‘जेट’चे व्यावसायिक अपयश दुर्दैवी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 04:22 AM2019-04-27T04:22:06+5:302019-04-27T04:22:56+5:30
नवे ब्रॅण्ड येतात, जुने ब्रॅण्ड जातात. विशेषत: विमान कंपन्यांच्या बाबतीत ही गोष्ट वारंवार घडत आली आहे. पण जेट एअरवेजचे जाणे हे फारच हानिकारक ठरले आहे.
- संतोष देसाई
नवे ब्रॅण्ड येतात, जुने ब्रॅण्ड जातात. विशेषत: विमान कंपन्यांच्या बाबतीत ही गोष्ट वारंवार घडत आली आहे. पण जेट एअरवेजचे जाणे हे फारच हानिकारक ठरले आहे. त्याचा जन्मसुद्धा अर्थपूर्ण होता. केवळ विमान क्षेत्राची नव्हे तर देशाच्या प्रतिमेतही जेट एअरवेजने बदल घडवून आणला होता. त्याने लोकांना गुणवत्तापूर्ण प्रवास कसा असतो हे दाखवून दिले. अनेक वर्षे ही कंपनी अत्यंत विश्वसनीय कंपनी म्हणून नावाजली गेली. डोळे मिटून विश्वास ठेवावा अशी सेवा त्या कंपनीने लोकांना दिली. शेवटची काही वर्षे जेट एअरवेजसाठी आव्हानात्मक होती. पण कंपनीने अनेक लोकांच्या सदिच्छा मिळवल्या होत्या हेही खरे.
भारतात खासगी विमानसेवेचे आगमन झाले तेव्हा हा व्यवसाय व्यावसायिकांना आकर्षक वाटत होता, गेमचेंजर वाटत होता. खासगी क्षेत्रासाठी विमान प्रवासाचे क्षेत्र खुले होण्यापूर्वी हे क्षेत्र फारसे सुखावह नव्हते. त्या आठवणी त्रासदायक आहेत. विमानांचे वेळापत्रक पाळले जात नव्हते, किती उशीर होणार याची माहिती पुरविण्यात येत नव्हती, विमानतळांची अवस्था अत्यंत खराब होती. तेथील स्वच्छतागृहे अस्वच्छ असायची. विमान कंपन्यांचे कर्मचारी प्रवाशांना अत्यंत उपेक्षापूर्ण वागणूक द्यायचे. खाद्यपदार्थांचा दर्जा निकृष्ट असायचा. विमान प्रवासातील वाईट अनुभवांची यादी अशी लांबलचक होती. सरकारी कर्मचारी नागरिकांना जशी तुच्छतापूर्ण वागणूक देत असतात, तशीच वागणूक प्रवाशांना मिळत होती. त्या तुलनेत खासगी विमान कंपन्यांचा कारभार चांगला होता. त्यांनी लोकांना समृद्ध प्रवास कसा असतो हे दाखवून दिले. सुरुवातीच्या काळात प्रवाशांना प्रवासात मद्यसुद्धा दिले जायचे! खासगी कंपन्या वाढल्या तशी प्रवाशांना चांगल्या सोयी देण्याची स्पर्धा सुरू झाली. खाद्यपदार्थांची तर चंगळ असायची. त्यामुळे प्रवासी गोंधळूनसुद्धा गेले होते. खासगी क्षेत्राला हवाई प्रवासाचे क्षेत्र खुले झाल्यावर विमानतळांच्या दर्जातही वाढ झाली. त्यामुळे लोकांना सुखद अनुभव मिळू लागला.
अर्थात त्या काळात या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांना सुरुवातीच्या काळात खूप धक्के सोसावे लागले. या क्षेत्राविषयी पुरेशी माहिती न घेताच त्यातील भपक्याला भुलून या क्षेत्राकडे वळलेल्या अनेकांची लवकरच गच्छंती झाली. मोदीलुफ्ट, दमानिया, ईस्टवेस्ट, एनईपीसी, जॅगसन, अर्चना ही काही नावे सांगता येतील. त्यांचा लवकरच अस्त झाला. त्या मानाने सहारा, एअर डेक्कन आणि किंगफिशर या कंपन्यांनी अधिक काळ टिकाव धरला. पण कालांतराने त्यासुद्धा पडद्याआड गेल्या. काही कंपन्यांचे या क्षेत्रातून जाणे वादळ निर्माण करून गेले! अशा परिस्थितीत जेट एअरवेजने अनेक संकटांना तोंड देत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
सुरुवातीपासूनच जेटने व्यावसायिकतेचे दर्शन घडवले. प्रवाशांना काय हवे आहे हे ओळखून ते देण्याचा प्रयत्न जेटने केला. आपल्या नावातून त्याने विशेष काही सुचविण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच त्या ब्रॅण्डने वरकरणी खूप काही देण्याचा देखावा केला नाही. पण त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पोषाख प्रोफेशनल पद्धतीचा होता. वागणूक शालीन होती, खाद्यपदार्थ चांगले असत, याशिवाय विमानतळावर काम करणारे कर्मचारी प्रवाशांची दखल घेत त्यांना उत्तम सेवा देत होते. जेटने विमान प्रवास सुलभ व सुखावह केला. किंगफिशरप्रमाणे जेटच्या व्यवहारात बडेजाव नव्हता, तसेच इंडिगो एअरलाइन्सची चमकही नव्हती. पण त्यांनी लोकांना उच्च दर्जाचा सुखद प्रवास कसा मिळेल याची सतत काळजी वाहिली. एक मध्यममार्गी विमानसेवा या नात्याने जेटने चांगली कामगिरी बजावली.
ग्राहकांना तुच्छ समजायचे हीच भारतात अनेकांची प्रथा होती. त्या तुलनेत जेटने उत्तम सेवेचा आदर्श सर्वांसमोर ठेवला. पूर्वी तुम्ही कोण आहात हे पाहून सेवा पुरविली जात असे. व्हीआयपींना उत्तम सेवा आणि सामान्यांना निकृष्ट सेवा ही पूर्वी पद्धत होती. सेवा मागणाऱ्याने पैसे मोजायचे आणि सेवा देणाऱ्याने योग्यता पाहून सेवा द्यायची हा पूर्वी मंत्र होता. आपली ओळख असेल तरच आपल्याकडे लक्ष पुरविले जायचे. पण वैद्यकीय आणि न्यायिक सेवेत कौटुंबिक परिचय ही गोष्ट अधिक महत्त्वाची असायची. पण जेटसारख्या ब्रॅण्डने या संकल्पनेत आमूलाग्र बदल घडवून आणला आणि लोकांना प्रोफेशनल सेवा काय असते हे दाखवून दिले! भारताचा स्वत:वरचा विश्वास दृढ करण्याचे काम जेटसारख्या ब्रॅण्डने केले. स्पर्धात्मक जगात जागतिक दर्जाची सेवा देणे हे एक आव्हानच होते. जेटने ते आव्हान समर्थपणे पेलले!
आज डोमेस्टिक विमान प्रवासाचा विचार केला तर प्रगत देशांमध्ये भारताचा क्रमांक बराच वर लागू शकेल. पण विमान प्रवासाच्या क्षेत्रातील यशोगाथा म्हणून जेट एअरवेजच्या आजवरच्या प्रवासाकडे बघितले जात असतानाच त्या कंपनीची अखेर व्हावी हे दुर्दैव म्हणावे लागेल. वास्तविक जेट एअरवेज कंपनीचा ब्रॅण्ड अजूनही उत्कृष्ट आहे, पण त्यांना व्यवसाय करण्यात अपयश आले आहे! त्या कंपनीचे जे काही झाले त्याबद्दल एअरलाइन्स आणि तिचे व्यवस्थापनच दोषी आहे. पण लोकांना चांगली सेवा देणारी, चांगल्या कर्मचाऱ्यांचा ठेवा असलेली ही कंपनी या ना त्या स्वरूपात पुनरुज्जीवित व्हावी, अशीच तिच्या चाहत्यांची अपेक्षा राहील.
(लेखक अर्थ-उद्योगाचे अभ्यासक आहेत)