‘जनता’ ते ‘परिवार’

By admin | Published: September 4, 2015 10:18 PM2015-09-04T22:18:47+5:302015-09-04T22:18:47+5:30

फक्त भिडू बदलले, पण खेळ मात्र तोच आहे. कदाचित म्हणूनच खेळखंडोबादेखील त्याच दिशेने होण्याची लक्षणे आहेत. इंदिरा गांधी यांनी लादलेल्या अंतर्गत आणीबाणीच्या

'Janta' to 'Family' | ‘जनता’ ते ‘परिवार’

‘जनता’ ते ‘परिवार’

Next

फक्त भिडू बदलले, पण खेळ मात्र तोच आहे. कदाचित म्हणूनच खेळखंडोबादेखील त्याच दिशेने होण्याची लक्षणे आहेत. इंदिरा गांधी यांनी लादलेल्या अंतर्गत आणीबाणीच्या आणि आणीबाणीतील कथित अत्त्याचारांच्या विरोधात काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी समस्त विरोधी पक्षांनी एकजूट करण्याचा एक खेळ ऐंशीच्या दशकात होऊन गेला. केवळ काँग्रेस आणि खरे तर इंदिरा विरोध हाच त्या खेळातील परवलीचा शब्द होता. वर्षानुवर्षे जे आपसात संघर्ष करीत होते, त्यांच्यात तात्कालिक कारणासाठी एकजूट झाली खरी, पण ती टिकाऊ ठरली नाही. तशी शक्यताही नव्हती. साहजिकच जनता पार्टी नावाच्या विळ्या-भोपळ्याच्या मोटेने सत्ता तर हस्तगत केली पण उणीपुरी तीन वर्षेदेखील ती या पक्षाला राबविता आली नाही. त्या आधीच जनता सरकार आणि जनता पार्टी यांची वासलात लागली. विशेष म्हणजे कोणत्याही राष्ट्रीय महत्वाच्या मुद्यावरुन मतभेद होऊन ही दुर्गती झाली नाही, हे विशेष. त्यानंतर तब्बल साडेतीन दशकांनंतर तेव्हांच्या जनता पार्टीतील भिडूंना बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येण्याचे आवाहन केले गेले व जनता परिवार नावाचे नवे कडबोळे आकारास आले. यावेळच्या कडबोळ्याचा परवलीचा शब्द भाजपा किंवा खरे तर मोदी हटाव असा आहे. यातील विचित्र योगायोग म्हणजे तेव्हां लक्ष्य बनलेली काँग्रेस या कडबोळ्यात आहे तर तेव्हां कडबोळ्यात असलेला तेव्हांचा जनसंघ व आजची भाजपा लक्ष्यस्थानी आहे. काँग्रेसदेखील आज एकटी नाही. राष्ट्रवादी नावाची वेगळी चूल तिच्यातूनच निर्माण झालेली आहे. पण ती आपले स्वतंत्र अस्तित्व राखून असल्याने तीदेखील कडबोळ्यात सहभागी झाली. परंतु प्रश्न जेव्हां जागावाटपाचा निर्माण झाला तेव्हां अपेक्षेनुसार तणातणी झाली व सर्वात आधी परिवाराचा त्याग करण्याचा पराक्रम राष्ट्रवादीने केला. त्यापाठोपाठ आता मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीनेही परिवाराचा त्याग केला आहे. जनता परिवाराला लोहियांचे अनुयायी असे बिरुद लावले गेले आहे. या अनुयायांमध्ये लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव, शरद यादव आणि नितीशकुमार यांचा प्रामुख्याने समावेश होतो. याचा अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसे या परिवारात परकेच होते. त्यामुळे राष्ट्रवादीने परिवाराची साथ सोडण्यात विशेष असे काही नाही. पण परिवाराचे एक प्रणेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलायमसिंह यांनी परिवाराचा आणि लोहियावादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहोदरांचा त्याग करावा हे विशेष आहे. मुलायमसिंह यांनी आता बिहारची निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी व मुलायम यांची समाजवादी पार्टी यांच्या रुसव्याचे वरवरचे कारण एकच व ते म्हणजे त्यांच्या पदरात टाकल्या गेलेल्या अवघ्या दोन आणि पाच जागा. राष्ट्रवादीला महाराष्ट्राखेरीज करुन अन्यत्र काहीही स्थान नसले तरी उत्तर प्रदेश हा मुलायमसिंह यांचा गड आहे व तिथे त्यांचा मुकाबला मायावती यांची बसपा व भाजपा यांच्याशी आहे. बिहारात त्यांना आणि त्यांच्या पक्षाला तसे फारसे स्थान नाही. पण आज आपण जनता परिवारात राहिलो तर उद्या आपल्या गडामध्ये लालूप्रसाद व नितीशकुमार येतील व तेही अधिकच्या जागांची मागणी करतील व त्या विशाल राज्याची सत्ता आपल्या हाती एकवटण्याचे आपले स्वप्न भंग पावू शकेल म्हणूनही मुलायम यांनी फारकतीचा निर्णय घेतला असावा. त्यातच त्यांची आणि केन्द्रातील रालोआच्या सरकारची व विशेषत: पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढत चालल्याचे दिसून येते आहे. संसदेचे नुकतेच वाया गेलेले पावसाळी अधिवेशन वाया जाऊ नये म्हणून मुलायम यांनी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेला उघड विरोध केला होता. त्याचबरोबर सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याचा आग्रह धरु नका, असाही त्यांचा स्पष्ट आग्रह होता. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना देशाच्या सत्तेत स्वारस्य आहे, विविध राज्यांच्या नाही, ही बाब मुलायम चांगलीच ओळखून असल्याने मोदींशी सलोखा निर्माण करुन आपला व आपल्या राज्याचा लाभ करुन घ्यावा असाही त्यांचा विचार असू शकतो. खुद्द शरद पवार यांनीदेखील वेळोवेळी अशीच भूमिका मांडली आहे की राज्य आणि केन्द्र यांच्यात मधुर संबंध असतील तरच राज्यांना आपला फायदा करुन घेणे शक्य होत असते. परिणामी आता परिवारात शिल्लक राहिले लालूप्रसाद, नितीशकुमार हे माजी आणि आजी मुख्यमंत्री व फारसा जनाधार नसलेली काँग्रेस. पण लालूप्रसाद उच्च वर्णीयांविरुद्ध मागासवर्गीय अशी फोड करुन उच्चवर्णियांच्या विरोधात जो विखारी प्रचार करीत आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षात स्थानिक पातळीवर मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. तरीही काँग्रेस तोंड दाबून बुक्क््यांचा मार सहन करीत राहील अशी लक्षणे आहेत. कारण लोहिया परिवार सोडून संघ परिवारात दाखल होणे तिला परवडणारे नाही. याचा अर्थ परिवारात किमान निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत तरी लालू आणि नितीश एकत्र राहतील असे आज गृहीत धरायला हरकत नाही. निकालानंतर काय होईल ते आज कोणालाच सांगता येणार नाही. सबब जे तेव्हांच्या ‘जनता’चे झाले तेच आजच्या ‘परिवारा’चे झाले तरी त्यात आश्चर्य नाही.

Web Title: 'Janta' to 'Family'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.