हॅलो, इतकंच सांगतो, की मी गे आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 09:09 AM2023-08-29T09:09:31+5:302023-08-29T13:46:50+5:30

३४ वर्षांच्या शिंजिरोने २००५ मध्ये एएए या जपानी बँडबरोबर काम करायला सुरुवात केली. २०१६ पासून त्याने स्वतंत्रपणे गायक म्हणून करिअर करायला सुरुवात केली.

Japanese Popstar Shinjiro Atae : Hello, just saying, I'm gay! | हॅलो, इतकंच सांगतो, की मी गे आहे!

हॅलो, इतकंच सांगतो, की मी गे आहे!

googlenewsNext

शिंजिरो ऍटे हा जपानमधला अत्यंत लोकप्रिय पॉप सिंगर आहे. नुकताच त्याने एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला आलेल्या २००० लोकांसमोर त्याने असं जाहीर केलं, की तो ‘गे’ म्हणजेच समलिंगी  आहे. ३४ वर्षांच्या शिंजिरोने २००५ मध्ये एएए या जपानी बँडबरोबर काम करायला सुरुवात केली. २०१६ पासून त्याने स्वतंत्रपणे गायक म्हणून करिअर करायला सुरुवात केली. त्याने स्वतंत्र गायक म्हणून अगदी सुरुवातीलाच रियुनायटेड हे गाणं गायलं. ते गाणं जपानमध्ये आय ट्यून्समध्ये पहिल्या क्रमांकाचं हिट गाणं ठरलं. तेव्हापासून शिंजिरो हा जे-पॉपमधील एक आघाडीचा गायक आहे.

टोकियोमध्ये झालेल्या कार्यक्रमात तो प्रेक्षकांना म्हणाला, ‘मला तुम्हा सगळ्यांबद्दल आदर आहे. मला असं वाटतं, की मी आता जे सांगणार आहे, ते तुम्हाला इतर कोणाकडून समजण्यापेक्षा मीच थेट सांगावं. गेली अनेक वर्षे मी माझ्याच व्यक्तित्त्वाच्या एका भागाचा स्वीकार करायला धडपडत होतो. पण, मी ज्यातून गेलोय त्यानंतर अखेरीस हे तुम्हाला सांगण्याचं धाडस मी गोळा करू शकलो आहे. मी एक समलिंगी पुरुष आहे. मी हे स्पष्ट आणि जाहीरपणे सांगतोय कारण मला जो संघर्ष करावा लागला तो इतर लोकांना करावा लागू नये असं मला वाटतं.’ 

- शिंजिरोने हे विधान जपानमध्ये करण्याला एक विशेष महत्त्व आहे. कारण जपानमध्ये अजूनही समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. जपान हा देश जगातील सगळ्यात प्रगत समजल्या जाणाऱ्या जी-७ देशांच्या समूहातील एक देश! या समूहातील इतर सर्व देशांमध्ये समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता आहे. मात्र, जपानमध्ये अजूनही ती  मिळालेली नाही. जपान कितीही पुढारलेला आणि प्रगत असला, तरीही जपानी समाज मात्र त्यामानाने पारंपरिक विचार करतो. त्यामुळे देखील शिंजिरोने स्वतःची लैंगिकता उघड करणं महत्त्वाचं मानलं जात आहे.

कार्यक्रमात स्वतःची समलैंगिक ओळख जाहीर केल्यानंतर त्याने त्याच्या चाहत्यांना उद्देशून ट्विट्स केले. त्यात तो म्हणाला, ‘मी समलैंगिक आहे हे जाहीर करायला मला खूप वेळ लागला. मी ते स्वतःशी देखील मान्य करू शकत नव्हतो. पण, माझ्या हे लक्षात आलं आहे, की माझ्यासाठी आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठीही, ज्यात माझे चाहतेसुद्धा येतात, मी खरा कोण आहे हे नाकारत राहण्यापेक्षा आयुष्य प्रामाणिकपणे जगणं जास्त महत्त्वाचं आहे.  जे लोक माझ्यासारखा संघर्ष करताहेत त्यांना यातून बळ मिळेल आणि त्यांच्या हे लक्षात येईल की ते एकटे नाहीत, असं मला वाटतं! मी हा कार्यक्रम आयोजित केला कारण मला तुम्हा सगळ्यांना हे थेट सांगायचं होतं. मी जेव्हा माझ्या मनोरंजन विश्वातील कामाचा आणि मला ज्याबद्दल कृतज्ञता वाटते अशा सगळ्या गोष्टींचा विचार करतो त्यावेळी माझे चाहते सगळ्यात आधी माझ्या डोळ्यासमोर येतात.  मला साथ दिल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. या सर्व प्रक्रियेत माझ्याबरोबर उभे राहिल्याबद्दल माझं कुटुंब, मित्र-मैत्रिणी, माझे सहकारी आणि एएएमधील माझे सहकारी या सगळ्यांचे मी आभार मानतो.’

शिंजिरोने हे जाहीर करण्याबरोबरच त्याचं ‘इन टू द लाइट’ हे नवीन गाणं रिलीज केलं आहे. या गाण्यातून मिळणारे पैसे ‘प्राइड हाऊस टोकियो’ यांच्यासाठी दिले जातील असं त्याने जाहीर केलं आहे. प्राइड हाउस टोकियो हे जपानमधलं पहिलं कायमस्वरूपी एलजीबीटीक्यू सेंटर आहे. हे सेंटर २०२० मध्ये सुरू झालं आहे. त्याचबरोबर या गाण्याच्या विक्रीतून मिळणारे पैसे रेबिट (ReBit) या ग्रुपला सुद्धा देण्यात येतील. हा ग्रुप तरुण एलजीबीटीक्यू लोकांसाठी सपोर्ट ग्रुप म्हणून काम करतो.

शिजिरोने त्याच्या आयुष्यावरील डॉक्युमेंटरीची देखील घोषणा केली आहे. ही डॉक्युमेंटरी पीटर फॅरेली आणि फिशर स्टीव्हन्स या दोघांबरोबर  करण्यात येणार आहे. तिचं दिग्दर्शन कार्ली मँटीला-जॉर्डन आणि जॉन एलियट जॉर्डन हे दोघं मिळून करणार आहेत असंही त्याने जाहीर केलं. हे सगळे पैसे ज्यातून उभे राहणार आहेत ते ‘इन टू द लाइट’ हे गाणं ऑनलाइन स्ट्रीम होत आहे आणि लोक पैसे भरून ते धडाधड डाऊनलोड करत आहेत!

खूप मोठं धाडस आहे, कारण...
जपानसारख्या पारंपरिक मानसिकतेच्या देशात, लोकाश्रयावर जगणाऱ्या मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करत असताना स्वतःची समलैंगिकता जाहीर करून शिंजिरो ऍटे याने मोठं धाडस केलं आहे. त्याचबरोबर याच प्रकारचा संघर्ष करणाऱ्या इतरांना बळ मिळावं यासाठी आर्थिक मदत देऊ केली आहे. कदाचित समलैंगिक व्यक्तींकडे बघण्याच्या जपानच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणण्याची ही सुरुवात ठरेल.

Web Title: Japanese Popstar Shinjiro Atae : Hello, just saying, I'm gay!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.