जातविरहित स्त्रीमुक्ती चळवळ, स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:54 PM2017-10-25T23:54:24+5:302017-10-25T23:54:34+5:30
‘स्त्री शिकली तर आमची कुटुंब व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल’, असे कुजकट विचार स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत अग्रेसर असलेल्या एका राष्ट्रीय पुढा-याने व्यक्त केले होते.
‘स्त्री शिकली तर आमची कुटुंब व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल’, असे कुजकट विचार स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत अग्रेसर असलेल्या एका राष्ट्रीय पुढा-याने व्यक्त केले होते. त्यामुळे केवळ समाजच नाही तर समाज जागरणाची धुरा ज्यांच्यावर आहे अशी पुढारलेली माणसेदेखील महिलांबद्दल असे प्रतिगामी विचार करीत असल्याने स्त्रीमुक्तीच्या चळवळीला सुरुवातीपासूनच अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे. आजच्या अत्याधुनिक काळात स्त्री शिकली, किंबहुना पुरुषांपेक्षाही आज ती विविध क्षेत्रात अग्रेसर असली तरी आजही तिला लिंगभेदाच्या त्रासाला सामोरे जावे लागत असते. उच्चशिक्षित म्हणवून घेतलेल्या समाजातही त्यांना हा त्रास सहन करावा लागत असतो. अलीकडेच नागपुरात पार पडलेल्या महिला क्रांती परिषदेत या विषयावर व्यक्त झालेली चिंता आपण सा-यांनाच अंतर्मुख करणारी जशी आहे तशीच ती स्त्रीमुक्तीच्या चळवळीला पुढे नेणारी देखील आहे. अगदी पुराणकाळापासून समाजाने स्त्रियांवर दास्यत्व लादले आहे. महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतीमुळे स्त्रिया शिकल्या आणि सबंध देशात स्त्रीमुक्तीची चळवळ व्यापक झाली. पण अजूनही स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत नाही. स्त्री, मग ती कुठल्याही जातीची असो तिला लिंगभेद सहन करावाच लागतो. ती उच्च जातीची असेल तरी तिला हा त्रास होतोच. परंतु दलित समाजाच्या स्त्रीला होणारा त्रास हा तिहेरी स्वरुपाचा असतो. ती स्त्री आहे म्हणून कुटुंबात होणारा त्रास, दुसरा ती दलित आहे म्हणून आणि तिसरा ती गरीब आहे म्हणून. जातिव्यवस्थेमुळे भारतात लिंगभेदाचे स्वरूप भिन्न आहे. मात्र सर्वच जाती आणि स्तरातील स्त्रियांना हा छळ सहन करावाच लागतो. पण खेदाची बाब अशी की, स्त्रियांवर होणाºया अत्याचाराच्या प्रश्नांवरही जातीभेद आणि वर्णभेद पाळला जातोच. त्यामुळे लिंगभेदाविरुद्धच्या चळवळीत समस्त स्त्रीवर्ग एकवटू शकत नाही. गडचिरोली किंवा मेळघाटातील आदिवासी स्त्रियांचे प्रश्न स्वतंत्रपणे का चर्चिले जात नाही? ही चर्चा केवळ कुपोषण आणि नक्षलवादातून निर्माण होणाºया प्रश्नांभोवती का फिरत राहते? मजूर म्हणून काम करणाºया निरक्षर महिला किंवा कार्यालयात काम करणाºया उच्च शिक्षित महिला असो, या सर्वांना होणारा पुरुषी मानसिकतेचा त्रास हा सारखाच असतो. पण त्याची चर्चा एका व्यासपीठावर, एका आंदोलनातून होत नाही. एका जातीच्या महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत दुसºया जातीतील स्त्रियांचे मौन हा देखील एक गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे स्त्रीमुक्तीची चळवळ ही जातविरहित असणे नितांत गरजेचे आहे. नागपुरातील महिला क्रांती परिषदेतील चिंतनाचे हे सार आहे.