स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नाची काळी तीट मोदींच्या कार्यपद्धतीला लागलीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 02:35 AM2020-05-02T02:35:01+5:302020-05-02T06:43:15+5:30
२०१५ साली एका परिसंवादात बोलताना मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी तर इशाराच दिला होता की भविष्यात जगाला महायुद्धाचा नव्हे तर विषाणूच्या संसर्गाचा धोका संभवतो.
कोरोनाची पावले ओळखण्यात जगभरातल्या धोरणकर्त्यांना अपयश आले तर आपत्तीच्या काळात राजकीय नेतृत्त्वाचा ठिसुळपणा समोर आला. मानवजातीला दिलासा देण्यात प्रज्ञा आणि कर्तृत्व अपुरे पडते आहे. कोरोनाच्या संसर्गाखाली आलेल्यांच्या संख्येने तीस लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मृतांची संख्या सात लाखांना भिडण्याच्या बेतात आहे. अशावेळी राहून राहून एक प्रश्न अस्वस्थ करतोय, अशा अगतिक अवस्थेपर्यंत मानवजात का यावी? कोरोनाचे संकट अनपेक्षित निश्चितच नव्हते. सार्स, मर्स, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, ईबोला या याआधीच्या विषाणूजन्य रोगांनी मानवतेपुढे काय वाढून ठेवलेय, याची स्पष्ट कल्पना दिली होती. २०१५ साली एका परिसंवादात बोलताना मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी तर इशाराच दिला होता की भविष्यात जगाला महायुद्धाचा नव्हे तर विषाणूच्या संसर्गाचा धोका संभवतो. जगाने अशा अनेक धोक्याच्या सूचनांकडे सातत्याने दुर्लक्ष केले. त्यातही गेल्या दशकभरात जगभरातून समोर आलेले राजकीय नेतृत्वही कमअस्सल निघाले आहे. सामरिक ताकद आणि सुबत्ता यामुळे अमेरिकेकडे जगाचे स्वाभाविक नेतृत्व होते. त्या देशाचे सुकाणू आज डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या विक्षिप्त व वाचाळ व्यक्तीकडे आहे. कोरोनाच्या कहरात देश होरपळत असताना ट्रंप आपले अपयश लपवण्यासाठी चीनच्या नावाने बोटे मोडत आहेत, त्या देशाच्या नेतृत्त्वाला सरळ सरळ धमक्या देत आहेत. संसर्गाचा अंदाज ट्रंप आणि त्यांच्या कलाने घेणाऱ्या अमेरिकी तज्ज्ञाना आला नाही. कोरोना अमेरिकेपर्यंत येणार नाही, याच भ्रमात तिथले प्रशासन राहीले. परिणामी आज अमेरिकेला फेस मास्कसारख्या क्षुल्लक वस्तंूसाठी चीनसह अन्य देशांच्या तोंडाकडे पाहावे लागते आहे. गेल्या दशकभरातील अमेरिकेच्या नेतृत्वाची कर्तव्यतत्परता अधोरेखित करण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. असे नेतृत्व जगाला काय दिशा दाखवणार? अमेरिकेची जागा घेण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाºया चीनने तर कोरोनाचा उद्रेक होत असताना कोंबडे झाकून पहाटेला उगवण्यापासून रोखायचा मूर्खपणा केला.
माहितीचा अचूक प्रसार त्या देशाने वेळीच केला असता तर जगाला किमान सावरायला वेळ मिळाला असता. जिवंत प्राण्यांच्या बाजारपेठा भरवणाºया चीनमुळे जगाला संसर्गाचा धोका संभवतो हे याआधीच्या कोरोनाच्या अवतारांनी सिद्ध केले असतानाही त्या देशातील कम्युनिस्ट नेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष केले. माणसे आणि माहितीचे दमन म्हणजेच प्रशासकीय कर्तृत्व अशी धारणा असलेल्या चीनी नेतृत्वाची काळी बाजू कोविड-१९ने उघडी पाडली. युरोपमध्ये तर सध्या आत्यंतिक उजव्या विचारांनी धुमाकूळ घालत सत्तेवर मांड बसवलीय. आपल्या देशांच्या भौगोलिक सीमांपलीकडे पाहाण्याची बौद्धिक क्षमता या देशांतील नेतृत्वाकडे असल्याचे आजवर तरी दिसलेले नाही. जर्मनीच्या अँजेला मर्केल यांच्याकडून बºयाच अपेक्षा होत्या; पण त्या आता राजकीय संधीकालात ढकलल्या गेल्या आहेत. इंग्लंडचे बोरीस जॉन्सन किंवा फ्रान्सचे इमान्युएल मॅक्रॉन यांचा उथळपणा कोविड-१९मुळे जगाला कळला. रशियाचे व्लादिमीर पुतीन आपल्याभोवती असलेले संदिग्धतेचे आणि संशयाचे वलय त्यागण्याच्या मन:स्थितीत आताही नाहीत.
कोणे एकेकाळी ‘तिस-या’ जगातून दमदार नेतृत्व उभे राहाताना दिसायचे. आता तेथेही निराशाच होते आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी कोरोनाबाबत समयोचित निर्णय घेतले; तरी स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नाची काळी तीट त्यांच्या कार्यपद्धतीला लागलीच. प्रबळ नेतृत्वाचा अभाव एकंदर व्यवस्थेतील शैथिल्यात परावर्तीत होतो. ज्यांच्याकडे जगाला आपत्तींपासून वाचवण्यासाठी धोरणे आखण्याचे आणि त्यांना कार्यान्वित करण्याचे काम असते ते तज्ज्ञ व जाणकार केवळ चर्चा आणि पोकळ भाकितांपुरतेच मर्यादित राहातात. विषाणूचा हल्ला अपेक्षित होता अशी सारवासारव करणारी पण त्याच्या पारिपत्त्यासाठी उपाययोजना सुचवण्यास अपयशी ठरलेली देशोदेशीच्या धोरणकर्त्यांची विचारपेढी (थिंक टँक्स) ही प्रज्ञेच्या अभावाने ग्रासलेल्या समाजव्यवस्थेची निर्मिती आहे. काळाची पावले ओळखू न शकलेल्या या तथाकथीत तज्ज्ञांचे अपयश आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठीची राजकीय नेतृत्त्वाची गेल्या दशकभरातली धडपड यांचा परिपाक म्हणजेच कोविड-१९चे तुर्ताचे थैमान.