Japan: तरुणांनो, देशासाठी तरी मुलं जन्माला घाला!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 10:41 AM2023-01-30T10:41:20+5:302023-01-30T10:42:09+5:30
Japan : गेली अनेक वर्षं जपान या देशाला जी भीती भेडसावत होती ती अखेर जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी बोलून दाखवली. त्यांनी सांगितलं की, जपानी लोकसंख्येचा जन्मदर जर वाढला नाही, तर जपानचं एक राष्ट्र म्हणून अस्तित्व धोक्यात येईल.
गेली अनेक वर्षं जपान या देशाला जी भीती भेडसावत होती ती अखेर जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी बोलून दाखवली. त्यांनी सांगितलं की, जपानी लोकसंख्येचा जन्मदर जर वाढला नाही, तर जपानचं एक राष्ट्र म्हणून अस्तित्व धोक्यात येईल. जपानी तरुणांनी किमान देशासाठी तरी लग्न केलं पाहिजे आणि मुलांना जन्म दिला पाहिजे. असं सगळं किशिदा यांनी अतिशय कळकळीने बोलून दाखवलं. जगातल्या तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणाऱ्या जपानसमोर कुठलं आव्हान असेल असं बाहेरून बघताना कोणाला वाटतही नाही; मात्र जपानसमोर अतिशय बिकट आव्हान आहे आणि तेही लोकसंख्या कमी होण्याचं, तरुणांची देशातील संख्या वाढण्याचं!
सर्वसामान्यतः आशियाई देश म्हणजे जास्त लोकसंख्या, गर्दी, दाटीवाटी असं एक चित्र सगळ्यांच्या मनात असतं. जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारे भारत आणि चीन हे दोन देश आशिया खंडात येत असल्याने हे गृहीतक लोकांच्या मनात अजूनच पक्कं झालं आहे. लोकसंख्या कमी करण्यासाठी भारत आणि चीनने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने गेली अनेक वर्षं प्रयत्नही केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जपानमधील ही परिस्थिती धक्कादायक वाटते; परंतु जपानमध्ये ही परिस्थिती अचानक उद्भवलेली नाही.
गेली अनेक वर्षं जपानमधील लोकसंख्या सातत्याने कमी होते आहे; मात्र लोकसंख्या कमी होण्याच्या प्रमाणात त्यात वाढ झाली आहे. २०२०-२१ मध्ये जपानची लोकसंख्या जवळजवळ साडेसहा लाखांनी कमी झाली. हा आकडा तसा फार मोठा वाटत नाही; पण ज्या देशाची लोकसंख्या साडेबारा कोटी आहे, तिथे साडेसहा लाख हा मोठा आकडा ठरतो. विशेषतः जेव्हा दरवर्षीच लोकसंख्या कमी होत असते तेव्हा हा एकदा फारच मोठा वाटायला लागतो. सरकारी आकडेवारीनुसार जपानचा जननदर असाच कमी होत राहिला तर आज साडेबारा कोटी असणारी जपानची लोकसंख्या २०६५ साली आठ कोटी ऐंशी लाख इतकी कमी होईल. म्हणजे आजच्या जपानच्या लोकसंख्येपेक्षा तब्बल ३० टक्के कमी. तेही केवळ ४५ वर्षांत!
लोकसंख्या कमी होणं याचा अर्थ विविध क्षेत्रातील काम करणारी माणसं कमी होणं. अशीच जर माणसं कमी होत राहिली तर कुठल्याही देशापुढे अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहील. अशाने लोकसंख्येतील तरुण आणि वृद्ध माणसांचं प्रमाण व्यस्त होत जातं. आजच जपानच्या एकूण लोकसंख्येपैकी २८ टक्के लोक वृद्ध आहेत. या वृद्ध माणसांचा भार उचलणाऱ्या तरुणांची संख्या कमी होत गेली की सगळ्या समाजाचा तोल बिघडून जातो.
हे सगळं जपानमधील तरुण पिढीला कळत नसेल का? तर त्यांना अर्थातच हे सगळं समजतं आहे; पण तरीही त्यांना मुलं जन्माला घालण्याची भीती वाटते आहे. याचं कारण काही प्रमाणात आर्थिक, काही प्रमाणात राजकीय तर काही प्रमाणात सामाजिक आहे. जपानमधली एकूण अर्थव्यवस्था अशी आहे की, चांगलं आयुष्य जगण्यासाठी नवराबायको दोघांनाही काम करावं लागतं; मात्र जपानमधली सामाजिक परिस्थिती अशी आहे की मूल झाल्यानंतर आईने नोकरी सोडून घरी बसावं आणि मुलांना वाढवावं अशी समाजाची अपेक्षा असते. त्यात भर म्हणून जपानमध्ये जास्त वेळ काम करण्याला प्रतिष्ठा आहे. म्हणजेच जास्तीत जास्त वेळ कामाच्या ठिकाणी घालवणाऱ्या व्यक्तीकडे आदराने बघितलं जातं. अशावेळी कुटुंबासाठी वेळ देणं हे अधिकाधिक कठीण होतं. त्यातच भर पडते ती महागाईची.
जपानमध्ये शाळा, पाळणाघर, कॉलेज अतिशय खर्चिक आहे. पालकांवर या सगळ्याचा फार मोठा आर्थिक भार पडतो. अशा अनेक कारणांमुळे जपानी तरुण पालक होण्यासाठी फार उत्सुक नाहीत. त्यांना यात मदत व्हावी म्हणून किशिदा यांच्या सरकारने पालक होणाऱ्यांसाठी काही सवलती देण्याची घोषणा केली आहे. या योजनांमध्ये आणि सरकारी मदतीमध्ये सातत्याने वाढच होत आहे; पण तरीही त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. सरकारने एकूणच अर्थव्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं तरुण मंडळी म्हणतात; पण सरकार ते करेल यावर त्यांचा विश्वास मात्र उरलेला नाही. नुकतंच जपानच्या तारो आसो या माजी पंतप्रधानांनी असं विधान केलं होतं की, “जपानी महिला उशिरा लग्न करतात आणि त्यामुळे त्या पुरेशा मुलांना जन्म देऊ शकत नाहीत..”
‘कमी लोकसंख्येला महिला जबाबदार’!
जपानचा घटता जननदर हा प्रश्न सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आहे हे न स्वीकारता त्याचा दोष महिलांवर ठेवण्याची वृत्तीही जपानमध्ये वाढत आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिकच जटिल होईल. सध्या जपानचा जननदर १.३ आहे. म्हणजे एखादी स्त्री तिच्या आयुष्यात किती मुलांना जन्म देईल याची सरासरी. लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी जननदर २.१ असणं आवश्यक असतं.