येथे शस्त्राचार मुक्त आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 04:17 AM2018-03-29T04:17:46+5:302018-03-29T04:17:46+5:30

Is it right here? | येथे शस्त्राचार मुक्त आहे काय?

येथे शस्त्राचार मुक्त आहे काय?

googlenewsNext

हाती शस्त्रे घेऊन मिरवणुका काढणे यावर केवळ कायद्याचीच नाही तर घटनेचीही बंदी आहे. तरीही परवा झालेल्या रामनवमीच्या ‘शोभायात्रे’त कोलकात्याच्या भाजपाने शस्त्रे मिरवलेली दिसली असतील तर त्या पक्षाचा तो अपराध कायदा व संविधान या दोहोंचीही पायमल्ली करणारा आहे हे सांगितले पाहिजे. शस्त्रे हाती असली आणि डोक्यात जल्लोषाचा उन्माद असला की हिंसाचाराला कोणत्याही क्षणी आरंभ होऊ शकतो. कोलकात्यात तसे झाले आणि भाजपाच्या शस्त्रधारी मिरवणुकीने तृणमूल काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना जखमीही केले. त्याची प्रतिक्रिया उमटून मग तृणमूलच्या लोकांनीही काही भागात सशस्त्र मोर्चे काढले. हा प्रकार जेवढा निंदनीय तेवढाच आपले राजकारण घेत असलेली हिंसाचाराची भयकारी दिशा दाखविणारा आहे. खून करणारे आणि खुनाचे समर्थन करणारे पक्ष व संघटना आपल्या देशात आहेत. त्या विदेशातील हिंसाचाऱ्यांचा निषेध करतात. तालिबानांना नावे ठेवतात, बोको हरामला शिवीगाळ करतात आणि इसिस व अल-कायदाच्या हिंस्त्र कारवायांवर टीकेची झोड उठवितात. कारण एकच. ते विदेशातले लोक आहेत आणि शिवाय ते मुस्लिम व अन्य धर्मांचे आहेत. हिंसा आमच्या माणसांनी केली तर क्षम्य व दुर्लक्षिण्याजोगी. इतरांनी केली तर मात्र ती निषेधार्ह असा दुटप्पी न्याय हिंसाचाराबाबत करता येत नाही. हिंसा कुणाकडूनही झाली वा शस्त्राचार कुणीही केला तरी तो सारखाच निंद्य असतो. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये त्यांच्या नागरिकांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार आहे. मात्र त्यांना शस्त्रांसह मोर्चे वा मिरवणुका काढता येत नाहीत. आता या मर्यादित अधिकाराविरुद्धही त्या देशातील स्त्रिया व विद्यार्थ्यांनी आंदोलन उभे केले आहे. शस्त्रांच्या वापराने सामूहिक हत्या करणे, शाळा-कॉलेजात किंवा बाजारात हत्याकांड घडविणे हे प्रकार तेथील अतिरेकी धर्मांधांनी, वर्णांधांनी आणि माथेफिरू वृत्तीच्या लोकांनी एवढ्यात फार केले. इंग्लंड व फ्रान्समध्येही अशी हत्याकांडे अलीकडे बरीच झाली. या सगळ्या शस्त्राचारात नेहमीच निरपराध माणसे, स्त्रिया व मुलांचे बळी पडत असतात. त्यामुळे एकूणच शस्त्र बाळगणाºयांच्या हक्काविरुद्ध तिकडे आता मोहीम उघडली गेली आहे. भारतात शस्त्र बाळगण्याचा अधिकार पोलीस व लष्कराखेरीज इतर कुणालाही नाही. ज्यांना तो हवा त्यांना त्यासाठी रीतसर परवाने मिळवावे लागतात. तरीही देशात शस्त्र बाळगणाºयांची संख्या मोठी आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान व बिहार या राज्यात लग्नांच्या वरातीतही शस्त्रे नाचविली जातात आणि बंदुकांचे बार उडविले जातात. तो प्रकार सामाजिक वा कौटुंबिक आनंदाचा म्हणून पोलीस त्याची फारशी दखल घेत नाहीत. तरीही तो बेकायदा आहे हे निश्चित. हा प्रकार उद्या राजकीय पक्ष करू लागले व आपल्या मोर्चात कोलकात्यासारखी शस्त्रे नाचवू लागले तर देशात राजकीय युद्धेच सुरू होतील. त्यामुळे या घटनांची वेळीच कठोर दखल घेणे गरजेचे आहे. ती घेताना शस्त्रे बाळगणाºया व्यक्तींएवढेच त्यांच्या पक्षांनाही जबाबदार धरणे व त्यांनाही योग्य ती जरब बसविणे आवश्यक आहे. लोकशाही हा लोकमताच्या बळावर चालणारा शांततामय राज्यव्यवहार आहे. त्यात हिंसेला थारा नाही. लोकशाहीत केवळ योग्य ते न्यायालयच अपराध्याला मृत्युदंड देऊ शकते. तो अधिकार कोणत्याही पुढाºयाला वा राजकीय पक्षाला नाही. तरीही देशातले सत्ताधारी असणारे पक्ष बंदुका आणि तलवारी घेऊन मिरवणुका काढत असतील तर तो लोकशाहीविरुद्ध जाणाराही गुन्हा आहे आणि त्याची दखलही तशीच घेणे आवश्यक आहे.

Web Title: Is it right here?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.