नोकऱ्या कमी होतील; पण मागणाऱ्याला काम मिळेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 07:48 AM2021-12-21T07:48:50+5:302021-12-21T07:49:43+5:30
चांगले काम मिळवणे, फावला वेळ बाजूला काढणे आणि मनासारखे जगण्यासाठी अर्थप्राप्ती करणे या तिन्ही गोष्टी ‘गिग नोकरी’मुळे साध्य होऊ शकतात!
डॉ. एस. एस. मंठा
गिग ही संगीताच्या प्रत्यक्ष सादर होणाऱ्या कार्यक्रमाविषयी वापरली जाणारी बोलीभाषेतली संज्ञा. गायक किंवा कलावंतांचा संच त्यात बिदागी देऊन आणला जातो. असे कार्यक्रम रस्त्यावर, टाऊन हॉल, बार किंवा स्टेडियममध्ये सादर होतात. ते औपचारिक, अनौपचारिक, तिकीट लावून किंवा मोफत होत असतात. व्यापक अर्थाने गिग म्हणजे पैसे मोजून तात्पुरते विकत घेतलेले काम आणि रोजगार. जागतिक अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आता गिग झाला आहे. संगीताच्या कार्यक्रमात जसे कलावंताला पैसे दिले जातात त्याप्रमाणे गिग अर्थव्यवस्थेत डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एखादे काम करून देणाऱ्याला पैसे दिले जातात. कामात लवचीकता आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवणे, हा हेतू गिग अर्थव्यवस्थेच्या प्लॅटफॉर्ममागे असतो.
तुम्ही जर फ्रीलान्स टॅक्सी चालकाला बोलावले, सुटी घालवण्यासाठी भाड्याने हॉटेल रूम बुक केले, ॲपवरून खाद्यपदार्थ किंवा घरी तयार केलेली कलाकुसरीची वस्तू मागवली तर त्याचा अर्थ तुम्ही गिग अर्थव्यवस्थेचा भाग झालात. घर, मोटार, बोट, वाहनतळ, पिअर टू पिअर वस्तू शेअर करणे, वाहतुकीसंबंधी सवारी, कारपुलिंग, रेस्टॉरंट डिलिव्हरी, वस्तू पोहोचवणे, व्यावसायिक सेवा, आरेखन, कोडिंग, लेखन, भाषांतर, प्रशासकीय, हस्तकला, बालसंगोपन, शिकवण्या, पाळीव प्राण्यांशी संबंधित सेवा या सगळ्या गिग अर्थव्यवस्थेचा भाग आहेत.
उबेर, ओलासारखी टॅक्सी बुक करून देणारी, अन्नपदार्थ घरपोच आणून देणारी झोमॅटो, स्विगी, डॉमिनो तसेच ९९ एकर्स, मॅजिक ब्रिक्स, नो ब्रोकर ही ॲप्स डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत. थोड्या वेळासाठी मुक्त सेवा देणाऱ्यांचा वापर करून ते ग्राहक गाठतात. उत्पादनशीलता आणि रोजगार वाढवण्यासाठी उपयोगी पडणारी गिग अर्थव्यवस्था जोमाने वाढते आहे. देशातल्या ९० टक्के असंघटित क्षेत्राचा ती भाग आहे. या अनौपचारिक क्षेत्रात किमान वेतनाची संकल्पना नाही. तसेच कामाची हमीही नाही. बांधकाम मजूर, घरकाम करणारे, वेश्या, बेघर, पथारीवाले, घरातली अन्य कामे करून देणारे हे सगळे गिग वर्कर्स होत. यापुढे एकाच मालकासाठी नऊ ते पाच नोकरी किंवा कंपनीच्या पगारपत्रकावर असणे आवश्यक असेल काय? स्वतंत्रपणे एकेक नोकरी करून विविध उत्पन्न स्रोत चालवणे गिग अर्थव्यवस्थेमुळे शक्य होत आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचा अहवाल सांगतो, गिग अर्थव्यवस्था भारतात ९ कोटी लोकांना रोजगार देऊ शकते.
ही व्यवस्था लक्ष वेधून का घेते आहे? पहिले म्हणजे या व्यवस्थेतले व्यवहार वर्षाला १७ टक्क्यांनी वाढतील अशी अपेक्षा आहे. उत्पादनशीलता आणि रोजगार वाढवते, हा गिग अर्थव्यवस्थेचा दुसरा फायदा आहे. मात्र, बाजार नियंत्रण, स्पर्धा कर आणि कामगार धोरणे या बाबतीत मात्र ही व्यवस्था कमकुवत आहे. ग्राहक आणि कामगारांच्या हक्क संरक्षणाचे प्रश्नही आहेत. सरकार गिग कामगारांना मदत करू शकेल का? सामाजिक हेतूने कदाचित काही प्रमाणात हस्तक्षेप करू शकेल. गिग व्यवस्थेत सामाजिक सुरक्षा वा अन्य फायदे नाहीत. या पार्श्वभूमीवर अनौपचारिक क्षेत्रातील कर्मचाऱ्याना निवृत्ती वेतन ही चांगली कल्पना ठरेल.
दियान मल्की यांनी गिग अर्थव्यवस्थेवर एक पुस्तक लिहिले आहे. चांगले काम मिळवणे, अधिक फावला वेळ बाजूला काढणे आणि हवे तसे जगण्यासाठी अर्थप्राप्ती करणे, यासाठी ते मार्गदर्शन करते. त्यांच्या मते, तुमच्याकडे किती गाड्या, घरे, किती पैसा आहे, याला नव्हे तर तुम्ही कसे जगता, प्रेम करता आणि डिजिटल रक्कम कशी खर्च करता, याला येत्या काळात महत्त्व असणार आहे.