जिगीषा : सर्जनाच्या चाळिशीची सदाबहार आणि ‘तरुण’ गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 09:12 AM2023-05-11T09:12:29+5:302023-05-11T09:12:39+5:30
प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी यांच्या नेतृत्त्वाखाली काही तरुण रंगकर्मी औरंगाबादहून मुंबईत गेले. तो सांस्कृतिक इतिहास आज ४० वर्षांचा होतो आहे..
दासू वैद्य, कवी, लेखक
एक टुमदार गाव. गावात पाण्याचं दुर्भिक्ष्य. पुरेसा पाऊस पडायचा नाही. लोक त्रस्त होते. सगळ्या शक्यता संपल्या. शेवटी गावाबाहेरच्या डोंगरावर जाऊन प्रार्थना करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. सारेच डोंगराकडे निघाले. मोठ्या माणसांच्या गर्दीत एक छोटा मुलगाही चालत होता. त्याच्या हातात चक्क छत्री होती. पावसाचा टिपूस नाही आणि हा मुलगा छत्री घेऊन का आला असेल? - सगळ्यांच्या मनातला प्रश्न न राहवून एकाने विचारलाच. छत्री सावरत मुलगा म्हणाला, ‘मी मनापासून प्रार्थना केल्यावर पाऊस येणारच. मग, अशावेळी छत्री लागेलच ना!’
- असाच दुर्दम्य आत्मविश्वास घेऊन प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी नाटक करण्याकरिता औरंगाबादहून (छत्रपती संभाजीनगर) मुंबईत गेले आणि त्याचा एक सांस्कृतिक इतिहास झाला. तो इतिहास आज चाळीस वर्षांचा झाला आहे. नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच माध्यमांत स्वत:ची नाममुद्रा उमटवणारी ‘जिगीषा’ ही नाट्यसंस्था आता जिगीषा प्रा. लि. झाली आहे. जिगीषाने अनेक दर्जेदार कलाकृती देऊन रसिकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. चांगले नाटककार, दिग्दर्शक, गीतकार, अभिनेते, अभिनेत्री, व्यवस्थापक निर्माण केले. चाळीस वर्षांपूर्वी औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात समविचारी मित्र - मैत्रिणींचा एक ग्रुप तयार झाला. वक्तृत्व, वाद-विवाद, कथाकथन, एकांकिका स्पर्धांमुळे संवाद वाढला, मैत्री झाली, त्याचं रुपांतर नाट्यसहवासात झालं. या तरुण कलावंतांनी प्रेक्षक सभासद योजना करून वेगवेगळी १२ नाटकं सादर केली. ही एक प्रयोगशील कार्यशाळाच होती. ‘स्त्री’ सारख्या पथनाट्याचे १२५ प्रयोग केले.
या प्रात्यक्षिकानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात नाटकाचं रीतसर प्रशिक्षण घेतलं. ध्यास आणि श्वास एक झाला होता. या भिरभिऱ्या दिवसांत प्रशांत दळवी आणि चंदू कुलकर्णीला ‘लोकमत’मधील नोकरीचा मोठा आधार होता. दरम्यानच्या काळात या बिननावाच्या ग्रुपला नाव मिळालं ‘जिगीषा’! (नाव ठेवणाऱ्या ‘आत्याबाई’ होत्या, शुभांगी संगवई - गोखले.) ‘जिगीषा’ला औरंगाबादचं अवकाश कमी पडू लागलं. प्रशांत दळवीच्या कल्पनेतून जिगीषाचे रंगकर्मी मुंबईच्या महासागरात पोहायला तयार झाले. पहिली उडी प्रशांतने मारली. पाठोपाठ चंद्रकांत कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर, प्रतिमा जोशी, अभय जोशी, श्रीपाद पद्माकर, मिलिंद सफई, जितू कुलकर्णी, मिलिंद जोशी नंतर आशुतोष भालेराव, समीर पाटील अशी जिगीषाची मांदियाळी मुंबईच्या रंगमंचावर काम करू लागली. नियोजनबद्ध आखणी करून काम सुरू झालं. मनापासून केलेला रियाज व प्रयोगांचा अनुभव गाठीला होताच. आज दर्जेदार कलाकृतीचा जिगीषा हा ब्रॅण्ड झाला आहे.
- याआधीही मराठवाड्यातून मुंबईत गेलेल्या कलावंतांनी स्वतंत्रपणे नाममुद्रा उमटलेली आहे. पण, एखादा रंगकर्मींचा अख्खा ग्रुपच मुंबईला सामूहिक स्थलांतर करतो आणि स्वतःचं स्थान निर्माण करतो, असं उदाहरण एकमेव असावं.
डॉक्टर तुम्हीसुद्धा, चारचौघी, गांधी विरूद्ध गांधी, ध्यानीमनी, चाहुल, सेलिब्रेशन, गेट वेल सून, त्रिनाट्यधारा, हॅम्लेट, संज्या-छाया अशा नाटकांनी रंगभूमीची परिमाणंच बदलून टाकली. गंभीर आशय असलेल्या प्रयोगशील नाटकांनाही व्यावसायिक यश मिळू शकतं, हे सप्रयोग सिद्ध करण्यात चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, अजित दळवी यांचा वाटा मोठा आहे. ‘चारचौघी’सारखं वैचारिक नाटक एकतीस वर्षांनंतर रंगभूमीवर येऊन हाऊसफुल्ल होतं, ही रंगभूमीला उर्जा देणारी घटना! ९ तासांची त्रिनाट्यधारा रंगमंचावर आणण्याचं धाडस करण्याचं बळ चंदू कुलकर्णीला जिगीषानंच दिलेलं असतं. तीच गोष्ट चित्रपटाची. ‘बिनधास्त’सारखा धोधो चालणारा चित्रपट केल्यावर त्या साच्यात न अडकता, ‘भेट’, ‘कायद्याचं बोला’, ‘कदाचित’, ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’सारखे आशयघन चित्रपट प्रेक्षकांनीही मन:पूर्वक स्वीकारले. ‘पिंपळपान’सारखी बहुचर्चित मालिका असेल किंवा वर्तमानावर विनोदी ढंगानं भाष्य करणारी ‘टिकल ते पोलिटिकल’सारखी लोकप्रिय मालिका असेल... एबीपी माझा वृत्तवाहिनीवर प्रथमच जिगीषाने निखळ मनोव्यापारावर आधारित ‘मन सुध्द तुझं’ ही मालिका सादर केली. जिगीषाने पाडलेले नवनवे पायंडे पुढे रूढ होत गेले. संस्था असो की व्यक्ती, चाळीशी हा तसा महत्त्वाचा टप्पा. संस्था त्यातल्या त्यात नाट्यसंस्था म्हटल्यावर शुभारंभाचा नारळ फुटतो तेव्हाच नाट्यसंस्था दुभंगते, हे विधान अतिशयोक्त वाटलं तरी कपोलकल्पित नाही. अनेक दिग्गज नाट्यसंस्थांना फुटीचा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर एखादी नाट्यसंस्था चाळीस वर्षे ऊर्जित अवस्थेत ठेवणं, हा दुर्मीळ योग आहे. सर्जनाच्या रियाजात असलेली जिगीषा अधिक परिपक्व होऊन नित्यनूतन होत गेली. अनेक गुणवंतांना सामावून घेत जिगीषाचा परिवार वाढतोच आहे.
शाळेच्या वर्गात उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यासारखा जिगीषात माझा प्रवेश झाला. कविता लिहिणारा मी, जिगीषामुळे काव्य शाबूत ठेवून गीतलेखन करू शकलो. प्रत्येकातील शक्यतांना वाव देताना जिगीषाच्या सर्जनाचं अवकाश विस्तारित होत राहो..