Jammu & Kashmir: जल्लोष कशासाठी? सुरक्षा दलांसमोरील आव्हाने वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 03:12 AM2019-08-06T03:12:01+5:302019-08-06T03:15:41+5:30

आम्ही किती ग्रेट आहोत, हे मोदी आणि शहा सांगत आहेत. मात्र, त्याची किंमत सुरक्षा दलांना मोजावी लागू शकते.

Jammu and Kashmir The challenges of security forces will increase after revoking article 370 | Jammu & Kashmir: जल्लोष कशासाठी? सुरक्षा दलांसमोरील आव्हाने वाढणार

Jammu & Kashmir: जल्लोष कशासाठी? सुरक्षा दलांसमोरील आव्हाने वाढणार

Next

- संजय नहार, सरहद संस्थेचे प्रमुख

सरकारने ३७० कलम ज्या पद्धतीने रद्द केले, ती पद्धत अवलंबिणे चुकीचे होते. काश्मीरमधील पुनर्वसनासाठी ८० हजार कोटींचे बजेट मंजूर झाले होते. सांस्कृतिक उपक्रम, मुलांना शिकविणे असे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. रा.स्व. संघ आणि भाजपशी संबंधित १००हून अधिक संघटना काश्मीरमध्ये कार्यरत आहेत.

काश्मीरचा प्रश्न समजून घ्यायचा असेल, तर १९२७ सालापर्यंत मागे जावे लागेल. तेव्हा ३७० कलमाची बीजे रोवली गेली. महाराजा हरिसिंग यांनी तेथील लोकांच्या विशेषत: काश्मिरी पंडितांच्या मागणीवरून हा कायदा आणला. त्याहीपेक्षा मागे जायचे झाल्यास, काश्मिरी लोक आपली स्वायत्तता, आपली ओळख जपण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतात. त्यांनी आपला इतिहास प्राणपणाने जतन करून ठेवला आहे. काश्मिरी माणसाने ही भावना कायम जपली आहे. जेव्हा-जेव्हा त्यांच्या ओळखीवर आक्रमण होते, तेव्हा पहिल्या टप्प्यात ते पराभूत होतात. बऱ्याचदा सहन करतात आणि संधी मिळेल तेव्हा व्यक्त होतात.
 



काश्मिरी लोक छोट्या-छोट्या गोष्टींनी दुखावले जातात. ते लहानशा गोष्टींनी आनंदीही होतात. मात्र, त्यांच्या भावनांशी कोणी खेळत आहे, असे वाटल्यास त्यास जशास तसे प्रत्युत्तर दिले जाते. आतापर्यंत भारतावर जितके हल्ले झाले, त्याची सर्व माहिती स्थानिक मेंढपाळांनी दिली आणि भारताला मदत केली. आता आपण काश्मिरी लोकांबाबत कठोर भाषा वापरत आहोत आणि पाकिस्तान सहानुभूती दाखवत आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन यांपैकी कोणताही देश आपला मित्र नाही. आत्मघातकी पथकातला एखादा तरुणही दहशतवादासंदर्भातील गणिते बदलवू शकतो. आपण आपल्या सुरक्षा दलांसमोरील आव्हाने आता वाढवली आहेत. आम्ही किती ग्रेट आहोत, हे मोदी आणि शहा सांगत आहेत. मात्र, त्याची किंमत सुरक्षा दलांना मोजावी लागू शकते. आजच्या निर्णयाबाबत आनंद व्यक्त करून, जल्लोष करून आपण काश्मिरी लोकांना आणखी दूर ढकलत आहोत. त्यांच्या भावनांशी आपण खेळलो नसतो, तर बरे झाले असते, असे मला वाटते.



काश्मीरचा वापर तात्पुरता यशस्वी होईल; मात्र आपण या घटनेची तुलना ऑपरेशन ब्लू स्टारशी केली पाहिजे. ऑपरेशन यशस्वी झाल्यावर संपूर्ण देशात जल्लोष झाला. मात्र, त्या घटनेचे काय परिणाम देशाला भोगावे लागले, हे विसरून चालणार नाही. आपण डास मारले आणि डबकी मात्र अस्वच्छच ठेवली, तर पुन:पुन्हा डास निर्माण होणारच. डास मारल्याचा आनंद मानायचा की डबकी अस्वच्छ ठेवायची? या निर्णयाची किंमत सुरक्षा दलांना, अर्थव्यवस्थेला भोगावी लागणार आहे. एकीकडे तालिबान्यांना, जगभरातील जिहादींना आपण संधी दिली आहे. कलम रद्द झाल्यामुळे भारतातील कोणतीही व्यक्ती काश्मीरमध्ये जमीन घेऊ शकेल; पण कायदा-सुव्यवस्थेचे काय? नक्षलवादी भागांमध्ये लोक जमिनी घेतात का? कायदा-सुव्यवस्था नसेल तर उद्योजक जमिनी घेतील का? याआधी जम्मूच्या लोकांना काश्मीरमध्ये जमिनी घेण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले का?



प्रत्यक्षात, बहुतांश काश्मिरी लोकांना ३७० कलमाशी काही देणेघेणे नाही. ‘आम्हाला शांततामय जीवन जगायचे आहे,’ एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे. काश्मीरमधील शांततेसाठी ३७० कलम काढून टाकणे कसे आवश्यक आहे, हे सरकारने कृतीतून दाखवून द्यायला हवे होते. हवामान खराब असल्याचे कारण देऊन पहिल्यांदा अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली. हवामान विभागाने ही शक्यता खोडून काढली. राम माधव यांनी काश्मीरमध्ये भाजपचा मेळावा घेतला आणि सांगितले की, ‘३७०, ३५ अ कलमांना धक्का लावला जाणार नाही. मेहबुबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला तुम्हाला भडकावण्यासाठी असे बोलत आहेत.’ या विधानाला आज भाजप काय उत्तर देईल?

Web Title: Jammu and Kashmir The challenges of security forces will increase after revoking article 370

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.