नागरिकांच्या हक्कांना मर्यादा घालणे चुकीचे

By admin | Published: March 28, 2016 03:42 AM2016-03-28T03:42:22+5:302016-03-28T03:42:22+5:30

दहशतवादाविरुद्धचे युद्ध जग हरते आहे का? सर्वसामान्यांना दहशतवादी हल्ल्यांच्या छायेतच जगावे लागणार का? स्थलांतरितांबाबत युरोप साशंकच राहणार का? मूलगामी तत्त्वप्रणालीशी

It is wrong to limit the rights of citizens | नागरिकांच्या हक्कांना मर्यादा घालणे चुकीचे

नागरिकांच्या हक्कांना मर्यादा घालणे चुकीचे

Next

- विजय दर्डा
(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)

दहशतवादाविरुद्धचे युद्ध जग हरते आहे का? सर्वसामान्यांना दहशतवादी हल्ल्यांच्या छायेतच जगावे लागणार का? स्थलांतरितांबाबत युरोप साशंकच राहणार का? मूलगामी तत्त्वप्रणालीशी संघर्ष करण्यासाठी आपल्याकडे काही उपाय नाही का? असे अनेक प्रश्न गेल्या काही दिवसांपासून जगाला भेडसावत आहे. ब्रसेल्स विमानतळ आणि मेट्रो स्टेशनवर मागील सप्ताहात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे प्रश्न अधिक प्रखरपणे समोर येत आहे. या हल्ल्यांचा परिणाम इतका गंभीर आहे की, ब्रसेल्स विमानतळ अद्यापही पूर्णपणे सुरू होऊ शकलेले नाही. या हल्ल्यांमागील तिसरा संशयित फरार असल्याने नागरिकांच्या मनातील भीती अद्यापही कायम आहे.
दहशतवादाची समस्या जुनीच आहे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे संपूर्ण जगाला या समस्येने ग्रासले आहे; मात्र या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जगाने एकत्रितपणे प्रयत्न केलेले दिसत नाहीत. पॅरिसमधील हल्ल्यानंतर अमेरिकेने फारसा प्रतिसाद दिलेला नव्हता. तसेच अफगाणिस्तान अथवा पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ले हा त्यांचा घरगुती मामला असल्याचे आपण मानले. दहशतवादी हल्ले हे कोणत्या ना कोणत्या सत्तेविरुद्ध असलेली नाराजी व्यक्त करण्यासाठी केले जातात; मात्र हे हल्ले म्हणजे मानवतेविरुद्धचे हल्ले असतात. कोणतेही शस्त्र नसलेले, हल्ल्याला तोंड देण्यास तयार नसलेल्यांची अविचाराने केलेली हत्त्या ही कधीही क्षम्य नाही. दहशतवादी हल्ल्यांना समर्थन देणारे दहशतवादाचा पुरस्कार करतात असे मानले पाहिजे.
दहशतवाद हा जागतिक समस्या असल्याचे मान्य केले तर मग सर्व सीमा गळून पडतील. ब्रसेल्स, पॅरिस किंवा सिडनीमध्ये हल्ला झाला तरी असा हल्ला बीजिंग, इस्लामाबाद, नवी दिल्ली अथवा कोलंबोतही होऊ शकतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तालिबान कशा पद्धतीने वाढले आणि त्याने संपूर्ण जगाला कसे आपल्या हल्ल्याचे निशाण बनवले हे आपण पाहिलेच आहे. थोडक्यात जगातील कुठलेही ठिकाण दहशतवादी हल्ल्याच्या धोक्यापासून सुरक्षित नाही. सर्वच ठिकाणे दहशतवादी हल्लाचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज केले पाहिजेत व त्यासाठीची सज्जता तातडीने करणे गरजेचे आहे.
इसिस, अल-कायदा अथवा तालिबान वा अन्य कोणती दहशतवादी संघटना यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर साधनसामग्री आहे. दहशतवादाने अस्थिरता निर्माण करण्यात काही कंपन्यांचा तसेच स्वायत्त गटांचा हात आहे. जगभर या दहशतवादी संघटनांची माणसे, शस्त्रास्त्रे आणि पैसे आहेत व या संघटनांच्या निवडीनुसार ठरावीक ठिकाणी हल्ले केले जातात. पारंपरिक युद्धापेक्षा या युद्धाने दहशतवाद्यांना जास्त संधी मिळते. कारण ते त्यांच्या हल्ल्यांची ठिकाणे आणि वेळ निश्चित करु शकतात. यामुळे कमी किमतीत जास्तीत जास्त नुकसान करणे त्यांना शक्य होते. याशिवाय या बातम्यांमुळे जनमानसात निर्माण होणारी भीती मोठ्या प्रमाणात कायम राहते, हे पॅरिस आणि ब्रसेल्सवरील हल्ल्याने स्पष्ट झाले आहे.
दहशतवादाच्या विरोधात लढण्यात जगाला आलेले अपयश हे हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्याने आले आहे. ब्रसेल्सवरील हल्ल्यानंतर बेल्जियमच्या पंतप्रधानांनी हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याची कबुली दिली. याचाच अर्थ दहशतवादी हल्ला होणार ही माहिती असूनही तो रोखू शकण्यात सरकार यशस्वी होत नाही, ही शोकांतिका आहे. दहशतवादाच्या विरोधात तयारी करूनही सर्वच हल्ले आपण थोपवू शकणार नाही हे मान्य; मात्र दहशतवादाविरोधात जगाने एकत्रितपणे निर्णय घेणे गरजेचे आहे. जगातील सर्वच देशांनी आपला सामाजिक आणि आर्थिक दर्जा कोणताही असला तरी दहशतवादाचा मुकाबला एकत्रितपणे करणे गरजेचे ठरणार आहे. पठाणकोट येथील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने याबाबत सकारात्मक पाऊल उचलले होते. भारतीय भूमीवरील हल्ल्यामागे पाकिस्तानी हात असल्याचे पाकिस्तानने मान्य केले नसले तरी हे पाऊल महत्त्वाचेच ठरते.
दहशतवादाविरुद्धच्या युद्धात जगाला गरज असलेल्या साधनसंपत्तीसाठी अमेरिका आणि चीन या जगातील दोन आर्थिक महासत्तांनी एकत्र येऊन जबाबदारी घेणे गरेजेचे आहे. या युद्धांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून कोठेही होणारे हल्ले रोखणे हे खरे आव्हान आहे. इराक आणि सीरिया येथील वातावरण दहशतवादाच्या वाढीला पोषक ठरले आहे. म्हणून तेथे दहशतवादाविरुद्धची व्यापक मोहीम राबविणे गरजेचे आहे.
धर्म आणि दहशतवाद यांचा संबंध जोडला जात आहे. कोणताही धर्म या दहशतवादाला पाठिंबा देत नाही; मात्र दहशतवादी युद्धांसाठी सैनिक निवडताना धर्माचा वापर केला जातो ही बाब नजरेआड करता येणारी नाही. धर्मासाठी लढणे हे आमिष दाखविले जाते. जगाने म्हणूनच दहशतवाद आणि धर्म यांची सांगड मोडण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
सर्व नागरिकांना समानतेची वागणूक मिळण्याची गरज यामुळे अधोरेखित होते. युरोपमध्ये सर्वांनाच समान संधी मिळाली आणि स्थलांतरिताना वेगळी वागणूक न मिळाल्यास दहशतवादाचा पाठिंबा कमी होऊ शकतो; मात्र यामुळे दहशतवाद संपेल अशी हमी कोणीही देऊ शकणार नाही. पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेने एकमेकांच्या सहकार्याने काम केल्यास दहशतवाद कमी होऊ शकतो; मात्र दहशतवाद रोखण्यासाठी नागरिकांच्या हक्कांना कोणत्याही देशाने मर्यादा घालणे चुकीचे आहे. हक्कांना मर्यादा घातल्यास जिहादीचे फावणार आहे आणि त्यातून दहशतवाद आणखी पसरण्याचा धोका आहे.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
आपली पाण्याची समस्या कधी संपणार हा
प्रश्न आहे. उन्हाळ्याला प्रारंभ होत असताना राज्यात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर निर्माण होत
आहे. मराठवाड्यातील मुख्यत: लातूर परिसरातील
पाणी टंचाई भीषण आहे. हे संकट अचानक
उद्भवलेले नाही. ते अनेक वर्षांपासून आहे. असे असले तरी आपण अद्याप गंभीरपणे उपाय योजताना
दिसत नाही. अनेक वर्षांपासून असलेल्या या परिस्थितीबाबत आपण कोणतेही उपाय न योजणे भूषणावह नाही. नागरिकांनी स्वत:ची सोय स्वत:च करावी असे सांगणे चुकीचे आहे. नागरिकांना पाणी मिळालेच पाहिजे.

Web Title: It is wrong to limit the rights of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.