जनमन : प्रिय देवेंद्रजी, आता तुमचीच आस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 06:22 AM2021-04-14T06:22:15+5:302021-04-14T06:22:42+5:30

Janman: या लढ्यातील सैन्य ही जनता आहे आणि ती तुमच्यासोबत आहे, हे आश्वस्त करण्यासाठीच हा पत्रप्रपंच! 

Janman: Dear Devendraji, now it is your turn! | जनमन : प्रिय देवेंद्रजी, आता तुमचीच आस!

जनमन : प्रिय देवेंद्रजी, आता तुमचीच आस!

googlenewsNext

प्रिय हा शब्द मुद्दाम वापरतोय. कारण, अजून तरी दुसर्‍या कुणासाठी हा शब्द वापरावा, अशी स्थिती आज राज्यात नाही. ज्या पद्धतीचे कोरोनाचे व्यवस्थापन राज्यात चालले आहे, ही स्थिती नक्कीच भूषणावह नाही. आज आपण मुख्यमंत्री असता, तर  हे दिवस नक्कीच ओढवले नसते. (माझ्यावर भाजपधार्जिणा हा आरोप होईल, याची जाण आहे; पण स्पष्ट लिहू शकत नसलो तरी एवढेच सांगतो की, आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी आमची स्थिती झाली आहे.)

देवेंद्रजी पंधरा वर्षं तुमची आक्रमकता, तुमचा अभ्यासू बाणा आम्ही पाहिला आहे. कधी काळी आमच्या मित्रपक्षात तुम्ही होतात. आज राज्य होरपळत असताना तुम्ही गप्प का, तुमचा आक्रमक बाणा कुठे गेला, असा प्रश्न आमच्यासारख्या अनेकांना पडतो. काहींनी याचा अर्थ कदाचित पुन्हा नवीन समीकरणं जुळविण्यासाठी तुम्ही गप्प असाल, असाही लावला. अर्थात तरीही तुमच्या धैर्याचे कौतुकच करावे लागेल. असे अनेक आरोप होऊनही तुम्ही अभ्यासपूर्णच भूमिका घेता.

कोरोनाकाळात तुम्ही सरकारला पाठविलेली सर्व पत्रे  वाचली. तुम्ही सातत्याने विधायक सूचना करीत होतात. चाचण्या वाढवा असे सातत्याने सांगत होतात; पण सरकार ऐकायला तयार नव्हते. वर्ष उलटले पण, सरकारने चाचण्या एक लाखावर कधी नेल्या नाहीत. अख्ख्या सरकारने जेव्हा स्वत:ला घरात कोंडून घेतले, तेव्हा तुम्ही राज्यभर फिरत होतात. प्रत्येक दौर्‍यानंतर आढळलेल्या नोंदी तुम्ही सरकारला कळविल्या. कुणीही न सांगता तुम्ही हे करीत होतात. सरकारला आयते इनपुट्स मिळत होते; पण त्यांनी केवळ तुमच्यात विरोधी पक्षनेता पाहिला. खरे तर त्या काळातील सच्चे सहकारी तुम्हीच होतात.

आता लसीकरणावर राजकारण होत आहे. रेमडेसिविर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, साधे बेड या स्वत:च्या जबाबदारीवर सत्ताधारी बोलणार नाहीत, कारण ते अवघड जागेचे दुखणे आहे. महाराष्ट्र हे उघड्या डोळ्यांनी पाहतोय. कोण मैदानात आहे आणि कोण वाहिन्यांच्या बूमसमोर, हे लोकांना कळते. 

आज तीन पक्ष तुमच्यावर तुटून पडतील, कदाचित माध्यमेही सोबत नसतील; पण आम्ही तुमच्या क्षमता ओळखतो. तुम्ही एकटे ही लढाई नक्की जिंकाल, हा विश्वास आहे. इतिहास याची नोंद सुवर्णाक्षराने करेल. या लढ्यातील सैन्य ही जनता आहे आणि ती तुमच्यासोबत आहे, हे आश्वस्त करण्यासाठीच हा पत्रप्रपंच! 

- राहुल खोब्रागडे, तेल्हारा

Web Title: Janman: Dear Devendraji, now it is your turn!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.