जिवाला जीव देणारी माणसं मिळवणारा माणूस!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 02:44 PM2022-07-02T14:44:42+5:302022-07-02T14:49:21+5:30
ते सर्वांना बरोबरीने वागवायचे. कोणाहीबद्दल त्यांच्या तोंडून कधीही चुकीचा शब्द गेला, असं मला आठवत नाही. राजकीय जीवनात बाबूजींनी पक्षनिष्ठेला अत्यंत महत्त्व दिलं. पंडितजी, इंदिराजी, राजीवजी या सर्वांनाच नव्हे, तर काँग्रेसच्या विचाराला साथ देऊन ते काँग्रेसच्या विचारांचा आधार बनले.
शिवराज पाटील-चाकूरकर, लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी केंद्रीय गृहमंत्री
जवाहरलाल दर्डा यांच्यामध्ये व्यवहारज्ञान, राजकीय ज्ञान, तंत्रज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान अशा चारही ज्ञानांचा सुरेख संगम मला सतत पाहायला मिळालेला आहे. जग बदलतंय, झपाट्यानं पुढे जातंय. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करून घेतलं नाही, तर आपण काळाच्या बाहेर फेकले जाऊ, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. पण, त्याचवेळी अध्यात्माने ज्या गोष्टी शिकवल्या आहेत, त्या गोष्टी त्यांनी मनस्वी आत्मसात केलेल्या होत्या. बाबूजी राजकीय नेते होते, मंत्री होते, ‘लोकमत’चे संस्थापक संपादक होते; पण त्यांनी कधीही मोठेपणाचा आव आणला नाही, मिरवला नाही आणि आपल्यासमोरचा दुसरा कोणी लहान आहे, असं त्यांनी कधीही मानलं नाही.
ते सर्वांना बरोबरीने वागवायचे. कोणाहीबद्दल त्यांच्या तोंडून कधीही चुकीचा शब्द गेला, असं मला आठवत नाही. राजकीय जीवनात बाबूजींनी पक्षनिष्ठेला अत्यंत महत्त्व दिलं. पंडितजी, इंदिराजी, राजीवजी या सर्वांनाच नव्हे, तर काँग्रेसच्या विचाराला साथ देऊन ते काँग्रेसच्या विचारांचा आधार बनले. यासाठी त्यांनी अत्यंत जवळचे मित्र, महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची राजकीय साथही सोडली; पण, काँग्रेसचा विचार सोडला नाही. यात त्यांची फार मोठी दूरदृष्टी होती. मी त्यांच्याच यवतमाळ गावी, त्यांच्याच घरी काँग्रेस प्रवेश केला होता. त्यावेळी हेमवतीनंदन बहुगुणाजी आले होते, त्यावेळपासून मी पाहातो आहे, या नेत्यानं कोणालाही नावं ठेवली नाहीत. त्यांची ही जीवननिष्ठा होती. बाबूजींनी सुरू केलेल्या ‘लोकमत’मधून कोणाचीही बदनामी अकारण त्यांनी केली नाही. त्याचमुळे ‘लोकमत’ सामान्यांचं वृत्तपत्र झालं. त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी जिवाला जीव देऊन काम करीत होते. अशा प्रकारचे सहकारी तयार करणं आणि त्यांना सांभाळण ही सोपी गोष्ट नव्हे, पण दर्डाजींना ते सहज जमलं होतं. ही कंपनी आपलीच आहे असं वातावरण तयार करण्याची क्षमता दर्डाजींमध्ये होती आणि हा संस्कारही अध्यात्माचा संस्कार आहे, असं मी मानतो. या संस्कारांमध्ये मानवता प्राधान्याने असते. त्या बळावरच उभे राहाते ते नेतृत्व अक्षय असते.
विजय दर्डा माझ्यासोबत राज्यसभेत होते. ते आणि त्यांचे बंधू राजेंद्र यांच्यावरील बाबूजींच्या संस्कारांचा ठसा मी सातत्याने पाहात आलो आहे. दर्डाजींच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांना मन:पूर्वक अभिवादन!