जोडी फॉस्टर आणि बच्चन वगैरे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2017 11:48 PM2017-02-28T23:48:54+5:302017-02-28T23:48:54+5:30

जोडी फॉस्टर आणि मायकेल जे फॉक्स हे हॉलीवूड आणि इंग्रजी चित्रपटसृष्टीतले आघाडीचे अभिनेते कलावंत आहेत.

Jodie Foster and Bachchan etc ... | जोडी फॉस्टर आणि बच्चन वगैरे...

जोडी फॉस्टर आणि बच्चन वगैरे...

Next


जोडी फॉस्टर आणि मायकेल जे फॉक्स हे हॉलीवूड आणि इंग्रजी चित्रपटसृष्टीतले आघाडीचे अभिनेते कलावंत आहेत. त्यांच्या नावावर अनेक गाजलेले चित्रपट आहेत आणि त्यांना अनेकवार आॅस्कर पुरस्कारांचा सन्मान मिळाला आहे. चित्रपटांच्या तारकामय आयुष्यात राहिलेले हे कलावंत राजकीय वा सामाजिक विषयांवर याआधी कधी बोलताना दिसले नाहीत. ‘पण आता आम्हाला राहवत नाही म्हणून आम्ही जनतेच्या प्रश्नावर बोलायला या व्यासपीठावर आलो आहोत’, असे सांगून परवा त्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्त्रीविरोधी, कामगारविरोधी, मेक्सिकोविरोधी, अमेरिकन कृष्णवर्णीयांविरोधी, विदेशी रहिवाशांविरोधी आणि मूलत: मानवी अधिकारांविरुद्ध जाणाऱ्या धोरणांच्या विरोधात सामान्य नागरिक म्हणून बोलण्याचा अधिकार बजावला. ‘आमच्या वाट्याला रसिकांनी व जगाने जेवढे भरभरून दिले त्याची उतराई म्हणून आता आम्हाला त्यांच्या वतीने बोलणे आवश्यक आहे’ असे या संदर्भातील त्या दोघांचे म्हणणे आहे. ‘आमच्या विरोधाचा परिणाम कदाचित मोठा होणार नाही; पण नागरिकांच्या अधिकारांची पायमल्ली होत असताना आमच्या सारख्यांनी गप्प राहणे हा अपराध आहे’ असे ते म्हणाले. वर ‘धर्म, वर्ण, राष्ट्र आणि प्रादेशिकता यांच्या नावावर संकुचित राजकारण उभे करणाऱ्यांनी जगात व अमेरिकेत वाढविलेली असहिष्णुता सहन होण्याजोगी राहिली नाही’ असे सांगत त्यांनी ट्रम्प यांच्या एकारलेल्या व स्वत:खेरीज इतरांना तुच्छ व अमेरिकाविरोधी ठरविण्याच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. जन्माने कॅनेडियन असलेल्या फॉक्सने २० वर्षांपूर्वी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. मात्र आता त्याला अमेरिकाच परकी वाटू लागली आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या नजरेत ते विदेशी वंशाचे म्हणून देशविरोधी ठरणारे आहेत. वास्तव हे की अमेरिका हा देश जगभरातून आलेल्या कृतिशील निर्वासितांनी, प्रतिभावंतांनी व कलावंतांनी घडविला आहे. त्यांचे हे ऐतिहासिक दायित्व विसरणे हा कृतघ्नपणा आहे असे सांगत जोडी आणि फॉक्स यांनी लॉस एन्जेलिस या शहरात सरकारच्या असहिष्णू धोरणाविरुद्ध झालेल्या सामान्य नागरिकांच्या आंदोलनात भाग घेतला. त्यांचे कौतुक करायचे ते यासाठी की पायाशी प्रचंड संपत्ती व डोक्यावर जागतिक कीर्तीचा संभार असताना त्याकडे पाठ फिरवून ते सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी सरकारविरुद्ध भूमिका घेऊन उभे राहिले. त्यांचा कोणता पक्ष नाही आणि त्यांना नेते होण्याची अभिलाषाही नाही. तरीही केवळ मानवी हक्कांचे दमन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आणि लोकशाही मूल्यांचे ट्रम्प यांनी चालविलेले हनन याविरुद्ध सामान्य माणूस म्हणून ते उभे राहिले आहेत. भारतासाठी हे अप्रूप आहे. आपले अभिनेते व कलावंतही प्रचंड पैसा मिळवितात, विलासात जगतात, श्रीमंत आणि धनवंतांच्या रांगेत दिसतात, झालेच तर ते सिनेमा वा नाटकात लेखकाने लिहून दिलेली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व मानवी अधिकारांची भाषा तोंडपाठ म्हणून दाखवितात. पण त्या मूल्यांच्या बाजूने उभे राहण्याची ताकद त्यांच्यातल्या कोणाला दाखवता येत नाही. नाही म्हणायला त्यांच्यातले काही सामाजिक आंदोलनात भाग घेतात, स्त्रियांच्या अधिकारांच्या बाजूने बोलतात; पण बाकी सारे ‘सरकारी प्रवक्ते, प्रचारक वा जाहिरातीतले मुखवटे’ होऊन नाचायला आणि पैसे घ्यायलाच सिद्ध असतात. असहिष्णुता वाढविणाऱ्या, धर्मांध व जातीय भूमिका घेणाऱ्या सरकारचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ बनतात आणि नेत्यांभोवती घुटमळतानाही दिसतात. रोहित वेमुला, दादरीचे कांड किंवा शर्मिला इरोम ही प्रकरणे अलीकडची आहेत. दाभोलकर-पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्त्याही आताच्या आहेत. यातली पहिली नावे काहीशी राजकीय व सामाजिक, तर दुसरी कलावंत व कार्यकर्त्या लेखकांची आहेत. मात्र त्यांच्यासाठी दोन अश्रू ढाळावे असे शाहरूख ते आमीर आणि अमिताभ ते कपूरपर्यंतच्या कुणाला कधी वाटले नाही. त्यामुळे बाबरीचा विध्वंस, दिल्लीतले शिखांचे आणि गुजरातमधील मुसलमानांचे हत्त्याकांड त्यांच्यापर्यंत पोहचले नसेल तर तो त्यांच्या नसलेल्या समाजभानाचा वा खोट्या सामाजिकतेचा भाग मानला पाहिजे. जोडी फॉस्टर म्हणते, ‘कला हा लोकजीवनाचा भाग आहे. आणि लोकजीवन मुक्त असेल तर त्याच बळावर कलाही मुक्त राहत असते. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहणे ही कलावंत म्हणविणाऱ्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.’ ही जबाबदारी अमेरिकी कलावंतात दिसली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ती जर्मनीत आढळली, इंग्लंडमध्येही ती दिसते. आताच्या सीरियात ग्रीक व अफगाण लेखक-लेखिकांत आढळते. फक्त ती आपल्या, जगातली सर्वात मोठ्या व महान लोकशाहीतील कलावंतांत कुठे दिसत नाही. आपण उंच झालो मात्र प्रगल्भ झालो नाही याची ही अनुभूती आहे. सरकार नावाची पक्षीय यंत्रणाही मग अशा कलावंतांना वेठीला धरून त्यांच्याकरवी आपल्या राजकारणाचा प्रचार यशस्वीपणे करून घेते. गजेंद्र चौहान किंवा पंकज निहलानी यासारख्या विकाऊ माणसांचा विचार येथे महत्त्वाचा नाही. पण अमिताभ बच्चन आणि हेमामालिनीसारखे लोक अशावेळी मूग गिळून असतात आणि सरकारची वाजंत्री बनतात ही बाब कोणत्याही स्वातंत्र्यवादी माणसाला व्यथित करून जाते.

Web Title: Jodie Foster and Bachchan etc ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.