जैन धर्मीयांचा मोठा सण संवसरी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:56 AM2018-09-13T01:56:11+5:302018-09-13T01:56:22+5:30
जैन धर्माचे महान पर्व आहे संवत्सरी महापर्व. दुसऱ्या शब्दांत बोलायचे झाले तर संवत्सरी म्हणजे जैन धर्मीयांची दिवाळीच होय.
जैन धर्माचे महान पर्व आहे संवत्सरी महापर्व. दुसऱ्या शब्दांत बोलायचे झाले तर संवत्सरी म्हणजे जैन धर्मीयांची दिवाळीच होय. संवत्सरी हा दिवस जैन धर्मीयांसाठी वर्षातील सर्वांत महत्त्वपूर्ण दिवस होय. हा दिवस पर्व म्हणून गणला जातो. मात्र तीर्थंकरानंतर असणाºया उत्तराधिकारी आचार्याने या पर्वाचे महत्त्व वाढविण्यास हे पर्व सात दिवसांचे केले. या पर्वामुळे मानवाच्या अंगी असलेले राग, द्वेष, क्रोधाच्या ग्रंथीना कमी करण्याची संधी मिळते. तसे पाहता या पर्वाची महती व महत्त्व अनिवार्य आहे. ज्याप्रमाणे तपस्येमध्ये ब्रह्मचार्य तपस्या, अग्रणी मणीमध्ये वैर्य मणी भारी, रत्नामध्ये चिंतामणी रत्न, ध्यान साधनेत शूल ध्यान महत्त्वाचे, वनांमध्ये नंदनवन तर पर्वतांमध्ये मेरू पर्वत महत्त्वपूर्ण त्याप्रमाणे पर्युषण पर्व हे महापर्व समजले जाते. म्हणून या पर्वाला ‘पर्वाधीराज पर्युषण पर्व’ म्हणतात. जैन पंचांगानुसार या संवत्सराचा प्रारंभ हा श्रावण वद्य प्रतिपदेला होतो. जैन तिथीनुसार ही तिथी जैनियांच्या वर्षारंभाची तिथी होय. त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अध्यात्माच्या दृष्टीने या पर्वास पर्युषण पर्व म्हणतात. तर दुसºया बाजूस यांचे अवलोकन केल्यास समवायंग सूत्रामध्ये यांचा असा उल्लेख आहे की चतुर्मास प्रारंभानंतर एक महिना वीस दिवस झाल्यानंतर व चतुर्मासाचे ७0 दिवस उरल्यानंतर संवत्सरी पर्वाची आराधना करावी. भगवंत महावीर साधनेच्या कार्यकाळात भाद्रपद शुद्ध पंचमीला संवत्सरी पर्व साजरे करावे. असा काही दंडक नव्हता. भगवंताने एकदा असा प्रयोग केल्यानंतर तो सर्वांनी स्वीकारला व हे पर्व प्रचलित झाले. कधी कधी चतुर्थीला हे पर्व साजरे होते. परंतु पंचमीला हे पर्व साजरे करणे योग्य ठरते. कल्पसूत्रामध्येदेखील यांचा उल्लेख आढळून आला आहे. अतिरिक्त निशीथ सूत्रामध्ये अवेळी पर्युषण व वेळी पर्युषण साजरा करणारा चतुर्मासिक दंडाचा पायिक ठरू शकतो. जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. या दोन्हीही संप्रदायात पर्युषण पर्व मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. श्वेतांबर संप्रदायात भाद्रपद महिन्यात पर्युषण पर्व येते. त्यांचे हे पर्व आठ दिवस चालते. त्यानंतर दिगंबर संप्रदायाचे लोक हेच पर्व दहा दिवस साजरे करतात. त्याला ते दसलक्षण या नावाने संबोधतात.