झारखंड व काश्मीरचा कौल
By admin | Published: December 24, 2014 03:15 AM2014-12-24T03:15:47+5:302014-12-24T03:15:47+5:30
झारखंडमध्ये भाजपाला बहुमत मिळाले असले तरी व जम्मू आणि काश्मीर निवडणुकांचे निकाल भाजपाला फारसे प्रसन्न करणारे नाहीत.
झारखंडमध्ये भाजपाला बहुमत मिळाले असले तरी व जम्मू आणि काश्मीर निवडणुकांचे निकाल भाजपाला फारसे प्रसन्न करणारे नाहीत. झारखंड हे राज्य आपण प्रचंड बहुमताने ताब्यात आणू, हा त्याचा आशावाद विफल ठरला आहे. भाजपाखालोखाल त्या राज्यात परवापर्यंत सत्तेत असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाने जागा मिळविल्या आहेत. जम्मू आणि काश्मिरात मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीने सर्वाधिक जागा जिंकल्या असून, त्या पक्षाला काँग्रेस किंवा नॅशनल कॉन्फरन्स यांच्या मदतीनेच सत्तेत येणे जमणार आहे. या राज्यात भाजपाचे मिशन ४४ हे अभियान अपयशी ठरले आहे. येथे भाजपाला अपेक्षेहून अधिक जागा मिळाल्या असल्या, तरी सत्तेपासून तो पक्ष बराच दूर आहे. जम्मू- काश्मीरची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आपल्या कार्यक्रमपत्रिकेत अनेक बदल केले होते. ३७० या कलमाविषयी त्या राज्यात भाजपाने एकही शब्द उच्चारला नाही किंवा काश्मिरी पंडितांची बाजूही त्याने उचलून धरली नाही. ज्या राज्यात जशी राजकीय हवा असेल, तसे पवित्रे घेणे, हा राजकारणातला खेळ भाजपाने या दोन्ही राज्यांत खेळून पाहिला आहे. झारखंडमध्ये आपला पक्ष प्रचंड बहुमत मिळविल, अशी आशा त्या पक्षाने बाळगली होती. प्रसिद्धी माध्यमांनीही अशाच बातम्या प्रकाशित केल्या होत्या. शिबू सोरेन किंवा त्यांचे चिरंजीव हेमंत सोरेन यांची आतापर्यंतची तेथील कारकीर्द फारशी लोकप्रिय नव्हती. काँग्रेसने आरंभापासूनच ही निवडणूक गमावल्यागत लढविली होती. मात्र, झारखंडमधील जमातींची संख्या व त्यांची व्यूहरचना सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाला अनुकूल अशी होती. भाजपाने त्या राज्यात प्रचाराची पराकाष्ठा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, सुषमा स्वराज, अरुण जेटलींसह केंद्रातले अनेक मंत्री व पक्षाचे पुढारी त्या राज्यात तळ ठोकून बसले होते. त्यामुळेच त्याच्या जागा वाढून त्याला बहुमतापर्यंत पोहोचणे जमले आहे. जम्मू आणि काश्मिरात मुसलमान समाज बहुसंख्येने असल्यामुळे आणि भाजपाची प्रतिमा मुस्लिमविरोधी असल्यामुळे त्या राज्यात त्या पक्षाला फार जागा मिळतील, अशी अपेक्षा कुणी बाळगली नव्हती. तरीही मोदींचा आक्रमक प्रचार आणि सत्तारूढ नॅशनल कॉन्फरन्सची निराशाजनक कामगिरी या बळावर त्या पक्षाला आपल्या जागा बऱ्यापैकी वाढविता आल्या. या निवडणुकीत मुसलमान समाजाचे अनेक गट आपल्यासोबत आणण्याची कवायतही भाजपाने केली होती. त्यासाठी एकेकाळचे फुटीरवादी नेते लोन यांच्याशी त्या पक्षाने बोलणीही केली होती. मात्र, मुफ्तींचा पीपल्स डेमॉक्रेटिक आणि फारुक अब्दुल्लांचा नॅशनल कॉन्फरन्स हे दोन पक्ष काश्मिरात मजबूत आहेत आणि त्यापैकी नॅशनल कॉन्फरन्सच्या जागा कमी झाल्या असल्या, तरी त्या मुफ्तींच्या पक्षाच्या बाजूला गेलेल्या दिसल्या आहेत. मुफ्ती मोहम्मद सईद हे एकेकाळी काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदावर राहिलेले नेते आहेत. फारुक अब्दुल्ला व त्यांचे चिरंजीव ओमर अब्दुल्ला यांनीही त्या राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. काँग्रेस हा पक्षही काश्मिरात मजबूत असून, त्याच्याकडेही त्या राज्याचे मुख्यमंत्रिपद काही काळ राहिले आहे. एवढ्या सगळ्या मजबूत पक्षांना व तेथील बहुसंख्य मुस्लिम मतदारांना तोंड देऊन आपल्या जागा वाढविणे, हे भाजपासमोरचे आव्हान होते. ते त्याने बऱ्यापैकी पेलले असले, तरी विधानसभेतील बहुमत त्याच्यापासून स्वप्नासारखे दूर राहिले आहे. केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून देशात झालेल्या बहुतेक निवडणुका भाजपाने जिंकल्या आहेत. अनेक राज्यांत त्याची मंत्रिमंडळेही अधिकारारूढ झाली आहेत. ज्या सहजपणे पूर्वीची राज्ये जिंकली, त्यामुळे काश्मिरातील निवडणुकाही आपण बऱ्यापैकी जिंकू, असे भाजपाच्या नेतृत्वाला वाटले. पण ही सोपी गोष्ट नव्हती. दिल्लीच्या सरकारने गेल्या २०० दिवसांत आपल्या अपेक्षा म्हणाव्या तशा पूर्ण केल्या नाहीत, अशी एक भावना जनतेत निर्माण होत आहे. त्याच्या जोडीला संघ परिवाराने चालविलेला अल्पसंख्यविरोधी प्रचारही ती भावना वाढीला लावायला कारणीभूत झाला आहे. त्याचा परिणाम झारखंडमध्ये फारसा दिसला नसला तरी या परिवाराची गैरहिंदूंविषयीची
विरोधी भूमिका जम्मू आणि काश्मीर राज्यांतील भाजपाच्या विस्ताराला अटकाव करण्यास कारणीभूत झाली असणे
शक्य आहे. भाजपाने झारखंडच्या निवडणुकीत यश मिळवून त्याच्याविषयीच्या अपेक्षा आणखी वाढविल्या आहेत. आता या अपेक्षा कितपत पूर्ण होतात ते पाहायचे!