वाचनीय लेख - मानवी संवेदना जोपासणारे कलासक्त बाबूजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 07:07 AM2023-11-25T07:07:01+5:302023-11-25T07:07:47+5:30
‘लोकमत वृत्तसमूहा’चे संस्थापक संपादक, थोर स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांचा आज २६वा स्मृतिदिन ! त्यानिमित्त त्यांचं स्मरणचित्र!
उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची माणसं नेहमीच त्यांच्या कार्याच्या अन् आठवणींच्या रूपानं अजरामर ठरतात. भारत ही अशाच कर्तृत्ववान माणसांची खाण आहे. माझं आयुष्य अशा थोर माणसांच्या सहवासानं सुगंधित झालं आहे. किती किती नावं घ्यावीत? खरंच ती स्मरणीय आहेत. ‘लोकमत वृत्तसमूहा’चे संस्थापक संपादक, थोर स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा माझ्यासाठी असेच एक नाव.. आदर्श नेते अन् मानवी संवेदनांना अतिशय महत्त्व देणारा थोर माणूस.
स्वर्गीय बाबूजींच्या संवेदनशीलतेची, गरिबांबद्दल असलेल्या तळमळीची एक आठवण आज सांगावीशी वाटते. खरं तर मी त्यावेळी राजकारणात नव्हतो. मी एका हाउसिंग सोसायटीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामाचा विषय घेऊन बाबूजींकडे गेलो होतो. त्यावेळी ते हाउसिंग फायनान्सचे चेअरमन होते. माझे प्रश्न त्यांनी समजून घेतले. ती सोसायटी गरिबांची आहे, हे कळल्यानंतर त्यांनी ताबडतोब संबंधितांना सूचना दिल्या. गरीब अन् वंचितांचं भलं करण्यासाठी बाबूजींनी क्षणाचाही विलंब केला नाही. त्यामुळे अगदी पहिल्या भेटीतच मी त्यांच्या व्यक्तित्वाने प्रभावित झालो. त्यांच्याकडे ओढला गेलो.. पुढे आयुष्यभर बहरलेल्या एका वडीलधाऱ्या स्नेहाची ती सुरुवात आहे, हे मला त्यावेळी माहिती नव्हतं!
आनंद हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे, असं मला वाटतं. कोणत्याही स्थितीत माणसानं आनंदीच असलं पाहिजे; पण वस्तूत: हे प्रत्येकालाच कुठं जमतं? थोडं काही विपरीत घडलं की, अनेकांच्या चेहऱ्यावर त्याची प्रतिक्रिया उमटते; पण बाबूजींना मी कधीही निराश पाहिलंच नाही. राजकारणापलीकडे जीवनाचा आनंद आहे आणि तो उपभोगता आला पाहिजे, हे मी त्यांच्याकडूनच शिकत राहिलो. एखादी गोष्ट मनासारखी न झाल्यास ती किती मनाला लावून घ्यायची, याचं त्यांचं म्हणून एक गणित होतं, ते त्यानुसार सतत वागत असत. खरं तर राजकारणासारख्या क्षेत्रात राहून ही गोष्ट जमवणं कोणालाही अशक्यच वाटेल; पण बाबूजींना ती जीवनकला साधली होती, हे नक्की! म्हणूनच मी त्यांना राजकारणातलं आदर्श व्यक्तिमत्त्व मानतो.
स्वर्गीय बाबूजींनी राजकारणात अतिशय तल्लख बुद्धीने काम केलं. समाजकारणाशी राजकारणाची उत्तम सांगड घातली. बाबूजींचं वैशिष्ट्य असं की, त्यांनी एक सक्षम वृत्तसमूह उभा केला आणि ‘लोकमत’ या वृत्तपत्राला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व दिलं. स्वत:च्या राजकीय प्रचाराऐवजी समाजकारणाचं प्रमुख साधन बनवलं. ‘लोकमत’च्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा करण्यास प्राधान्य दिलं. आज हे वृत्तपत्र ज्या बळकट सामर्थ्यासह उभं आहे, त्या यशाचा पाया बाबूजींच्या दूरदृष्टीने रचलेला आहे, हे नि:संशय!
जवाहरलालजी अनेकांचे सच्चे मित्र होते. वसंतराव नाईक आणि त्यांची मैत्री अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे; पण एका राजकीय निर्णयात दूर व्हायची वेळ आल्यानंतर त्यांनी एका क्षणाचाही विचार केला नाही. राजकीय वाटा वेगळ्या झाल्या; पण वसंतराव नाईकांबरोबर असलेल्या त्यांच्या मैत्रीमध्ये मात्र तसूभरही अंतर निर्माण झालं नाही, हे विशेष. बॅ. ए. आर. अंतुले यांचे आणि बाबूजींचे चांगले संबंध होते. अंतुलेंनी काँग्रेसची साथ सोडली. मात्र, बाबूजींनी काँग्रेस आणि राजीवजींची साथ सोडली नाही. मलाही शरद पवार साहेबांनी राजकारणात आणलं; पण राजकीय निर्णय करताना मला गांधी घराण्यापासून वेगळं होता आलं नाही.
महात्मा गांधी यांच्या विचारांमुळेच स्वर्गीय बाबूजींनी स्वत:ला स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिलं. गांधीजींच्या विचारांवर असलेली त्यांची निष्ठा त्यांच्या पत्रकारितेतही प्रतिबिंबित झालेली दिसून येते. ही निष्ठा अन् विचार त्यांचे सुपुत्र विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांच्याकडेही वारसाहक्काने आलेली आहे.
जवाहरलालजींच्या कार्याचा अन् विचारांचा वारसा अबाधित असणं, याहून मोठी श्रद्धांजली ती दुसरी कोणती असू शकेल? त्यांचं आदर्श नेतृत्व अन् कार्याचा ठसा आजही महाराष्ट्रावर जसाच्या तसा आहे.. या थोर नेत्याला नमन!
(लेखक भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेत)