मुद्दा ‘लास्ट नेम’चा आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 04:10 AM2018-02-24T04:10:57+5:302018-02-24T04:10:57+5:30
तू मायदेश सोडून अचानक असा निघून गेलास म्हणून आम्हास थोडे वाईट वाटले. तू बँकांचे पैसे बुडवून गेला आणि आता ते पैसे आम्हाला भरावे लागणार हे त्यामागचे कारण आहे
प्रिय नीरव मोदी,
स.न.वि.वि.
तू मायदेश सोडून अचानक असा निघून गेलास म्हणून आम्हास थोडे वाईट वाटले. तू बँकांचे पैसे बुडवून गेला आणि आता ते पैसे आम्हाला भरावे लागणार हे त्यामागचे कारण आहे, असे तू मुळीच समजू नको. अशी परतफेड करण्याची तर आम्हा लोकांना हर्षद मेहतापासूनच सवयच लागली आहे. मला वाटते हर्षदचे लोन क्लियर झाले असावे. मल्ल्याचेही बरेच फेडून झाले. आता तुझ्या कर्जाचा ईएमआय सुरू होईल. घाबरु नको तेही आम्ही हळूहळू फेडूनच टाकू. आम्हा भारतीयांचे (सॉरी, तुला आता आम्ही भारतीय म्हणू शकत नाही, कारण तुला ठाऊकच आहे.) एक बरे आहे. आमची लोकसंख्या मोठी असल्यामुळे तुझ्या कर्जाचा ईएमआय फारसा येणार नाही. आणखी एक सांगतो, तुझ्या या बेकायदेशीर कर्जाची फेड आम्ही अगदी कायदेशीर मार्गाने करणार आहोत. त्यासाठी जीएसटी, आयकर, स्वच्छता कर सारख्या योजना आमच्याकडे आहेतच. त्यातूनही भागत नसेल तर तुझी करबुडवेगिरी राष्टÑीय आपत्ती मानून ‘आपत्ती कर’ही सरकार लावू शकते.
तेव्हा आमच्या वाईट वाटण्याचे खरं कारण काय, हे तू जाणून घे! ते कारण आहे तुझे ‘लास्ट नेम’. हे लास्ट नेम आज आमच्या देशाचे नाक आहे. त्या नाकावर टिच्चून तू हा घोटाळा केला आहेस. तू म्हणशील यापूर्वी ललित मोदीने तर दिवे लावले आहेत. तेव्हा नाही आठवले लास्ट नेम...! तर माझ्या मित्रा एक लक्षात घे. हा ललित नावाचा प्राणी जेव्हा घोटाळा करून विदेशात पळून गेला तेव्हा नरेंद्र दामोदर मोदी हे पंतप्रधान नव्हते.
आपल्या अडनावाच्या माणसाने असा घोळ करून पलायन करावे याचा घोर पीएम साहेबांना लागला आहे. ते इतके व्यथित आहेत की, ‘मन की बात’मध्येही ते मनातलं सांगू शकत नाहीत.
तेव्हा तू त्यांची व्यथा लक्षात घेऊन काय ते ठरव. तसंही त्यांनी ‘बॅकचॅनेल’ की काय म्हणतात, त्या माध्यमातून तुला भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत म्हणे. शेवटी २०१९ च्या निवडणुकीचा सवाल आहे.
बरं ते जाऊ दे. काही काळासाठी का होईना तू इकडे निघून ये. आम्हालाही तुझ्याकडून काही टीप्स घ्यायच्या आहेत. विशेषकरून बँकवाल्यांना कसे हॅण्डल करायचे हे समजून घ्यायचे आहे. त्या लेटर आॅफ अंडरस्टँडिगमध्ये कसे ‘अंडरस्टँडिग’ करायचे हेही जाणून घ्यायचे आहे. आम्ही साधं पाचपन्नास हजाराच्या कर्जासाठी बँकेत गेलो तरी एखादा भिकारी दारात आल्यासारखी त्यांची वागणूक असते. आज साहेब नाही, उद्या या. लंचटाईम आहे, दिसत नाही का? अशी उत्तरं आम्हा पामरांना मिळतात. त्याचजागी तुमच्यासारखी मंडळी येते तेव्हा लाल पायघड्या अंथरल्या जातात. लंच टाईम तर सोडाच डिनरलाही ते तुमच्यासोबत असतात. कोट्यवधीचे लेटर आॅफ अंडरस्टँडिग देण्यासाठी त्यांना साहेबाचीही गरज भासत नाही. हे पाहून कधीकधी वाटते ह्या बँका सार्वजनिक क्षेत्रातल्या नसून तुमची खासगी मालमत्ता आहे. म्हणजे बँका तुमच्याच, कर्ज घेणारे तुम्हीच आणि ते बुडविणारेही तुम्हीच. शेवटचा कर्ज फेडण्याचा रोल आहे तो मात्र सार्वजनिक क्षेत्राला अर्थात आम्हाला दिला.
वाह! बहुत खूब !!
-दिलीप तिखिले