बांगलादेशमुक्तीचे ते १३ दिवस
By admin | Published: December 17, 2014 12:30 AM2014-12-17T00:30:51+5:302014-12-17T00:30:51+5:30
दिल्लीत २८ एप्रिल १९७१ रोजी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, पूर्व पाकिस्तानवर आक्रमण करण्याचा.
सारंग थत्ते,सेवानिवृत्त कर्नल -
दिल्लीत २८ एप्रिल १९७१ रोजी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, पूर्व पाकिस्तानवर आक्रमण करण्याचा. त्या वेळी लष्करप्रमुख असलेले जनरल सॅम माणेकशा या आक्रमणाला तयार नव्हते. त्यांनी लष्कराची वास्तविक स्थिती पंतप्रधान इंदिरा गांधींसमोर मांडली. त्यांच्या बोलण्यात तथ्य होते; पण त्यांनी ज्या पद्धतीने इंदिरा गांधींना वस्तुस्थिती सांगितली, ती इंदिरा गांधींना आवडली नाही. त्यांनी कॅबिनेटची मिटिंग बरखास्त करून, माणेकशा यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. पंतप्रधान आणि जनरल यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. इंदिराजींनी पूर्व पाकिस्तानवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्याची अंमलबजावणी करण्याचे कुणी टाळणार नाही, असेच सर्वांना वाटत होते; पण माणेकशा यांनी लष्कराची वास्तव स्थिती इंदिराजींसमोर मांडली. भारताकडे त्या वेळी एकच आर्मड् डिव्हिजन सैन्य होते. याशिवाय केवळ १८ रणगाडे होते. एवढ्या सैन्यासह पूर्व व पश्चिम दोन्ही आघाड्यांवर लढणे शक्य होणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल याह्याखान यांनी ‘‘लाल करदो धरतीको बांगलादेशीके खून से’’ असा निर्णय जाहीर केला होता. त्या दृष्टीने सैन्याने कारवाई सुरू करताच, लाखो बांगलादेशी स्वत:चे प्राण वाचविण्यासाठी भारतात दाखल झाले होते. निर्वासितांचा बोजा वाढत होता. हे युद्ध थांबावे यासाठी इंदिरा गांधींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी त्यांनी अनेक राष्ट्रांचे दौरे करून, तेथील राष्ट्रप्रमुखांना वस्तुस्थिती समजावून सांगितली.
दुसरीकडे सॅम माणेकशा यांचे म्हणणे होते, की भारतीय लष्कर कमजोर स्थितीत आहे. याशिवाय येणाऱ्या पावसाळ्यात भारतातून बांगलादेशमध्ये जाणाऱ्या नद्यांना पूर येतात. या पुरामुळे लष्कराला हालचाल करणे कठीण होईल, असेही त्यांना वाटत होते. चीनच्या आक्रमणाच्या वेळी भारतीय सैन्याला पराभव पत्करावा लागला होता. तशी स्थिती याहीवेळी येऊ शकते जी भारताला परवडणारी नाही असेही माणेकशा यांना वाटत होते. त्यामुळे पूर्व पाकिस्तानवर आक्रमण केव्हा करायचे ही बाब लष्करावर सोपवा, असे त्यांनी इंदिरा गांधींना सांगितले. या तऱ्हेचा निर्णय जनरल माणेकशा यांच्यासारखा कर्मठ सेनापतीच घेऊ शकत होता. आक्रमण करण्यासाठी लष्करावर दबाव येऊ शकतो याची त्यांना जाणीव होती; पण त्यावेळचे सेनापती निर्भीड आणि सक्षम होते. त्यांनी आपल्या परिपक्व नेतृत्वाची ओळख करून दिली. इंदिराजींचा आपल्या जनरलच्या बुद्धिमत्तेवर विश्वास होता. त्यांची स्वत:ची दूरदृष्टी आणि सेनापतींवर असलेल्या विश्वासातून पाकिस्तानशी झालेल्या या लढाईने नवा इतिहास लिहिला गेला.
एप्रिल ते नोव्हेंबर १९७१ या काळात भारतीय लष्कराने अत्यंत गोपनीय हालचाली करून, लष्करात असलेल्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न केला. लष्करासाठी आवश्यक असलेले रणगाडे रशियाकडून मागविण्यात आले. सैन्याचे नूतनीकरण करण्यात आले. पूर्वेकडील भागात रस्ते बांधणीचे काम युद्धस्तरावर हाती घेण्यात आले. नवीन सैन्यभरती वेगाने सुरू झाली. सेनाधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या. पूर्वेकडील नद्यांवर पूल बांधण्यात आले. लष्करातील कमांडर्सना हवाई दलाचे संरक्षण मिळण्याची पुरेपूर व्यवस्था करण्यात आली. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही सीमांवर सैन्य तैनात करण्यात आले. आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी पश्चिम आघाडीवर योग्यतऱ्हेची सैन्यरचना करण्यात आली. पूर्वेकडची जबाबदारी मेजर जनरल जेकब यांच्याकडे सोपविण्यात आली. पूर्व पाकिस्तानात पाकिस्तानी लष्कराला टाळून सरळ ढाक्यावर आक्रमण करण्याची योजना तयार करण्यात आली. नौदलाने पश्चिमेकडे कराची बंदराभोवती वेढा घातला, तर पूर्वेकडे बंगालच्या उपसागरातही नौसेनेची जहाजे उभी करण्यात आली. याचवेळी भारतात आश्रयासाठी आलेल्या बांगलादेशी तरुणांना शस्त्रे हाताळण्याचे शिक्षण देऊन ६०,००० युवकांची मुक्तिवाहिनी निर्माण करण्यात आली.
सहा महिन्यांच्या काळात सर्व दलांचा समन्वय साधून लष्करी उत्पादन करणारे कारखाने २४ तास सुरू ठेवण्यात आले. तीनही सेनादलात समन्वय साधण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात आली. तसेच, आक्रमणाची योजना आखण्यात आली. सहा महिन्यांत लष्कराची सिद्धता करणे कठीण काम होते; पण कुशल सेनापतीच्या नेतृत्वाखाली सैन्याने हे काम अत्यंत परिश्रमपूर्वक साध्य केले. भारतीय सैन्याच्या इतिहासातील हा सर्वांत चांगला काळ होता!
मुक्तिवाहिनीला बांगलादेशचा भूगोल ज्ञात होता. त्यांनी भारतीय हद्दीतून बांगला देशमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक मोर्चांवर आघाड्या उघडल्या. लष्कराच्या योजनेत मुक्तिवाहिनीचे स्वतंत्र स्थान होते. पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सैन्याचे नेतृत्व जनरल नियाझींकडे होते. वेगवेगळ्या आघाड्यांवरून मुक्तिवाहिनीचे लोक बांगलादेशच्या हद्दीत शिरू लागले तेव्हा ते स्वत:च्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी आले असावेत, या समजुतीने जन. नियाझी यांनी सर्व आाघड्यांवर पाकिस्तानी लष्कर तैनात केले. भारतीय लष्कराचे डावपेच नियाझींना समजले नाहीत. पाकिस्तानचे लष्कर निरनिराळ्या आघाड्यांवर विखुरल्यामुळे भारताचे जनरल जेकब यांनी ३००० सैन्यांसह सरळ ढाक्यावर हल्ला चढविला. भारताचा डाव लक्षात आल्यावर जन. याह्याखान यांनी पश्चिम पाकिस्तानातून भारतावर हल्ला लढविला. भारताच्या ११ लष्करी विमानतळावर जोरदार बॉम्बहल्ले चढविले. मग मात्र भारताने १९ डिव्हिजन सैन्य लढाईत उतरविले. एवढ्या संख्येने भारतीय लष्कर प्रथमच युद्धात उतरविण्यात आले होते. या वेळी पाकिस्तानचे ४२००० सैनिक पूर्व पाकिस्तानात होते; पण त्यांचे वायुदल दुबळे होते. कारण पश्चिम आघाडीवर ते सगळे तैनात केले होते! उलट भारतीय सैन्याला वायुदलाचे छत्र लाभल्यामुळे सैन्याला ढाक्क्याचा वेढा घट्ट करणे सोपे गेले. सैन्याने मेघना, पद्मा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांवर पूल बांधल्यामुळे सैन्याच्या हालचाली सुलभ झाल्या. या युद्धात हवाई दलाने आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित केले. त्यामुळे एक पॅरा ब्रिगेड पॅराशूटच्या साहाय्याने बांगलादेशच्या भूमीवर उतरविणे शक्य झाले. याशिवाय नौदलाने विमानवाहू नौका विक्रांत बंगालच्या उपसागरात बाह्य हस्तक्षेप रोखण्यासाठी सज्ज ठेवलीे होती. नौदलाने कराचीवर हल्ला करून पाकिस्तानचे तेलाचे साठे उद्ध्वस्त केले; तसेच त्याची काही जहाजे नष्ट केली. या लढाईत पाकिस्तानची पाणबुडी गजनीही बुडविण्यात आली. १६ डिसेंबर १९७१ रोजी पूर्व पाकिस्तानी जनरल ए.ए.के. नियाझी यांनी आपल्या ९३००० सेनेसह भारतीय लष्करासमोर शरणागती पत्करली. जगाच्या सैनिकी इतिहासात इतक्या कमी अवधीत युद्ध जिंकण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. भारताने युद्धकौशल्यात पाकिस्तानला पराभूत केले होते. या लढाईतून नवे राष्ट्र जन्माला आले- बांगलादेश. या युद्धात तेथील नागरिकांनी चांगले सहकार्य केले. १९७१ चे हे युद्ध भारतीय लष्कराच्या कुशल नेतृत्वामुळे जिंकले गेले. इंदिरा गांधी आणि जनरल माणेकशा यांच्यातील समन्वयामुळेच हे शक्य झाले. सर्व सेनादलांनी एकदिलाने काम केल्यामुळेच हा विजय शक्य झाला होता.