विचारसरणीपेक्षा संवाद वाढणे महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 05:54 AM2018-06-02T05:54:00+5:302018-06-02T05:54:00+5:30
आज प्रणव मुखर्जींचं वय आहे ८२. काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश झाला तो १९६९ साली. आयुष्याच्या मावळतीला त्यांना राष्ट्रपतिपद काँग्रेसला द्यावंच लागलं
डॉ. उदय निरगुडकर
(न्यूज 18 लोकमतचे समूह संपादक)
आज प्रणव मुखर्जींचं वय आहे ८२. काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश झाला तो १९६९ साली. आयुष्याच्या मावळतीला त्यांना राष्ट्रपतिपद काँग्रेसला द्यावंच लागलं. पीएम इन वेटिंग म्हणून त्यांनी बराच काळ काढला. काँग्रेसमधील अनेक अडचणीच्या काळात संकटमोचक म्हणून जसे ते प्रसिद्ध होते तसंच सर्व पक्षांमध्ये ते स्वीकारार्ह होते. अशा महनीय व्यक्तीला संघाच्या प्रथेनुसार तृतीय वर्ष संघ शिक्षाच्या समारोप समारोहाला प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं आणि ते त्यांनी स्वीकारलंही. या घटनेतच अफलातून नाट्य आहे. कदाचित पुढच्या अनेक वर्षांच्या बदलत्या राजकारणाची बीजं यात रोवली जाणार आहेत, यात काही शंकाच नाही. एकीकडे राहुल बाह्या सरसावत संघावर टीका करताहेत. गांधीहत्येला संघाला जबाबदार धरताहेत.
संघविरोध हे काँग्रेसचं कालही प्रमुख हत्यार होतं आणि आजसुद्धा आहे. ब्रिटिशांनी संघावर एकदा बंदी घातली, तर ४८, ९५ आणि ९२ अशा तिन्ही वेळेला काँग्रेस सरकारनंच संघावर बंदी घातली. संघर्षाचे, वैचारिक मतभेदाचे अनेक मुद्दे आहेत. मग गांधी हत्येची जबाबदारी आहे. हिंदू राष्ट्राची आक्रमकता आहे. तिरंग्याऐवजी भगवा, इसिसशी तुलना, हिटलर आणि मुसोलिनी हे संघाचे आदर्श मानले गेले. घटनेपेक्षा संघ मनुस्मृतीला अधिक मानतो. एवढंच काय बाबरी मशीद पाडायलासुद्धा संघालाच जबाबदार धरलं जातं. स्वातंत्र्ययुद्धात संघाचा कोणताही सहभाग नव्हता, असा आरोप त्यांच्यावर केला जातो. दादरी हे संघ मानसिकतेतून घडलं असं म्हणत असतानाच दादरा नगर हवेली आणि गोवा मुक्तीसंग्रामात स्वयंसेवकांचे रक्त सांडले हेदेखील सत्य आहे.
संघावर बंदी आली तेव्हा प्रणव मुखर्जी मंत्रिमंडळात होते. पण आज शरयूच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. आज पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष भाजपचे आहेत. २१ राज्यांत भाजप सत्तेत आहे. अलीकडच्या काळात प्रणवदा आणि संघ यांच्यातील संबंध लक्षणीयच आहेत. अगदी प्रणवदांच्या पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यादिवशीचे सर्व कार्यक्र म त्यांनी रद्द केले होते. फक्त मोहन भागवत यांची भेट मात्र त्यांनी ठरल्यानुसारच घेतली. या पाशर््वभूमीवर त्यांच्या आमंत्रण स्वीकारण्याचं आश्चर्य का वाटावं? तरीदेखील काँग्रेसकडून टीका का होतेय? काँग्रेस विचारसरणीशी त्यांनी पूर्णपणे फारकत घेतलीय असं म्हणायचं का? याचा अर्थ संघाची विचारसरणी आणि हिंदुत्ववाद त्यांना मान्य आहे का?
संघ मुख्यालयात जाऊन आपले विचार मांडायचे त्यावेळी तिथे असलेल्या गोळवलकर गुरूजी आणि हेडगेवार यांच्या प्रतिमेसमोर ते नतमस्तक होणार का? संघाच्या सामाजिक कार्याला दाद म्हणून माजी राष्ट्रपती तिथे जातायत? यापूर्वी जिनांच्या चबुतऱ्यावर अडवाणी जाताच संघानं त्यांना अनुशासनक्षमता दाखवली होती. मुखर्जी संघस्थानावर गेल्याबद्दल काय करावं याबाबत काँग्रेसमध्ये मतभेद आहेत का?
संघाचा निमलष्करी स्वभाव काँग्रेसच्या टीकेचं लक्ष्य आहे. त्यालाच इंडियन फॅसिझम असंही संबोधतात. संघ सत्तेमुळेच वाढतो, असाही आक्षेप घेतला जातो. तरीदेखील आज प्रणवदांनी यायचं मान्य केलंय, ही संघाच्या वाढलेल्या ताकदीला दिलेली सलामी म्हणायची की संघाच्या विचारशैलीची स्वीकारार्हता म्हणायची?
मला या सर्व प्रकरणात राजकीय अस्पृश्यतेचं आकांडतांडव आहे असं वाटतं. तसंच वर्षानुवर्षे एकमेकांबद्दल जपलेला विरोधही आहे. विचार पटत नाहीत, हे मान्य. म्हणून उभा जन्म हाडवैर कामाचे नसते. विचारसरणी कोणतीही असो, संवाद वाढायला हवा. कोण कुणाच्या व्यासपीठावर जातो, यापेक्षा देशाच्या आणि देशवासीयांच्या भल्यासाठी काय विचार होतो, हे जास्त महत्त्वाचं आहे.