राष्ट्रीय जीवनावर ठसा उमटविणारे जयपाल रेड्डी आणि सुषमा स्वराज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 05:02 AM2019-08-11T05:02:57+5:302019-08-11T05:03:41+5:30
जयपाल व सुषमा यांना वक्तृत्वाची दैवी देणगी मिळाली होती. जयपालकडे विद्वत्ता होती व इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. सुषमामध्ये विचार ओघवत्या हिंदीतून स्वच्छपणे मांडण्याचे कौशल्य होते. संस्कृत व भारतीय परंपरा यांविषयी दांडगा अभ्यास होता. संसदेत ते दोघे जेव्हा बोलत तेव्हा सर्व सदस्य त्यांची भाषणे एकाग्रतेने ऐकायचे. सुषमाने सतत प्रगती केली, तर जयपाल यांच्या वाट्यास चढ-उतार आले.
- एम. व्यंकय्या नायडू,
(भारताचे उपराष्ट्रपती)
जयपाल रेड्डी व सुषमा स्वराज हे माझे दोन्ही सहकारी दहा दिवसांच्या अंतराने जग सोडून गेल्यामुळे माझी फारच मोठी हानी झाली आहे. ते दोन्हीही माझ्या भाऊ-बहिणीसमान होते. जयपाल मोठ्या भावासारखे होते तर सुषमा लहान बहिणीप्रमाणे. दोघेही श्रेष्ठ संसदपटू, उत्तम प्रशासक आणि उत्कृष्ट वक्ते होते. दोघांमध्ये खूप साम्य आणि विरोधाभासही होता. त्यांच्यात क्षमता व सार्वजनिक जीवनात यशस्वीपणे वाटचाल करण्याचे सामर्थ्य होते.
विरोधाभासांचाही विचार करू. जयपालना पोलिओमुळे अपंगत्व आले होते. पण त्यांनी आपल्या कामात त्याचा अडसर होऊ दिला नाही. वक्तव्य, कृती आणि त्यांनी जे काही साध्य केले त्यातून त्यांनी आपल्यातील वेगळ्या प्रकारच्या क्षमतेचे दर्शन घडविले होते. आपण अलौकिक कृती करू शकतो हेही दाखवून दिले. शारीरिक दौर्बल्यामुळे आपल्यावर ताण येत नाही हे दाखविण्याचा तुम्ही प्रयत्न करता का, असे मी त्यांना विचारले, तेव्हा त्यांनी आत्मिक बल महत्त्वाचे असते असे सांगून माझे म्हणणे धुडकावून लावले होते. त्यांच्यातील रचनात्मक क्षमतेने त्यांच्या दौर्बल्यावर मात करून त्यांना उंचीवर पोहोचवले होते!
जयपाल रेड्डी हे उत्तम वक्ते व अफाट बौद्धिक क्षमतेची व्यक्ती होते. प्रत्येक विषयाच्या मुळापर्यंत ते पोहोचत. तीक्ष्ण बुद्धिमता व व्यावहारिक शहाणपण यामुळे ते पक्षाचा प्रवक्ता म्हणून उत्तम काम करीत होते. त्यांचे इंग्रजी व तेलुगु उत्कृष्ट होते. आंध्र प्रदेश विधानसभेत आम्ही शेजारीच बसायचो, नोट्सची देवाणघेवाण प्रदान करायचो. त्यामुळे सत्तारूढ पक्षाचे सदस्य आमचा उल्लेख तिरुपती वेंकट कवुलु असा करायचे. ते दोघे प्रसिद्ध तेलुगु कवी होते. संयुक्तपणे काव्यरचना करायचे.
आपल्याकडे सामाजिक-राजकीय जीवनात लैंगिक भिन्नता हा मोठा प्रश्न असून महिलांना त्यांचे योग्य स्थान मिळण्यात अनेक अडचणी येतात. पण ६७ वर्षांच्या सुषमा स्वराजनी हे सामाजिक दौर्बल्य झुगारून दिले होते. आपल्या भाषेने, कृतीने व यशाने त्यांनी जयपाल रेड्डींप्रमाणेच या सामाजिक अडचणींवर मात केली. हरयाणाच्या कर्मठ कुटुंबात जन्मलेल्या सुषमा स्वराज यांनी राज्य सरकारातील सर्वांत तरुण कॅबिनेट मंत्री या नात्याने सुरुवात करून माजी परराष्ट्रमंत्री म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. ही लहानसहान कामगिरी नव्हे.
आता दोघांमधील फरक लक्षात घेऊ. प्रवृत्तीने जयपाल व सुषमा हे दोन वेगळ्या विचारधारांचे प्रतिनिधित्व करीत. पण राजकीय घटनांनी त्यांना काही काळासाठी का होईना, एकत्र आणले, तेही आणीबाणीनंतर जनता पक्षाच्या माध्यमातून. राजकीय बांधिलकीने ते दोघे भारत घडवून आणण्याच्या कामातच व्यग्र राहिले.
संयुक्त आंध्र प्रदेशाच्या राजकारणात जयपाल व मी बराच काळ सहप्रवासी म्हणून वावरलो. राज्य विधानसभेत महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष वेधण्याचे आणि सरकारच्या उणिवांवर बोट ठेवण्याचे काम आम्ही दोघे हिरिरीने करीत असू. ते माझ्यापेक्षा एका टर्मने ज्येष्ठ होते. त्यामुळे माझ्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मला मार्गदर्शन केले. मी १९७८ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेलो होतो. आम्ही एकमेकांच्या घरी नाश्ता घेताना चर्चा करीत असू आणि रोजच्या कामकाजाचा अजेंडा निश्चित ठरवत असू. कामकाज संपल्यावर सभागृहातील आमच्या कामकाजाच्या आधारे बातम्यांचे मथळे योग्य आहेत की नाहीत हे आम्हास भेटून पत्रकार निश्चित करीत.
जयपाल रेड्डी जहागिरदाराच्या कुटुंबात जन्मलेले असले तरी आधुनिक वृत्तीचे होते. लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी राजकीय जीवनात प्रवेश केला होता. नैतिक व राजकीय मूल्यांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यासाठी त्यांनी स्वत:च्या राजकीय पक्षांच्या विरोधात आवाज उठवायलाही मागेपुढे पाहिले नाही. आम्ही देशाच्या राजकारणाच्या बदलत्या स्वरूपाविषयी बऱ्याचदा चर्चा करीत असू.
सुषमा ही राजकारणातील माझी सहकारी होती. आमच्यातील मैत्रीची भावना वर्षागणिक दृढ होत गेली. तिला श्रद्धासुमने अर्पण करण्यासाठी मी त्यांच्या निवासस्थानी गेलो, तेव्हा तिच्या मुलीच्या बांसुरीच्या डोळ्यांतील अश्रू अनावर झाले. आईची आठवण सांगताना ती म्हणाली, ‘आई म्हणायची की व्यंकय्याजींना मी भेटले की भावासमोर एखादी बहीण अंत:करण उघडे करते, तसे मी माझे विचार त्यांना सांगत असे.’ मला वाटते नियतीने माझी प्रेमळ बहीणच माझ्यापासून हिरावून घेतली. सुषमाजींच्या राजकीय प्रवासातील सर्व वळणांवर मी त्यांच्यासोबत होतो. मी १९९८ मध्ये कर्नाटकचा प्रभारी असताना सुषमाने बेल्लारीहून निवडणूक लढवावी असे मी सुचविताच तिने लगेच त्यास मान्यता दिली. मी दिल्लीचा प्रभारी असताना तिने मुख्यमंत्री होण्यासही संमती दर्शविली. यश व पराभव यांचा त्यांनी तितक्याच खिलाडूपणे स्वीकार केला.
भारतीय संस्कृतीचे प्रतीक या नात्याने जनता तिच्याकडे पाहत असे. भारताच्या संस्कृतीचे तिने खºया अर्थाने प्रतिनिधित्व केले. वेशभूषा, शिष्टाचार, शब्दांचा अचूक वापर करण्याचे चातुर्य, सर्वांविषयी व्यक्त होणारी प्रीती, विनम्र वृत्ती, ज्येष्ठांविषयी आदर व्यक्त करण्याची भावना, कुणाच्याही भावना न दुखावता करणारे भाष्य, यामुळे त्या लोकप्रिय राजकारणी तर होत्याच; पण सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांनी आदर व प्रशंसाही मिळविली होती.
त्यांच्या वैचारिक धारणा पक्क्या होत्या. त्याला समृद्ध अनुभवाची जोड होती. आजच्या तरुण राजकीय नेत्यांनी त्यांचा आदर्श समोर ठेवायला हवा. त्यांच्या भाषाशैलीचा, युक्तिवादाचा आणि भाषणांचा अभ्यास करायला हवा. आज त्यांचे स्वर मौन झाले आहेत. ते देहरूपाने आपल्यात नाहीत. पण त्यांच्या भाषणातून आणि अंतरंग व्यक्त करणाºया त्यांच्या लिखाणातून त्यांचे अस्तित्व जाणवून घेता येईल. आपल्या राष्ट्रीय चरित्रावर त्यांच्या स्मृती कायमच्या कोरलेल्या राहतील
आणि आपल्यास वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहतील.