कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनणार आहे, हे नक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 11:52 AM2022-12-10T11:52:47+5:302022-12-10T11:53:02+5:30

येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनणार आहे; मात्र आपल्या आयुष्याचाच ताबा ती घेणार नाही, याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल!

It is certain that artificial intelligence will become an integral part of our lives | कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनणार आहे, हे नक्की

कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनणार आहे, हे नक्की

googlenewsNext

अच्युत गोडबोले, ख्यातनाम लेखक
सहलेखिका- आसावरी निफाडकर

आगामी तंत्रज्ञान बहुतांशी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’(एआय)वर बेतलेलं असणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. कॉम्प्युटरनं रोबोटला पाहिजे तशा हालचाली करायला लावणं आणि बुद्धिमान माणसांसारखे निर्णय घेता येणं म्हणजेच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अशी अनेकांची समजूत असते; आणि ती काहीअंशी बरोबरही आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये रोबोट्स हा एक भाग नक्कीच असणार आहे, किंबहुना आताही आहे. पण त्याचा वापर फक्त रोबोटिक्समध्ये होणार नाही; तर तो इतर अनेक क्षेत्रांत होऊ शकेल. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन, फेस रेकग्निशन, ऑटोनॉमस कार्स अशा अनेक गोष्टी शक्य होताहेत.

‘व्हॉइस असिस्टंट्स’ आणि ‘फेस रेकग्निशन’ तंत्र अनेक क्षेत्रात धुमाकूळ घालणार आहे. उदाहरणार्थ गुन्हेगार शोधणं हे तर झालंच; पण त्यामुळे कंपन्यांमध्ये किंवा घरांमध्ये कोण येतंय आणि जातंय हे लगेच कळू शकेल. तिकीट चेकरची गरजच राहणार नाही. रेल्वे, विमान अशा सगळ्या प्रवाशांसाठी तिकीट काढताना फोटो पाठवला की चेक-इन, सिक्युरिटी आणि प्रत्यक्ष विमानात बसताना आयडी दाखवण्याची गरजच पडणार नाही. खरं तर काही वर्षांत फेस रेकग्निशन तंत्र इतकं पुढे गेलं असेल, की रुग्ण डॉक्टरच्या खोलीत शिरतानाच तो कोण आहे, हे ओळखून त्याचं रेकॉर्ड डॉक्टरच्या स्क्रीनवर झळकेल. त्यात रुग्णाचा पूर्वीपासूनचा इतिहास तर असेलच; पण अगदी अलीकडचे रिपोर्ट्सही असतील! हॉटेलमध्येही बुकिंग करताना सगळे तपशील आणि फोटो पाठवले, की प्रत्यक्ष चेक-इन करायचीही गरजच असणार नाही. हॉटेलमध्ये जायचं आणि थेट खोलीपर्यंत जायचं. तिथलं दारही आपला फोटो ओळखून आपोआप उघडलं जाईल वगैरे. तसंच वकिली क्षेत्रातही होईल.

पक्षकाराच्या नावाचा पुकारा केला किंवा फेस रेकग्निशननं त्याचा चेहरा ओळखला की त्याच्या केसचे सगळे पेपर्स, पूर्वीचे निकाल आणि केसचा इतिहास समोर ठाकेल. व्हाइस असिस्टंट्सना सूचना दिल्या की ते ‘लीगल डेटाबेस’मधून सर्च करून पाहिजे त्या केसेस आपल्याला चटकन दाखवतील किंवा वाचूनही दाखवतील. पुढच्या काळात चॅटबॉट्स कायद्याची पुस्तकं, पूर्वी झालेल्या केसेस, त्यांचे निकाल याचा विचार करून पक्षकारांना कायदेविषयक सल्लाही देतील. इतकंच कशाला, भविष्यात टॉयलेट शीटच आपली ‘स्टुल टेस्ट’/‘युरीन टेस्ट’ करू शकतील आणि ‘आज शरीरातली शुगर कमी झाली आहे, युरीक ॲसिड वाढलेलं आहे’ वगैरे रिपोर्ट्सही देतील. 

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ‘ऑटोनॉमस कार्स’ही शक्य झाल्या आहेत. भविष्यात ‘डिजिटल ट्विन’ या टुल्सच्या मदतीनं जमिनीची प्रतिकृती डिजिटल रूपात तयार करता येईल. मग त्या जमिनीत कोणतं पीक चांगल्या प्रकारे उगवू शकेल, खताचं प्रमाण किती लागेल, पाणी किती लागेल हे कळू शकेल. भविष्यात प्रत्येकासाठी एक व्यक्तिगत शिक्षकही निर्माण करता येईल. समजा वर्गात ४० विद्यार्थी असले, तर एकाच व्हिडीओची त्या-त्या विद्यार्थ्याप्रमाणे ४० वेगवेगळी व्हर्जन्स असतील. विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांचा अभ्यास करून त्या विद्यार्थ्याला कुठला भाग नीट कळलेला नाही, हे ठरवणं आणि तो पुन्हा दाखवणं किंवा तोच पोर्शन सोप्या पद्धतीनं सांगणं; त्यानं दिलेली उत्तरं योग्य आल्यावरच पुढच्या धड्याकडे जाणं, असं सगळं केलं जाईल.

जपानमध्ये ‘हेन-ना’ हे हॉटेल माणसांसारखे दिसणारे रोबोट्सच चालवतात. इंग्रजी, जपानी आणि कोरिअन भाषांमध्ये संभाषण करणं, ग्राहकांचं सामान त्यांच्या खोलीपर्यंत नेणं, रूम सर्व्हिस देणं वगैरे कामं हे रोबोट‌्स अतिशय सहजपणे करतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे काही उपयोग तर भन्नाटच आहेत. आता कॉम्प्युटर्स चक्क कथा, कविता लिहायला लागले आहेत. ‘हमटॅप’ नावाचं सॉफ्टवेअर तर आपल्या गुणगुणण्याचं गाण्यात रूपांतर करू शकतं. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात ३० ते ६५ टक्के नोकऱ्या जाण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे. त्याचबरोबर ही ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’ची यंत्रं माणसावर पूर्णपणे हावी झाली तर आपल्यापुढे अस्तित्वाचंच संकटं उभं राहील! या तंत्रज्ञानाला आपल्या वरचढ होऊ न देता त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा, हे आपल्यासमोर एक मोठं आव्हानच असणार आहे! तरीही कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनणार आहे, हे नक्की!! 
godbole.nifadkar@gmail.com

 

Web Title: It is certain that artificial intelligence will become an integral part of our lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.