‘विद्रोहा’ची मशागत करणे महत्त्वाचे आहे, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 05:47 AM2021-12-04T05:47:21+5:302021-12-04T05:48:07+5:30

आज, शनिवारपासून नाशिक येथे विद्रोही साहित्य संमेलनाचा प्रारंभ होत आहे. ‘माणूस’पणाच्या मूल्याशी विद्रोहाचे नाते काय असते, यावरील टिपण !

It is important to cultivate ‘rebellion’, because ... | ‘विद्रोहा’ची मशागत करणे महत्त्वाचे आहे, कारण...

‘विद्रोहा’ची मशागत करणे महत्त्वाचे आहे, कारण...

googlenewsNext

- प्रा. डॉ. इंदिरा आठवले
(दलित साहित्याच्या अभ्यासक) 
विद्रोह म्हणजे पारंपरिक टाकावू मूल्यांशी द्रोह! विद्रोह ही संकल्पना सुटी नाही. ती संदर्भाशिवाय समजून घेता येणार नाही. धर्म, जात, परंपरा रूढी  व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या असतात, त्याविरूद्ध बंड करून उठणे म्हणजे विद्रोह होय. जीवनातील असुंदराच्या विरूद्ध आमूलाग्र सुंदरतेचे आंदोलन म्हणजे विद्रोह होय. विद्रोह ही चिरतरूण संकल्पना आहे. विद्रोह म्हणजे प्रस्थापितांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी केलेला सर्वांगीण स्वातंत्र्याचा जाहीरनामा ! विद्रोहाच्या संकल्पनेत मूलत: शोषक आणि शोषित असे द्वंद्व असते. विद्रोह हा शोषितांचा अत्याचाराविरोधात उठविलेला आवाज होय. समाज व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या शोषण यंत्रणा कार्यरत आहेत. या यंत्रणांविरूद्ध उठविलेला प्रामाणिक आवाज म्हणजे विद्रोह होय. विद्रोहात ‘नकार’ आणि ‘स्वीकार’ हा मूलभूत आशय आहे. अभिप्रेत रूढी, परंपरा, जाती  विषमता, वर्गविषमता, लिंगभेद, अन्याय व्यवस्था इ. ना विद्रोह नकार देतो. परंतु विद्रोहाचे व्यापक रूप सकारात्मक आहे. विद्रोहात ‘एक माणूस, एक मूल्य’ ही संकल्पना महत्त्वपूर्ण आहे.

अनेक धर्म, जाती असलेल्या या विषमतापूर्ण वातावरणात शांतता, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, सुरक्षा, जगण्याची हमी, माणूस म्हणून सन्मान इ. मूल्यांची प्रस्थापना करण्याची नितांत गरज आहे. इथे भौतिक सुखांसाठी विज्ञानाचा वापर होतो परंतु दैववादाचे अतर्क्य उत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत.  असंख्य विरोधी टोके, अनंत अंतर्विरोध आहेत. त्यामुळे विषमतेत सुद्धा सुख भोगण्याची जगावेगळी बधिरता इथे दिसून येते. असे का व्हावे?, याला उत्तर एकच, की समाजाने संविधानाचे ऐकले नाही. यासाठी स्वातंत्र्य, माणूस म्हणून सन्मान, समता, न्याय, बंधुता, भगिनीभाव,  इहवाद ही नीतीमूल्ये समाजात रूजविण्याची गरज आहे आणि साहित्य ही सर्जनशील कला त्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. सर्जनशील लेखक आपल्या कलाकृतीतून या संविधान मूल्यांचा  ध्येयवाद अभिव्यक्त करू शकतो, यावर विद्रोही साहित्याचा विश्वास आहे. सामाजिक लोकशाहीच्या दिशेने वाचकांना नेण्याचे सामर्थ्य साहित्यिकात निश्चितच असते. साहित्याचा परिवर्तनाशी असलेला संबंध अतूट आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. संवेदनशील लेखनामागे सामाजिक परिवर्तनाचे आव्हान असते. सामाजिक लोकशाहीच्या दिशेने समाजाला नेणारा हा साहित्य आणि परिवर्तन मूल्य यांचा परस्पर संबंध विद्रोही साहित्यात सकारात्मकतेने दिसून येतो.

संविधानातील कलमांचा आधार जी जीवनमूल्ये आहेत त्यांना आपण संविधान मूल्ये म्हणतो. उन्नत समाजासाठी या संविधान मूल्यांचा उद्गार ज्ञानाच्या आणि कलेच्या क्षेत्रातून उजागर व्हावा लागणार आहे. भारतीय संविधानाने  कोणत्याही प्रकारचे जात, धर्म, लिंग, वर्ग असे भेद न मानता ‘एक माणूस एक मूल्य’ असे महत्त्व माणसांना प्राप्त करून दिले. सामाजिक लोकशाही निर्माण करणे, मानसिक गुलामगिरी मोडीत काढून माणसाला माणूस हे मूल्य प्राप्त करून देणे हाच संविधानाचा ध्येयवाद होय. सामाजिक लोकशाही म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, इहवाद यावर आधारित समाज रचना हाच ‘युटोपिया’ विद्रोही साहित्यात सुद्धा साकार होतो.

साहित्यिकाची बांधिलकी या संविधान नीतीशी असेल तर, या जाणिवा अधिक प्रगल्भ  होतील. आणि त्यातून विवेकी लोकमत तयार होण्यास मदत होईल. विद्रोहाचे सकारात्मक रूप समताधिष्ठित नव समाज निर्मितीतच आहे.  राजकीय लोकशाहीत आपण वावरतो आहे, लोकशाहीत अनेक संस्थांचे कोसळणे आणि अनेक प्रकारच्या विषमता दैनंदिन अनुभवतो आहोत.  लेखक/ कलावंत सुद्धा याच समाजात घडत असतो; म्हणून या वास्तवाला तो नकार देतो. विद्रोही साहित्यात अभिप्रेत असलेला नवा माणूस संविधान नीती जोपासणारा आहे. या साहित्याची भाषा विद्रोहाची आहे. सांस्कृतिक बदल घडवून आणण्यासाठी नवे संस्कार घडविणारी ही लोकभाषा आहे. माणसाला माणूस हे मूल्य प्राप्त करून देणे हा संविधानातील ध्येयवाद आणि विद्रोही साहित्यात अधोरेखित होणारा ‘युटोपिया’ एकच आहे.

Web Title: It is important to cultivate ‘rebellion’, because ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.