वन्य प्राण्यांसोबत साहचर्य आवश्यकच!
By रवी टाले | Published: November 10, 2018 12:40 PM2018-11-10T12:40:56+5:302018-11-10T12:45:14+5:30
अवनीने गत काही वर्षात तब्बल १३ जणांचा बळी घेतल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. दोनच दिवसांच्या अंतराने दोन वाघांना ठार करण्यात आल्याने मानव आणि वन्य जीवांमधील संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात अवनी नामक नरभक्षक वाघिणीस गोळी घालून ठार मारण्यात आल्याच्या दोनच दिवसांनंतर उत्तर प्रदेशात गावकऱ्यांनी एका वाघास ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केले. त्या वाघाने एका गावकºयाचा बळी घेतल्याने त्याला ठार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेच्या एक आठवडा आधी ओडिशात सात हत्तींना विजेचे शॉक देऊन ठार मारण्यात आले. हत्ती पिके नष्ट करतात म्हणून हे कृत्य करण्यात आले. अवनीने गत काही वर्षात तब्बल १३ जणांचा बळी घेतल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. दोनच दिवसांच्या अंतराने दोन वाघांना ठार करण्यात आल्याने मानव आणि वन्य जीवांमधील संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
भारतातून चित्त्याप्रमाणेच वाघ हा प्राणीही विलुप्त होतो की काय, अशी साधार शंका काही वर्षांपूर्वी व्यक्त होत होती. सुदैवाने गत काही वर्षात व्याघ्र संवर्धनात यश आले असून वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आकडेवारीत सांगायचे झाल्यास २००६ ते २०१८ या कालावधीत भारतातील वाघांची संख्या सुमारे ११०० ने वाढली. आज देशात सुमारे २५०० वाघ आहेत. ही भरीव वाढ भासत असली तरी, विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतातील वाघांची संख्या सुमारे ४० हजार एवढी होती, ही वस्तुस्थिती विचारात घेतल्यास वाघांची सध्याची संख्या फारच खुजी भासते. वाघांच्या संख्येत थोडीफार वाढ होताबरोबर मानव आणि वन्य जीवांमधील संघर्ष तीव स्वरूप धारण करू लागला आहे. जर वाघांची संख्या विसाव्या शतकाच्या प्रारंभी होती त्याच्या अर्ध्यावर जरी पोहचली तरी काय होईल, याची कल्पनाही करवत नाही!
मानव आणि वाघांमधील संघर्षासाठी केवळ वाघांच्या संख्येतील वाढच कारणीभूत आहे का? लोकसंख्येतील वाढ आणि त्या प्रमाणात जंगलांचे घटत चाललेले प्रमाण त्यासाठी जबाबदार नाही का? अतिक्रमण वाघांनी मानवी अधिवासावर केले आहे, की मानवाने व्याघ्र अधिवासावर केले आहे? निसर्गात मनुष्याएवढा स्वार्थी प्राणी दुसरा कोणताच नाही. हव्यास हे मनुष्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यासाठी तो इतरांच्या वाट्याचे ओरबाडून घेण्यासही कमी करीत नाही आणि त्यामुळेच मग त्याचा वन्य जीवांशी संघर्ष उफाळतो, ही वस्तुस्थिती आहे.
लोकसंख्या जशी वाढत गेली तसे हव्यासापोटी शेती आणि वस्तीसाठी मनुष्याने जंगलांवर अतिक्रमण केले. एवढेच नव्हे तर नैसर्गिक साधनसंपत्तीच्या लोभापायीही जंगलांची अतोनात कत्तल केली. स्वत:साठी पाण्याची सोय करण्याकरिता जंगलांमध्ये जलसाठे निर्माण करून त्याखाली जंगल बुडवले. जंगलांमध्ये पक्के रस्ते बांधले. त्यातून मानव आणि वन्य जीवांचा संपर्क वाढला आणि त्याची अपरिहार्य परिणिती संघर्षात झाली. त्यामध्ये भर पडली ती वन्य जीव संवर्धनास आलेल्या यशाची! एकीकडे लोकसंख्या वेगाने वाढत असताना दुसरीकडे वन्य जीवांची संख्याही वाढत असेल तर संघर्ष उफाळणारच ना? वाघांच्या बाबतीत ही वस्तुस्थिती असली तरी हत्तींची संख्या घटत असतानाही मानव आणि हत्तींमधील संघर्षही वाढतच चालला आहे. त्यामागचे कारण हे आहे, की हत्ती कळपाने एका जंगलातून दुसºया जंगलात स्थलांतर करीत असतात; मात्र त्यासाठी आवश्यक असलेले ‘कॉरिडॉर’ बेसुमार जंगलतोडीमुळे शिल्लकच राहिलेले नाहीत. परिणामी हत्तींना मानवी अधिवासातून मार्गक्रमण करावे लागते आणि मग शेतीचे नुकसान केले म्हणून आम्ही त्यांना ठार करतो!
वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी विकास प्रकल्प आवश्यकच आहेत; पण त्यासाठी वन्य प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करण्यास कुठे तरी मर्यादा घालणे आवश्यक आहे. इतर सर्व पशू-प्राणी नष्ट झाल्यास मनुष्यही फार दिवस या पृथ्वीतलावर तग धरू शकणार नाही. ही वस्तुस्थिती समजून घेण्याची नितांत गरज आहे. साहचर्य हा निसर्गाचा स्थायिभाव आहे. तो आम्हाला जपावाच लागेल. वन्य श्वापदे कितीही हिंसक असली तरी मानव ज्याप्रमाणे सूड भावनेने त्यांच्यावर हल्ले करतो तसे ते कधीही करीत नाहीत. वन्य प्राणी मानवावर हल्ला करतो, तेव्हा एक तर भूक भागविणे किंवा मग स्वसंरक्षण या दोनपैकी एका उद्देशानेच करतो. त्यांना त्यापेक्षा अधिक समजच नसते. निसर्गाने बुद्धिमत्ता मानवालाच दिली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांसोबतचा संघर्ष टाळण्याची मोठी जबाबदारी आपोआपच मानवाकडे येते.
ही जबाबदारी पेलण्यात आम्ही अपयशी ठरलो तर त्याची किंमत केवळ वन्य प्राण्यांनाच नव्हे तर आम्हालाही चुकवावी लागेल. पिकांचे नुकसान करतात म्हणून चिमण्या मारण्यासाठी एक राष्ट्रव्यापी मोहीम चीनने काही दशकांपूर्वी हाती घेतली होती. त्यामध्ये त्यांना यशही आले; पण एक दशकानंतर त्याचे एवढे भयंकर दुष्परिणाम समोर आले, की तब्बल ४५ दशलक्ष लोक उपासमारीने मेले! झाले असे की चिमण्या संपल्यामुळे कीटकांचे प्रमाण अतोनात वाढले आणि त्यांनी पिकांचा फडशा पाडल्याने अन्नधान्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली. चीनच्या या उदाहरणातून वन्य प्राण्यांसोबत साहचर्याने जगण्याची शिकवण आम्ही घ्यायलाच हवी!
- रवी टाले
ravi.tale@lokmat.com