ज्ञानव्रती क्रांतिसूर्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 03:39 AM2018-04-14T03:39:21+5:302018-04-14T03:39:21+5:30

ज्यांची ग्रंथभूक कधीही शांत न होणारी होती, ते ज्ञानव्रती म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भारताचे संविधान हा सुद्धा या ज्ञानव्रताचाच एक भाग आहे.

 Jnanavati Revolutionary! | ज्ञानव्रती क्रांतिसूर्य!

ज्ञानव्रती क्रांतिसूर्य!

googlenewsNext

-प्रा. अरुण ब. मैड
ज्यांची ग्रंथभूक कधीही शांत न होणारी होती, ते ज्ञानव्रती म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भारताचे संविधान हा सुद्धा या ज्ञानव्रताचाच एक भाग आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी महु येथे जन्मलेल्या या ज्ञानसागराची गर्जना ६ डिसेंबर १९५६ रोजी थांबली; पण त्यांच्या ज्ञानाने उसळलेल्या लाटा जगाला सदैव प्रेरणा देत राहतील.
रामजी सकपाळ व माता भीमाबाई यांचे बाबासाहेब हे चौदावे रत्न होय. समुद्रमंथनातून निघालेले चौदावे रत्न म्हणजे भयंकर प्रलयंकारी हलाहल. हजारो वर्ष अन्याय, अत्याचाराच्या कर्दमात सडत पडलेल्या अस्पृश्य समाजाला या चौदाव्या रत्नाने आपल्या विद्वत्तेने, झुंजारवृत्तीने नवसंजीवनी दिली आहे. भारतरत्न बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ या वर्षी महू येथे झाला. सुभेदार रामजी सकपाळांची छावणी तेव्हा महू येथे होती. रामजी सकपाळ ज्या सैन्याच्या तुकडीत होते, त्याच तुकडीत सुभेदार मेजर धर्माजी मुरबाडकर हे होते. दोघेही कोकणातले असल्यामुळे दोघांची लवकर मैत्री जमली. मुरबाडकरांचे राहणीमान श्रीमंती थाटाचे तर रामजींकडे बौद्धिक आध्यात्मिक श्रीमंती भरपूर. रामजींचा सात्विक, मनमिळावू स्वभावही धर्माजींना आवडला. परिणामी रामजींना आपला जावई करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. लग्नही झाले; परंतु रामजींची गरिबी आड आली. मुरबाडकरांच्या कुटुंबाने रामजींची पत्नी भीमाबार्इंशी अबोला धरला. माहेरचा अबोला पाहून स्वाभिमानी भीमाबाई काय ते समजल्या. त्यांनी कुटुंबीयांसमोर प्रतिज्ञा केली, ‘दागिने वाळत घालण्याऐवढी श्रीमंती येईल, तेव्हाच माहेरच्या घरी मुरबाडला पाऊल टाकीन, तो पर्यंत नाही!’
सकपाळ कुटुंब सर्वच कष्टाळू, उद्योगप्रिय. रामजींचा पगार फारच तुटपुंजा. घरात वर्षा दीडवर्षातच पाळणा हालत होता. चौदा मुले झाली. काही बालपणीच वारली. त्यामुळे घरात सतत ओढाताण. करारी भीमाबाई हरल्या नाहीत. तेव्हा सांताक्रुझला सैन्याची छावणी होती. जवळच रस्त्याचे काम चालू होते. भीमाबाईंना तिथे खडी पसरण्याचे मजुरीचे काम मिळाले. भीमाबार्इंनी रस्ता श्रीमंतांच्या गाड्यांसाठी तयार केला; पण त्या माऊलीला काय माहीत तिचा लाडका भीमा भारत सरकारचा मंत्री होऊन भविष्यात याच मुंबईच्या रस्त्यावरून भल्या मोठ्या गाडीतून याच रस्त्यावरून जाणार आहे. धन्य ती माता आणि धन्य तिचा कर्तृत्वसंपन्न पुत्र!
प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीत असताना त्या शाळेत एक आंबेडकर नावाचे ब्राह्मण शिक्षक होते. त्यांना भीमाबद्दल अत्यंत आपुलकी होती. ते भीमाला घरची भाजीभाकरी देत असत. एक दिवस आंबेडकर गुरुजी भीमाला म्हणाले, ‘तुझे आंबावडेकर हे नाव मला योग्य वाटत नाही. माझे नाव आंबेडकर आहे, त्याप्रमाणे तुझे नाव आंबेडकर ठेवू या.’
आंबेडकर गुरुजींनी भीमाला ही आयुष्यभर पुरणारी गुरूदक्षिणा देऊन गेले. वयाच्या सहाव्या वर्षी आई भीमाबाईंचे निधन झाले. वडील रामजींचे उत्तम संस्कार व मुलांच्या शिक्षणासाठी सर्वस्व ओतण्याची तयारी, त्यामुळे आईविना पोरका झालेल्या भीमाला बालवयातच उत्तम वाचनाची आवड लागली होती. बालवयातच भीमा पुस्तकासाठी हट्ट करू लागला; पण रामजी कधी नाही म्हणाले नाहीत. पुस्तकासाठी पैसे नसत मग ते मुलीकडे जाऊन एखादा दागिना आणीत. तो गहाण ठेवून भीमाचा हट्ट पुरा करीत. अशाप्रकारे एक आदर्श पिता व एक आदर्श पुत्र यांची उत्तम सांगड तयार झाली होती.
रामजींच्या मते हे सर्व प्राचीन विद्येचे प्रवेशद्वार संस्कृत आहे; परंतु अस्पृश्यांच्या मुलांना संस्कृत कोणी शिकवीनात. रामजी सुभेदारांनी घरच्या घरी मुलांना संस्कृत शिकविले. अशाप्रकारे भीमाची वाचनभूक प्रचंड वाढली होती. त्यांच्याच नात्यातील सुदामबाबा सकपाळ भीमाच्या वाचनवेडाची बालपणीची एक आठवण सांगतात. सुभेदार रामजींचे कुटुंब त्यांच्या मोठ्या मुलाच्या, आनंदच्या लग्नासाठी मुंबईहून बोटीने गावी आले होते. विवाह महाड तालुक्यातील गोमेडी गावातील लक्ष्मी साळवे यांच्याबरोबर ठरला होता. सकपाळांचे वºहाड गोमेडीला मुलीच्या गावी जायला निघाले; पण या गर्दीत छोटा भीमा कुठेच दिसेना. तेव्हा ते काळजीने सर्वत्र चौकशी करू लागले. इतक्यात त्यांच्याच गल्लीतील महिला पार्वती कासरुंग रानातून लाकडाची मोळी घेऊन येताना दिसली. वºहाडकरी मंडळींचा गलका ऐकून ती म्हणाली, ‘भीमाला शोधता व्हंय, त्यो काय मारुतीच्या देवळापुढं बुकं वाचित बसलाय!’ भावाच्या लग्नात नवे कपडे घालून सवंगड्यांबरोबर खेळण्यापेक्षा पुस्तकात रमणारा भीमा हा जगावेगळाच! भावी आयुष्यात कठोर ज्ञानतपश्चर्या करण्याची ही बालवयातली सुरुवात होती.
बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याप्रत्यर्थ त्यांचा कौतुक समारंभ आयोजित केला होता. त्या समारंभास पाहुणे म्हणून कृष्णाजी अर्जुन केळुस्कर हे विचारवंत हजर होते. त्यांनी भीमाचे कौतुक तर केलेच व स्वत: लिहिलेले गौतमबुद्धाचे चरित्र त्यास भेट दिले. समारंभानंतर भीमाला परदेशात पाठविण्याबद्दल त्यांच्या मनात काही योजना त्यांनी रामजींना बोलून दाखविली. त्याप्रमाणे बडोदा नरेश एकदा मुंबईत आले असता केळुस्करांनी ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली व त्यांचा होकार मिळविला. बडोदा नरेशांची शिष्यवृत्ती जाहीर होताच बाबासाहेब स्वदेशातील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. अमेरिकेत जाण्यापूर्वी दोन महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. रामजींचे निधन झाले होते व बाबासाहेबांचे लग्न झाले होते. अमेरिकेत असताना ते अत्यंत काटकसरीत राहत. जेवण साधे घेऊन ते पैसे वाचवून घरी पत्नीला पाठवित. दररोज अठरा तास अभ्यास करून त्यांनी ‘प्राचीन भारतातील व्यापार’ या विषयावर निबंध लिहिला व तो प्रबंध मान्य होऊन त्यांना एम.ए.ची पदवी मिळाली. यानंतर बाबासाहेबांनी ‘भारताच्या राष्टÑीय नफ्याचा वाटा’ या विषयावर कोलंबिया विद्यापीठात प्रबंध सादर केला व ‘डॉक्टर आॅफ फिलोसॉफी’ ही पदवी प्राप्त केली.
काटकसरीत परदेशात राहून वाचलेल्या पैशातून त्यांनी जुन्या पुस्तकाच्या दुकानातून दोन हजार ग्रंथ खरेदी केले. भारतात येणाऱ्या मित्राकडे ते ग्रंथ सोपविले; पण पहिल्या महायुद्धाच्या धामधुमीत त्या पेट्या-ग्रंथ समुद्रात स्वाहा झाले.
एकदा एका गृहस्थाचा ग्रंथसंग्रह विक्रीस काढल्याची बातमी बाबासाहेबांना समजली किंवा त्यांचे ग्रंथप्रेम पाहून ती जाणीवपूर्वक पोहोचविली होती. संग्रह बराच मोठा होता. प्रत्येक ग्रंथाला सहा रुपये प्रमाणे विक्रेत्याने भाव ठरविला होता. बाबासाहेब पटकन म्हणाले, ‘ग्रंथ न बघता मी प्रत्येकी दोन रुपयाप्रमाणे मूल्य देईल’ विक्रेता हो म्हणाला आणि ते सारे ग्रंथ बाबासाहेबांच्या राजगृहात येऊन पोहोचले.

Web Title:  Jnanavati Revolutionary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.