‘असा शास्त्रज्ञ परत मिळणे सहजशक्य नाही’

By admin | Published: January 5, 2015 11:38 PM2015-01-05T23:38:29+5:302015-01-05T23:38:29+5:30

शुक्र वार, दिनांक २ जानेवारी,२०१५ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी वसंतराव गोवारीकरांचे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले.

'It is not easy to get back a scientist' | ‘असा शास्त्रज्ञ परत मिळणे सहजशक्य नाही’

‘असा शास्त्रज्ञ परत मिळणे सहजशक्य नाही’

Next

शुक्र वार, दिनांक २ जानेवारी,२०१५ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी वसंतराव गोवारीकरांचे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. डेंग्यू झाल्याचे निमित्त झाले आणि वसंतरावांना तीन दिवस रुग्णालयात राहावे लागले आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
वसंतराव गेली २-३ वर्षे तब्येतीच्या कारणास्तव सार्वजनिक कार्यक्र मात फारसे जात नसत. पण त्यांच्या घरी गेल्यावर ते चांगल्या गप्पा मारत. ३-४ महिन्यापूर्वी त्यांचे इस्त्रोेतील सहकारी आणि मित्र भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम त्यांच्या घरी जाऊन आले होते. त्याहीवेळी त्यांच्या खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या.
वसंतराव मुळातले कोल्हापूरचे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण तेथे झाल्यावर मग त्यांनी रत्नागिरीच्या गोगटे महाविद्यालयात आणि पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात थोडा काळ अध्यापन केले. मग आपण इंग्लंडमध्ये जाऊन पीएचडी करावी असे त्यांना वाटले.मग ते इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅमला गेल्यावर तेथे प्रा.गार्नर यांना भेटले. तोवर गार्नर निवृत्त व्हायला दोन वर्षे बाकी होती आणि त्यांनी पीएचडीचे विद्यार्थी घेणे बंद केले होते. कारण त्यांच्याकडे पीएचडी करायला ४-४ वर्षे लागत. पण गोवारीकरांचा स्वभाव जिद्दीचा असल्याने त्यांनी प्रा.गार्नराना विचारले, तुमचे विद्यार्थी रोज किती तास काम करतात, तेव्हा गार्नर म्हणाले ८-८ तास. मग गोवारीकर त्यांना म्हणाले, मी रोज १६-१६ तास काम करेन आणि तुम्ही निवृत्त होण्यापूर्वी माझे काम संपवेन. प्रा.गार्नर यांनी मान्यता दिल्यावर गोवारीकरांनी त्यांचे पीएचडीचे काम दीड वर्षात पुरे केले. तेथून पुढे ते अमेरिकेत काम करता असताना विक्र म साराभाईंनी त्यांना भेटून भारतात त्यांना परत बोलावले.त्यांनी अणुशक्ती खात्यात काम करावे अथवा नव्याने सुरु होत असलेल्या अवकाश संशोधन खात्यात काम करावे अशी मुभा दिली. मग वसंतरावानी अवकाश संशोधन खात्यात जायचे ठरवले. एका पडक्या चर्चच्या जागेत त्यांनी काम सुरु केले. विक्रम साराभाईन्नी त्यांच्यावर अवकाशयानासाठी घनइंधन बनवण्याची कामिगरी सोपवली. वस्तुत: त्यातील ओ की ठो माहीत नसताना वसंतराव आणि त्यांच्या गटाने हे आव्हान स्वीकारून, अभ्यास करून हा प्रकल्प यशस्वी करून दाखविला. इतका यशस्वी करून दाखिवला की आज ३५ वर्षानन्तरही यापेक्षा सुधारीत इंधन जगात कोठेही तयार झाले नाही.
१९८३ साली एस.एल.व्ही-३ चे उड्डाण व्हायचे होते, तेव्हा ते पंतप्रधान इंदिरा गांधी यांना म्हणाले होते, की आपण हे उड्डाण टीव्हीवर दाखवू. तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांना विचारले होते की, हे उड्डीण यशस्वी होईल याची तुम्हाला खात्री वाटते का? तेव्हा वसंतराव म्हणाले होते, की ते अयशस्वी झाले तरी लोकांना पाहू दे आणि आम्हीही अयशस्वी होऊ शकतो, हे लोकांना समजू दे, कारण आम्ही लोकांचे पैसे वापरत आहोत. अखेर त्यांना अशी परवानगी मिळाली. इंदिरा गांधी स्वत: हजर राहिल्या. उड्डाण यशस्वी झाले. इंदिरा गांधींनी वसंतरावांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.
वसंतराव १९८६ ते १९९१ अशी पाच वर्षे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते. या काळात त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या खात्यांची प्रगती त्यांनी अजमावली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हवामान खात्यातील शास्त्रज्ञांनी पावसाचा अंदाज व्यक्त करण्याचे ७५ टक्के काम पुरे केले आहे. मग त्यांनी त्या कामाला पुरे करण्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले. मग या कामाचा गवगवा झाला आणि जणू हे काम वसंतरावांनीच केले असे लोक बोलू लागले. पण वसंतराव मात्र याचे यश त्या शास्त्रज्ञांचेच असल्याचे लोकांना पुन्हा पुन्हा सांगत होते.
वसंतराव १९९५ ते १९९८ या काळात पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी विद्यापीठातील विविध खात्यांचे प्राध्यापक योग्य पध्दतीने शिकवतात का, अभ्यासक्र म अद्ययावत आहे का, प्रयोगशाळा अद्ययावत आहेत का, अशी नाना अंगाने बाहेरच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यायला सुरुवात केली होती. विद्यापीठ उत्तम असावे हीच त्यामागची कळकळ होती. नंतर त्यांनी शेतीसाठी लागणाऱ्या खतांचा कोश बनवायचे काम ३-४ तज्ज्ञांच्या मदतीने सुरु केले आणि ५-६ वर्षात ते पुरे केले. जगात शेतीला सुरु वात होऊन आठ हजार वर्षे झाली तरी असा कोश कोणी केला नव्हता. त्यामुळे या कोशाची जगात वाहवा झाली. आज जगात या कोशाला सगळीकडून फार मोठी मागणी सातत्याने असते.
गेली काही वर्षे त्यांना इस्त्रोेची सतीश धवन फेलोशिप होती. त्या फेलोशिपच्या पोटी त्यांनी काही काम करावे, अशी अपेक्षा नव्हती. पण गोवारीकरांची मनोवत्ती वेगळीच होती. त्यांनी मोगली एरंडापासून अवकाशयानासाठी इंधन बनवायचे काम सुरु केले होते. ते काम अगदी गेल्या आठवड्यापर्यंत ते करत होते.
१९९२ साली वसंतराव इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष झाले. तेव्हा त्यांनी भारताच्या लोकसंख्येचा प्रश्न हाच आपल्या अध्यक्षीय भाषणाचा विषय घेतला. त्या भाषणात भारताची लोकसंख्या आता स्थिरावण्याच्या बेतात आली आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. त्यावेळी कोणी त्यावर विश्वास ठेवला नव्हता. पण जगाने त्याला नंतर मान्यता दिली. जेव्हा जन्म दर आणि मृत्यू दर सारखा होतो तेव्हा असलेली लोकसंख्या तेवढीच रहाते. त्याला लोकसंख्येचे स्थिरीकरण झाले असे म्हणतात.
वसंतराव हा देश जगात लवकरच मोठा होणार आहे या मताचे होते. गोवारीकर अत्यंत देशाभिमानी होते. त्यांच्या घरात एकही परदेशी वस्तू नव्हती.
वसंतरावांच्या पत्नी सुधाताई त्यांच्याशी एकरूप झालेल्या होत्या .वसंतरावांच्या अनेक विषयांवर त्यांनी सुबोध मराठीत पुस्तके लिहिली आहेत. वसंतरावाची मुलगी कल्याणी परांजपे ही त्यांच्या खतांच्या कोशात एक संपादक होती. वसंतरावाएवढा हुन्नरी, लहानमोठ्यांबरोबर मिळून मिसळून रहाणारा शास्त्रज्ञ परत मिळणे सहजशक्य नाही.

अ़ पा़ं देशपांडे

Web Title: 'It is not easy to get back a scientist'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.