वाढती निडरता व उर्मटगिरी रोखणे गरजेचे
By किरण अग्रवाल | Published: January 7, 2024 11:48 AM2024-01-07T11:48:51+5:302024-01-07T11:49:26+5:30
It is necessary to stop the growing fearlessness and arrogance : काहीएक कारण नसताना चाकू चालवून जीव घेण्याची मानसिकता येते कुठून?
- किरण अग्रवाल
कुटुंबाचा व समाजाचाही धाक न राहिल्यामुळे की काय, तरुणांमध्ये कसली भीती राहिलेली नाही आणि त्यामुळेच सहज चाकू- सुऱ्यांचा वापर वाढून निष्पापांचे बळी जाण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. भयमुक्त समाजस्वास्थ्यासाठी हे वेळीच रोखणे गरजेचे आहे.
नवीन वर्षात आश्वासकपणे वाटचाल सुरू झाली असतानाच केवळ धाक दाखविण्याच्या उद्देशातून अकोल्यात घडलेली एका विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून केला गेल्याची घटना केवळ समाजमन हादरवून टाकणारीच नसून, घसरत्या समाजस्वास्थ्याचा परिचय घडवून देणारीही आहे. सरकारी व्यवस्थांच्या धाकाचे व कौटुंबिक संस्कारांचे वासे खिळखिळे होत चालल्याची बाब यातून स्पष्ट होणारी आहे.
इयत्ता बारावीचे शिक्षण घेतानाच इंजिनीअरिंगच्या शिकवणीसाठी जळगाव जामोद येथून अकोल्यात येऊन राहणाऱ्या विशाल धोटेनामक विद्यार्थ्यांला कसलाही वाद अगर कारण किंवा ओळख नसताना काही मद्यपी युवकांनी चाकूने भोसकल्याने त्याचा बळी गेला. मोठ्या आशा अपेक्षेने एकुलत्या एक पोरास शिक्षणासाठी शहरात पाठविलेल्या या लेकराच्या कुटुंबीयांची या अनपेक्षित घटनेने काय अवस्था झाली असेल याचा विचारच अस्वस्थ करणारा आहे. ही अशी एवढी एकच घटना नाही, यापूर्वीही काहीएक ओळख-पाळख नसताना दारूसाठी पैसे मागत रस्त्याने जाणाऱ्यास भोसकले गेल्याच्या किंवा हाणामारी केल्या गेल्याच्या घटना घडून आल्या असल्याचे पाहता, ही निडरता व ‘मेरी मर्जी’ची उर्मटगिरी येते कुठून, असा प्रश्न उपस्थित होणारा आहे.
वैद्यकीय व शैक्षणिक हब म्हणून अकोला अलीकडे मोठ्या वेगाने नावारूपास येत आहे. उच्च व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनेक मुले अकोल्यात येतात व भाड्याने खोली घेऊन राहतात. आपल्या शिकवणी, क्लासेस, जेवणासाठीची खानावळ व आपली रूम एवढाच त्यांचा वावर असतो; पण या मुलांना स्थानिक टवाळखोर व मद्यपींकडून होणारा त्रास नेहमीच चिंतेचा मुद्दा ठरत आला आहे. बरे, असा त्रास देणाऱ्या घटकाचे वयोमानही फार काही नसते. तेही वीसी, पंचशीतीलच असतात. त्यामुळे या तरुण वयात नकार ऐकून न घेण्याची मानसिकता व काहीही करून बसण्याची जी बेडरता या पिढीत रुजताना दिसत आहे, ती कशी रोखायची, याकडे पालकांनीच लक्ष देणे गरजेचे होऊन बसले आहे.
सर्वसाधारणपणे अशा घटना घडल्या की, पोलिसांचा धाक ओसरला आहे, असे म्हणण्याची पद्धत रूढ झाली आहे. ते अंशत: खरेही असले तरी मुळात कुटुंब व्यवस्थेतील ज्येष्ठांचा जो धाक ओसरत चालला आहे त्याचे काय? शिक्षण व कामाच्या निमित्ताने सदैव घराबाहेर राहणारा तरुण वर्ग नेमका काय करतो आहे, कशाच्या आहारी जातो आहे; याचा आढावा किती पालकांकडून घेतला जातो? तो तितकासा घेतला जात नसल्यानेच तर ही मुले बेदरकार होतात व आपली हौस, चंगळ अगर व्यसने पुरविण्यासाठी नको त्या मार्गाला लागतात. घराघरातील संस्कारांचे शिंपण कमी होत चालल्यानेच की काय, घराचे वासे कमकुवत होत आहेत; याकडे गांभीर्याने लक्षच पुरविले जात नसल्याचा हा परिपाक म्हणायला हवा. आई- वडील असोत की आजी- आजोबा, त्यांनी आपल्या लेकरांशी संवाद साधून मुलांना समजून घेण्यापेक्षा मोबाइलच्या वेडातून डोके बाहेर काढायला वेळ नाही, ही अनेक घरातील कथा आहे.
राहता राहिला विषय तो कायद्याच्या धाकाचा, तर नवीन वर्षातच बदलून आलेले अकोल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह हे कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळखले जातात. अकोल्यात येण्यापूर्वी वाशिममध्ये त्यांनी कायद्याचा धाक निर्माण करतानाच संवेदनशीलता जपत समाजस्वास्थ्य सांभाळल्याचे दिसून आले आहे. अकोल्याचा पदभार स्वीकारल्यावरही त्यांनी गुन्हेगारी रोखतानाच नागरी सुरक्षेला व भयमुक्ततेला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. तेव्हा त्यांच्या या प्रयत्नांना समाजाकडूनही आपल्या जबाबदारीची साथ लाभणे अपेक्षित आहे.
सारांशात, तरुण पिढीतील वाढती निडरता रोखून किरकोळ अथवा काहीएक कारण नसताना होणारे वादाचे प्रकार टाळायचे असतील तर घराघरातील ज्येष्ठ व वडीलधाऱ्यांना मुलांशी संवाद वाढवून संस्काराचे धागे घट्ट करावे लागतील. सारे काही यंत्रणांकडून अपेक्षिण्यापेक्षा नवीन वर्षात व्यक्तिगत पातळीवर तेवढे नक्की करूया.