जाधवांचा ‘न्यूड’ स्वर्गलोकी सुपर-डुपर
By राजा माने | Published: May 7, 2018 12:09 AM2018-05-07T00:09:05+5:302018-05-07T00:09:05+5:30
सुपर-डुपर... सुपर-डुपर... जाधवांचा ‘न्यूड’ स्वर्गलोकी सुपर-डुपर... असे म्हणतच महागुरू नारदांनी मराठी भूमीतील इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेशी फोनवर बोलायला सुरुवात केली. नेहमी ‘काडी’ करण्याच्या मूडमध्ये बोलणारे महागुरू आज एवढे आनंदात का? या प्रश्नानेच यमके बुचकळ्यात पडला होता.
सुपर-डुपर... सुपर-डुपर... जाधवांचा ‘न्यूड’ स्वर्गलोकी सुपर-डुपर... असे म्हणतच महागुरू नारदांनी मराठी भूमीतील इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेशी फोनवर बोलायला सुरुवात केली. नेहमी ‘काडी’ करण्याच्या मूडमध्ये बोलणारे महागुरू आज एवढे आनंदात का? या प्रश्नानेच यमके बुचकळ्यात पडला होता. बरं, सेन्सॉरच्या अग्निपरीक्षेपासून अनेक दिव्यातून गेलेल्या रवि जाधव यांच्या ‘न्यूड’ या सिनेमाचा आणि महागुरूंचा काय संबंध? अशा प्रश्नांच्या मानसिकतेतच यमके नारदांशी बोलू लागला.
यमके- गुरुदेव, जाधवांचा ‘न्यूड’ अप्रतिम आहे. बॉक्स आॅफिसचे जाऊ द्या, पण कला जगतात गाजत आहे. आता त्याला तुम्ही कुठे सुपर-डुपर ठरविता?
नारद- शिष्या... अरे, तुझ्या मराठी भूमीपुत्र जाधवांचा ‘न्यूड’ चक्क स्वर्गलोकी सुपर-डुपर झालाय...
यमके- म्हणजे? आता स्वर्गलोकीची ही काय नवी भानगड?
नारद- काय सांगू तुला, स्वर्गलोकी काल हंगामा झाला. तुमच्या एम. एफ. हुसैन साहेबांना काल आपल्या होमथिएटरमध्ये ‘न्यूड’ सिनेमा दाखविला. त्या शोला चक्क न्यूड चित्रकला क्षेत्रातील दिग्गजांनाही बोलावून त्यांना तो पाहण्याची संधी दिली.
यमके- शो... दिग्गज... माझ्या काहीच लक्षात येत नाही गुरुवर्य!
नारद- शेवटी तू बोरूबहाद्दर पत्रकारच निघालास... १४००-१५०० व्या शतकात पेंटिंग विश्वात इतिहास रचणाऱ्या सॅन्ड्रा बॉटिसिली, मोनालिसाच्या चित्राने अजरामर झालेला लिओनार्दो, ‘डच मोनालिसा’ पेंटिंगने गाजलेला जोहान्स वरमीर, सौंदर्यवती क्लिओपात्राचा मृत्यू चितारणारा गिओवन्नी पियाट्रोपासून ते थेट विसाव्या शतकातल्या पिकासोपर्यंतच्या सर्व दिग्गजांना रवि जाधवांचा ‘न्यूड’ सिनेमा पाहण्यासाठी हुसैन यांनी पाचारण केले होते.
यमके- अस्सं का! एमएफसाहेब आमच्या पंढरीचे आणि आमची लाडकी माधुरी हे त्यांचे लाडके मॉडेल...
नारद- अरे, जाधवांचा सिनेमा ‘न्यूड मॉडेल’वरच आहे. कदाचित त्यांना त्यांच्या ‘गजगामिनी’ सिनेमाची आठवण या सिनेमाने दिली असेल...
यमके- हो, ते सगळं खरं... पण मराठीभूमीत तर थेटरात बोटांवर मोजता येतील एवढीच माणसं असतात म्हणे... मग स्वर्गलोकी बॉक्स आॅफिसला तो हिट झाला कसे म्हणता?
नारद- अरे वेड्या... कोणत्याही कलेतील ‘नग्नता’ ही अश्लील आणि बीभत्स नसते हे आपल्या कुंचल्यातून, कलाकृतीतून समाजाच्या गळी उतरविण्यासाठी प्रत्येक युगात आयुष्य वेचलेल्या दिग्गजांची दाद मिळविणे हे तथाकथित बॉक्स आॅफिस ‘हिट’ पेक्षा कितीतरी मौल्यवान असते. नेमके रवि जाधवांच्या सिनेमाचे ‘एमएफ’साहेबांच्या शोने तेच स्वर्गलोकी दाखवून दिले.
यमके- नेमके तिथे काय घडले देवा?
नारद- प्रत्येक फ्रेममध्ये रंगसंगती आणि प्रकाशयोजनेत फोटोग्राफर अमलेंदू चौधरीने ओतलेला जीव, फ्रेममधील नग्नतेला डावलून रसिकाला स्वत:च्या डोळ्यात गुंतवून ठेवण्यात कल्याणी मुळे आणि छाया कदम यांनी दाखविलेली अभिनयाची ताकद आणि रवि जाधव याने कला क्षेत्रातील ‘जे. जे. संस्कृती’चा बाज कुठेही ढळू दिला नाही, याची दिग्गजांनी भरभरून तारीफ केली... यापेक्षा सुपर-डुपर काय असू शकते?