आश्वासक मोदींनी दाखवलेलं विकासचित्र प्रत्यक्षात आणण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 05:40 AM2019-05-27T05:40:32+5:302019-05-27T05:40:43+5:30
प्रचारकाळात गढूळ झालेल्या राजकीय वातावरणाची पडछाया पडू न देता नरेंद्र मोदी यांनी नवे आश्वासक चित्र एनडीएच्या बैठकीत रंगविले.
प्रचारकाळात गढूळ झालेल्या राजकीय वातावरणाची पडछाया पडू न देता नरेंद्र मोदी यांनी नवे आश्वासक चित्र एनडीएच्या बैठकीत रंगविले. सर्व वर्गांना विश्वास देण्याचे त्यांचे वक्तव्य ही त्यांच्या पुढील वाटचालीची चुणूक मानायला हवी.
‘सब का साथ, सब का विकास’ या घोषणेला ‘सब का विश्वास’ अशी नवी जोड देणारे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीतील भाषण आजवरच्या पठडीपेक्षा वेगळे, नव्या भारताची दिशा दाखवणारे होते. भाजपसह एनडीएला ज्यांनी मते दिली, त्यांचे आभार मानतानाच ज्यांनी ती दिलेली नाहीत, त्यांचाही विश्वास जिंकण्याचे त्यांचे आवाहन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात गढूळ झालेल्या राजकीय वातावरणात दिलासा देणारे आहे. या विजयाने जबाबदारी वाढली आहे, असे सांगताना मतांसाठी- राजकीय स्वार्थासाठी जात, पात, पंथ या आधारे समाजात फूट पाडणाऱ्यांना त्यांनी दिलेला इशारा हा केवळ विरोधकांनाच नव्हे, तर भावनेच्या भरात उन्माद निर्माण करणाºया प्रत्येकालाच होता. त्यामुळेच अल्पसंख्याक अणि गरिबांच्या नावे राजकारण करून त्या वर्गाचा मतपेढी म्हणून वापर करणाऱ्यांनाही त्यांनी जाताजाता सहजपणे कानपिचक्या दिल्या. या सोहळ््यात निवडणुकीतील विजयाचे उन्मादी दर्शन न घडवता, पक्षातील ज्येष्ठांचा मान राखण्याचे दाखविलेले औचित्य अनेकांना सुखावणारे ठरले. या निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या घटक पक्षांना व्यासपीठावर मानाचे स्थान देत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे, आदराचे आणि नम्रतेचे दर्शनही या वेळी घडले. वस्तुत: विरोधी पक्षांची उडालेली दाणादाण, प्रभावी विरोधक न उरणे आणि एका अर्थाने संपूर्ण देशपातळीवरील पक्ष अशी भाजपला मिळालेली मान्यता अशी पार्श्वभूमी असूनही विरोधकांवर टीकेची झोड न उठवता उलट सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या राजकारणाचा नवा मंत्र त्यांनी या वेळी दिला. तुमच्या प्रत्येक निर्णयाचा समाजाच्या शेवटच्या घटकावर काय परिणाम होईल याचा विचार करा; मग तुमचे राजकारण समाजकारण होईल, त्याला सेवाभावी वृत्तीची जोड मिळेल, या आशयाच्या महात्मा गांधींच्या विचारांचा उल्लेख असो, की संविधानाचा गौरव असो त्यातून आपली पुढील वाटचाल नेमकी कशी असेल याची चुणूक नरेंद्र मोदींनी दाखवली. नवमतदार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या महिला मतदारांनी भाजपसह एनडीएला भरभरून मते दिली आहेत त्यांचे प्रतिबिंब मोदींच्या भाषणात न पडते, तरच नवल. विकासात त्या वर्गाला केंद्रस्थानी ठेवण्याचे त्यांचे आश्वासन सुखावणारे आहे.
देशातील मतदार सत्ताभाव नव्हे, तर सेवाभाव स्वीकारतो, हे सांगताना त्यांनी गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या साधेपणाचा संदर्भ दिला. यंदाचे सरकार गरिबांनी निवडून दिले आहे. त्यामुळे व्हीआयपी संस्कृती टाळण्याचा संदेश नव्या खासदारांना देताना त्यांना प्रसिद्धीच्या मोहापासून दूर राहण्याचे खडे बोलही सुनावले. त्यासाठी व्यासपीठावर बसलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्या शिकवणुकीचा दाखला दिला. भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांनी, वेगवेगळ््या पक्षांतील किमान चार पिढ्यांनी जी कष्टांची पेरणी केली; त्यातूनच सध्याचे यश आपण पाहतो आहोत. त्यामुळे या यशाचा अहंकार बाळगू नका, हा त्यांचा सल्ला पूर्वीपासून पक्षासाठी झटणाºया, घटक पक्ष जोडण्यासाठी प्रयत्न करणाºया नेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा होता. निवडणुकीतील यशामागचे सूत्र उलगडणारा होता. हे यश सहजसाध्य नव्हते हे बिंबवणारा होता. त्याची जाण ठेवण्याचे आवाहनही त्यांनी नव्याने निवडून आलेल्या खासदारांना केले.
मंत्रिमंडळातील सहभागावरून खुसखुशीत शैलीत दिलेल्या कानपिचक्या असोत, सत्तेभोवती गोळा होणाºया दलालांना बाजूला ठेवण्याचा मंत्र असो, की नवा भारत घडविण्याच्या स्वप्नाचा पट असो; असे अनेक कंगोरे मोदींच्या या भाषणाला होते. आधीच्या आक्रमकतेला मुरड घालत सर्वसमावेशकतेवर दिलेला भर हे त्यांच्या भाषणाचे सार म्हणावे लागेल. प्रचारादरम्यानची राजकीय कटुता दूर सारत त्यांनी येत्या पाच वर्षांसाठी देशाला दाखविलेल्या आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या चित्राचे रंग या बैठकीत भरले. हे विकासचित्र प्रत्यक्षात आणण्याची कास एनडीएच्या खासदारांनी धरली, तर देश नक्कीच विकासाच्या नव्या वळणावर येऊ शकेल, असे आश्वासक वातावरण यातून निर्माण झाले.