जलयुक्त शिवाराने ‘हलगारा’चा कायापालट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 06:15 AM2019-06-15T06:15:44+5:302019-06-15T06:18:11+5:30

वास्तविक अमेरिकेतील कॅलिफोर्निया हा अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. तेथे जितका पाऊस पडतो त्याच्याहून जास्त पाऊस हलगारा येथे पडत असताना

Jalajit Shiwar transforms the movement of 'Halgarga' | जलयुक्त शिवाराने ‘हलगारा’चा कायापालट

जलयुक्त शिवाराने ‘हलगारा’चा कायापालट

Next

कमलाकर धारप

सत्ता पाटील हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लातूर जिल्ह्यातील हलगारा गावचे रहिवासी आहेत. सध्या ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील याहू या कंपनीत डायरेक्टर म्हणून गलेलठ्ठ पगाराची नोकरी करीत आहेत. पण त्यांनी हलगारा गावासोबतचे संबंध कायम ठेवले आहेत. दरवर्षी ते गावाला भेट तर देतातच; पण आई-वडिलांना तीर्थयात्रेलासुद्धा नेतात. त्यांच्या गावात पाणीटंचाईमुळे लोकांची होत असलेली परवड त्यांना पाहवेना, त्यांनी गावाला जलयुक्त करायचे ठरवले. त्यांच्या आईने आपल्या मुलांनी खूप शिकावं असा ध्यास घेऊन मुलांचे शिक्षण पूर्ण केले. दत्ता पाटील हेही गावातील सरकारी शाळेत शिकत मोठे झाले. बारावीत ते गुणवत्ता यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. पुढे त्यांनी कॉम्प्युटर इंजिनीअरिंगची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर ते अमेरिकेत गेले, तरी त्यांनी गावात येण्याचा परिपाठ कायम ठेवला. पण २०१६ मध्ये लातूर जिल्ह्यावर जलसंकटच कोसळले. रेल्वेने लातूर शहरास पाणीपुरवठा होऊ लागला होता; आणि लातूरच्या परिसराचे वाळवंटात रूपांतर झाले होते.

वास्तविक अमेरिकेतील कॅलिफोर्निया हा अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. तेथे जितका पाऊस पडतो त्याच्याहून जास्त पाऊस हलगारा येथे पडत असताना हलगाराला पाणीटंचाईचा सामना का करावा लागावा या विचाराने त्यांचे मन घेरले गेले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की कॅलिफोर्नियात पाण्याची पातळी जमिनीच्या खाली ७० फुटांवर आहे तर तीच हलगारा येथे ८०० फुटांवर आहे.
हलगाराची पाण्याची पातळी उंचावणे गरजेचे आहे हे दत्ता पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी हलगारा येथे जलयुक्त शिवाराची कामे स्वत: पैसे खर्चून सुरू केली. हलगारा गावातील कालव्यातील गाळ त्यांनी लोकांच्या मदतीने काढण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे नदीचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरू लागले. त्यांच्या कामाचे यश पाहून सरकारनेही त्या कामासाठी आर्थिक मदत करणे सुरू केले. पण दत्ता पाटील यांनी या कामावर स्वत:चे २२ लाख रुपये खर्च केले आहेत. त्या पैशातून नदीवर २६ बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे बंधाºयात साठलेले पाणी जमिनीत मुरून जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदतच झाली. या सर्व प्रयत्नांमुळे जमिनीतील पाण्याची पातळी जी ८०० फुटांवर होती ती १०० फूट झाली.

या कामासाठी गावातील तरुणांनीही त्यांना भरपूर सहकार्य केले. गावातील नागरिकांना हे सर्व अशक्य वाटत होते. पण प्रयत्नांचे सातत्य ठेवल्याने अशक्य वाटणाºया गोष्टीदेखील शक्यतेच्या पातळीवर आल्या. लोकांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल घडवून आणणे सोपे नसते. पण दत्ता पाटील यांनी जिद्दीने काम करून हलगाराचा कायापालट घडवून आणला. २०१६ पूर्वीचे हलगारा आणि आताचे हलगारा यात कमालीचे परिवर्तन झाल्याचे दिसून येते. पूर्वी या प्रदेशाला जे वाळवंटाचे रूप होते ते बदलून आता सर्वत्र हिरवळ पाहावयास मिळते. त्यामागे दत्ता पाटील यांची जिद्द आणि गावकऱ्यांनी त्यांना केलेले सहकार्य यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या परिश्रमामुळे शेतकºयांच्या उत्पन्नात ३०० पट वाढ झाली आहे. त्यासंदर्भात दत्ता पाटील सांगतात, ‘‘कामात अडचणी येतच असतात. नकारात्मक विचार करणारे तुमचा उत्साह खचवू पाहतात, पण तो खचवू न देता आपण काम करीत राहिलो तर यश हे नक्की मिळते.’’ त्यांच्या आणि त्यांच्या सहकाºयांच्या प्रयत्नाने हलगारा येथील जमीन जलयुक्त झाली असून जमिनीत २०० कोटी लीटर पाणी साठवले गेले आहे. त्यामुळे एकेकाळी रूक्ष असलेला हा परिसर हिरवळीने समृद्ध झाला आहे.

जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आपल्या गावाचा कायापालट करू इच्छिणाºयांसाठी दत्ता पाटील यांनी आपले अनुभवाचे बोल सांगितले आहेत. ते म्हणतात, ‘‘सकारात्मक बदल घडवून आणणे सोपे काम नाही. आपले काम करताना तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे एक महिन्याच्या आत तुमचा काम करण्याचा उत्साह मावळायला लागतो. तुमचे पाय मागे खेचणारे अनेक गावकरी असतात. ‘निरर्थक श्रम का करता?’ असे सांगून ते तुम्हाला हतोत्साहित करीत असतात. अशावेळी काम करणाºयांनी आपल्या कामात व्यग्र राहण्याची भूमिका घ्यायला हवी. तुम्ही लोकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून काम करीत राहिला तर तुमची काम करण्याची जिद्द बघून तुमच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येतात.’’

राज्यात कोकणात सर्वाधिक पाऊस पडतो. पण नियोजन नसल्यानेही सारे पाणी वाहून समुद्रात जाते. तेथेही उन्हाळ्यात विहिरी आटतात. गेल्या काही वर्षांत तर मार्च महिन्यापासूनच गावागावांत पाण्याचे दुर्भिक्ष असते. अशा बाबतीत राजकीय इच्छाशक्ती कितपत असते हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे ही परिस्थिती गावकरीच काही उपायांनी बदलू शकतात. काही भागात दत्ता पाटील यांचा हा अनुभव लक्षात घेऊन जलयुक्त शिवाराचे काम करणाºया तरुणांनी आपापल्या खेड्यात जलयुक्त शिवाराची कामे जर पूर्ण केली तर त्यांच्या भागातील जमिनीखालील पाण्याची पातळी उंचावण्यास वेळ लागणार नाही. हलगारा येथे दत्ता पाटील यांना मिळालेल्या यशाचा हाच संदेश
आहे.



(लेखक लोकमत वृत्तसमुहात समन्वयक संपादक आहेत)

Web Title: Jalajit Shiwar transforms the movement of 'Halgarga'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.