभरातील उपग्रह प्रक्षेपणाची बाजारपेठ १३ लाख कोटी रुपयांची आहे. लवकरच ‘इस्रो’ या बाजारपेठेतील मोठा हिस्सा काबीज करेल, यात शंका नाही.
गुणवत्तेच्या बाबतीत ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी खरोखरीच कमाल केली आहे. जेव्हा जगातील कोणताही देश आपल्याला तंत्रज्ञान पुरवायला तयार नव्हता तेव्हा हताश न होता आपल्या वैज्ञानिकांनी आत्मविश्वाने स्वत:चे तंत्रज्ञान विकसित केले. त्यामुळेच भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम पूर्णपण स्वदेशी असल्याचे आपण अभिमानाने म्हणू शकतो. अत्यंत कमी खर्चात आपण ‘मंगळयान’ मोहीम फत्ते केली तेव्हा जग अचंबित झाले. पृथ्वीपासून मंगळाचे अंतर ६७ कोटी किमी आहे. तेथपर्यंत यान पाठवायला ‘इस्रो’ला फक्त ४५० कोटी रुपये खर्च आला. म्हणजे प्रति किमी खर्च झाला फक्त ६ रुपये ७१ पैसे. अमेरिकेच्या ‘नासा’च्या तुलनेत हा खर्च दसपटीने कमी आहे. एवढ्या कमी खर्चात अशी अंतराळ मोहीम राबविण्याची क्षमता जगातील अन्य कोणत्याही देशाकडे नाही. ‘चांद्रयान-१’च्या यशानंतर आता भारत ‘चांद्रयान-२’ची भरारी घेण्याच्या बेतात आहे. एवढेच नव्हे तर सन २०२२ मध्ये भारताचा एखादा सुपुत्र किंवा सुकन्या देशी यानातून अंतराळात झेपावेल, अशी घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक होते, हे खरे. पण ते ज्या ‘सोयूझ’ अंतराळ यानातून गेले ते सोव्हियत संघाचे होते. अंतराळात माणसाला पाठविण्याचे तंत्र आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया व चीन या तीनच देशांकडे आहे. भारतही लवकरच त्यांच्या पंक्तीत मानाचे स्थान पटकावेल. येत्या काही वर्षांत ‘इस्रो’ चंद्रावरही भारतीय अंतराळवीराला उतरविण्याची मजल मारेल, अशी संपूर्ण देशाला खात्री आहे.
पुढील वर्षी ‘इस्रो’ला ५० वर्षे पूर्ण होतील. या चमकत्या ताºयाने भारताची मान ताठ केली आहे.

Web Title: ISRO : India's shining and earning star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.