फुकटात ‘जिओ’ चालणार नाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 07:03 AM2018-08-28T07:03:20+5:302018-08-28T07:03:37+5:30
कालच्या रविवारची गोष्ट. राखी पौर्णिमा असल्याने सकाळपासून भावा-बहिणीच्या नात्याची महती सांगणाऱ्या मेसेजेस्चा व्हॉट्अपवर अक्षरश: पूर आला होता.
कालच्या रविवारची गोष्ट. राखी पौर्णिमा असल्याने सकाळपासून भावा-बहिणीच्या नात्याची महती सांगणाऱ्या मेसेजेस्चा व्हॉट्अपवर अक्षरश: पूर आला होता. त्यामुळे विरंगुळ्यासाठी म्हणून टी.व्ही आॅन केला. समोर बघतो तर काय, टीव्हीच्या पडद्यावर चित्रांऐवजी काळ्या मुंग्या! चारदोनदा टीव्ही चालू-बंद करून पाहिला, रिमोट आपटून बघितला, केबल चेक केली; परंतु तरीही ‘ब्लॅकआऊट’ कायम!
‘अगं केबलवाल्याचे पैसे दिलेस ना?’ गृहमंत्र्यांसमोर आम्ही शंका उपस्थित केली. ‘अहो कालच तर दिलेत नं तुम्ही सहा महिन्यांचे आगाऊ!’ सौ.च्या या उत्तराने आमची पुरती गाळण उडाली. केबलच्या कंट्रोलरूमची वीज गेली असेल कदाचित, म्हणून आम्ही टीव्ही बंद करून टाकला अन् समोर टेबलावर पडलेलं वर्तमानपत्र उघडलं.
सिनेमा-नाटकांच्या जाहिराती, टेरेस गार्डन, स्विमिंग पूल, स्पा, बार, जीम इ. सुविधा असलेल्या आलिशान फ्लॅट्सवर आलेल्या आॅफर्स बघून झाल्यानंतर (जाहिराती बघायला कुठे पैसे पडतात!!) आम्ही बातम्यांवर नजर फिरवली. ‘डिजिटल इंडियात केबल फुकटात देणार असाल, तर भाज्या आणि पेट्रोल-डिझेलही फुकटात द्या- सेना प्रमुखांची मागणी’ या बातमीनं आमचं लक्ष वेधून घेतलं. बातमीच्या शीर्षकातच ‘केबल’ असा शब्द असल्याने आम्ही ती मुळासकट वाचून काढली. पण ‘जिओ’, ‘धंदा’, ‘फुकटात’ आणि ‘उपासमार’ असे परस्परविसंगत शब्द असल्याने आमचा पुरता गोंधळ उडाला. एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘तूम जिओ हजारो साल...’ म्हणण्याची आपल्याकडे प्रथा आहे. त्यामुळे ‘जिओ’मुळे उपासमारीची पाळी कशी येईल? जर कुणी फुकटात देत असेल तर देणाºयांचा ‘धंदा’ बसेल की नाही? मग इतरांनी उगीच कशाला काळजीत पडायचं? मराठी माणूस इथेच मागे पडतो! आपणही धंद्यात पडायचं नाही अन् इतरांनाही पडू द्यायचं नाही. डिजिटल इंडियामुळे अनेकांना घरबसल्या रोजगार मिळाला आहे. इतरांच्या बँक खात्यातील पैसे बिनबोभाट आपल्या खात्यात वळवून रात्रीतून अनेकजण करोडपती झाले. पण तिथेही मराठी माणूस मागेच. आजवर एकही मराठी माणूस बँकांना गंडवून परदेशात पळून गेल्याचे ऐकिवात नाही. मराठी युवकांना असे ‘स्कील इंडिया’चे प्रशिक्षण देण्याऐवजी जिओ टीव्हीला विरोध करून सेना-मनसेला काय ‘मिळणार’ आहे? जिओची केबल आपल्या टीव्हीला लागणार असेल तर लागू देत की! बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंतचा सगळा ‘खुल्लमखुल्ला’ मामला घरबसल्या अन् तोही फुकटात बघायला मिळेल. पण सेनाचालकांना असली फुकटेगिरी अजिबात मान्य नाही म्हणे! जिओला त्यांचा ठाम विरोध असल्याचे वाचून आमच्या मनसुब्यांवर पाणीच पडले. रविवार असल्याने टीव्हीवरील रिपीट एपिसोड बघण्यासाठी इकडे ‘सौ’ची आवराआवर सुरू होती. त्यामुळं केबलचालकाला फोन करणे भाग होते. केबल का बंद आहे? ते कधी सुरू होणार? जिओला सेनेचा विरोध का? निवडणुकीत भाषणं दाखवली जाणार नाहीत अशी भीती वाटते, की फक्त भाजपाचा प्रचार केला जाईल अशी शंका आहे? मनात आलेले असे असंख्य प्रश्न केलबचालकाला विचारणार तोच पलीकडून ‘जय महाराष्टÑ!’ म्हणून फोन ठेवून दिला गेला. कुणी फुकटात जिओ म्हटले तर भलतेच महागात पडते!
- नंदकिशोर पाटील