जगभर: जाता जाताही बायडेन यांची गुन्हेगार मुलाला 'माफी'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 07:33 IST2024-12-25T07:29:45+5:302024-12-25T07:33:47+5:30

जगात बहुतांश देशांच्या राष्ट्राध्यक्षांना 'माफीचा अधिकार' आहे

Joe Biden granted full pardon to son Hunter Biden who was accused of very serious crimes | जगभर: जाता जाताही बायडेन यांची गुन्हेगार मुलाला 'माफी'!

जगभर: जाता जाताही बायडेन यांची गुन्हेगार मुलाला 'माफी'!

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सुरुवातीपासूनच चर्चेत आणि वादात राहिले. त्यांच्या काही वादग्रस्त निर्णयांमुळे तसंच त्यांचं शारीरिक, मानसिक स्वास्थ्य, त्यांचा विसरभोळेपणा, राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचं वय.. अशा कारणांनी बराच काळ ते लोकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाळ आता फक्त काही दिवस शिल्लक आहे. अशा परिस्थितीतही त्यांना वादापासून दूर राहता आलं नाही. आताचा मुद्दा आहे, तो त्यांचं पुत्रप्रेम. 

जगात बहुतांश देशांच्या राष्ट्राध्यक्षांना 'माफीचा अधिकार' आहे. त्यांना फाशीच्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्याचा अधिकार असतो. भारतीय राष्ट्रपतींनाही तसा अधिकार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मात्र याबाबतचे अधिकार बन्यापैकी जास्त आहेत. ते गंभीर गुन्ह्यांत अडकलेल्या गुन्हेगारांची फाशी तर माफ करू शकतातच, पण इतरही अनेक गुन्हेगारांची शिक्षा माफ करू शकतात. न्यायालयही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही.

बाकी बऱ्याच देशांत खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, गुन्हेगारांना शिक्षा जाहीर केल्यानंतरच त्यांची शिक्षा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपतींना माफ करता येते, पण अमेरिकेत ज्या गुन्हेगारांवरचा खटला अजून पूर्ण झालेला नाही, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, अशा 'गुन्हेगारांनाही' आपल्या अखत्यारीत आधीच माफ करून टाकण्याची 'ताकद' राष्ट्राध्यक्षांच्या हाती आहे. आपल्या या अधिकाराचा उपयोग करून बायडेन यांनी काही दिवसांपूर्वीच फाशीच्या ४० गुन्हेगारांपैकी ३७ गुन्हेगारांची फाशी माफ करून टाकली. 

यावरून बायडेन आणि ट्रम्प यांच्यात मतभेद असले तरी यावरून फारसं वादळ उठलं नाही, पण अतिशय गंभीर गुन्ह्यांत आरोपी असलेला बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन यालाही बायडेन यांनी संपूर्ण माफी दिली. हंटर फाशीच्या गुन्ह्याचा आरोपी नसला, तरी गेली अनेक वर्षे त्याच्यावर अत्यंत गंभीर असे गुन्हे आणि आरोप नोंदवले गेले आहेत. राष्ट्राध्यक्षपदी आल्यापासून बायडेन सातत्यानं सांगत होते, आपल्या मुलाला आपण कधीही पाठीशी घालणार नाही, त्याला कोणतीही सूट देणार नाही, पण आपल्या कारकिर्दीचे अगदी थोडे दिवस शिल्लक राहिले असताना आणि हंटर यालाही शिक्षा सुनावली जाण्यास बोटांवर मोजण्याइतकेच दिवस राहिले असताना त्यांनी हंटरला 'क्लीन चिट' दिली.

 यावरून केवळ ट्रम्पच नव्हे, तर त्यांच्याच देशातील जनतेनंही बायडेन यांच्यावर कडवी टीका केली आहे. ट्रम्प यांनी तर थेटच म्हटलं, हा कसला न्याय? याला न्याय म्हणतात? हा तर सरळसरळ आपल्या अधिकारांचा दुरुपयोग आहे. बायडेन यांनी न्यायाचाच गर्भपात केला आहे.


इंटरवर अनेक गंभीर आरोप आहेत. व्यापाराच्या निमित्तानं हंटरनं चीनशी आपले 'लागेबांधे' जोडले आहेत. टॅक्स घोटाळा आणि मनी लॉड्रिंगमध्येही तो अडकला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कारकिर्दीपासूनच हंटर अनेक घोटाळ्यांत अडकला होता. तेव्हापासूनच त्याच्यावर अनेक आरोप होत आहेत. चीनबरोबर हंटरनं ज्या व्यापारी 'डील' केल्या, त्यामुळे अमेरिकेचं खूप मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जातंय. टॅक्स चोरी प्रकरणातील त्यानं केलेल्या कथित घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. आणखी एक मोठा आरोप हंटरवर आहे, तो म्हणजे गन खरेदीचा. ज्यांना नशिल्या पदार्थांची लत लागलेली आहे, त्यांना अमेरिकेत बंदुकीचा, शास्त्रास्त्र खरेदीचा परवाना दिला जात नाही, पण २०१८मध्ये गन खरेदी करताना इंटरनं शपथपत्रावर लिहून दिलं की मी कोणत्याही नशिल्या पदार्थांचं सेवन करत नाही, वस्तुस्थिती मात्र त्याच्या अगदी उलट होती.

टॅक्स चोरी प्रकरणात १७ वर्षांची, तर गन खरेदी प्रकरणात २५ वर्षांपर्यंतची शिक्षा हंटरला होऊ शकली असती, असा अंदाज होता. पण आता इंटरवरील सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेलाच रोक लागेल. न्यायालयही हंटरला शिक्षा देऊ शकणार नाही. आरोपीला शिक्षा देण्याचं काम न्यायालयाचं आहे, त्यामुळे त्यात मी काहीही हस्तक्षेप करणार नाही, असं बायडेन म्हणाले होते, पण तसं होऊ शकलं नाही. राजकीय कारणांनी इंटरला त्यात गोवण्यात आलं, असं म्हणत बायडेन यांनीही शेवटी 'राजकारण'च केलं. 'पुत्रप्रेम' त्यांनाही शेवटी चुकलं नाहीच..

क्लिंटन, ट्रम्प यांनीही दिली होती माफी! 

'प्रेसिडेन्शियल पाईनचा दुरुपयोग झाल्याची याआधीचीही बरीच उदाहरणं आहेत. या अधिकारातून अनेक राष्ट्राध्यक्षांनी आपल्या गुन्हेगार कुटुंबियांना, नातेवाइकांना माफी मिळवून दिली. २००१मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी आपल्या इग्ज संदर्भातील आरोपी भावाला माफी दिली होती. ट्रम्प यांनीही चौकशी सुरू असलेल्या उद्योगपतींना माफी दिली होती, पण बायडेन यांनी अत्यंत गंभीर आरोपी असलेल्या आपल्या मुलालाच दोषमुक्त करत या सर्वांवर कडी केली!
 

Web Title: Joe Biden granted full pardon to son Hunter Biden who was accused of very serious crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.