पत्रकारिता पुरे झाली, आता शेती करीन...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 10:56 AM2024-11-08T10:56:16+5:302024-11-08T11:01:49+5:30
Journalism: ‘पत्रकारिता करण्यापेक्षा मी यापुढे शेती करणं पसंत करेन’ हे उद्गार आहेत मीच दारा या पत्रकाराचे. कंबोडिया देशातील या पत्रकाराने आपल्या साहसी पत्रकारितेद्वारे संपूर्ण जगात स्वत:ची ओळख तयार केली. लोकांची आर्थिक फसवणूक करणारे सायबर गुन्हे, औद्योगिक क्षेत्रातील घोटाळे, मानवी तस्करी हे विषय दाराने ऐरणीवर आणले.
‘पत्रकारिता करण्यापेक्षा मी यापुढे शेती करणं पसंत करेन’ हे उद्गार आहेत मीच दारा या पत्रकाराचे. कंबोडिया देशातील या पत्रकाराने आपल्या साहसी पत्रकारितेद्वारे संपूर्ण जगात स्वत:ची ओळख तयार केली. लोकांची आर्थिक फसवणूक करणारे सायबर गुन्हे, औद्योगिक क्षेत्रातील घोटाळे, मानवी तस्करी हे विषय दाराने ऐरणीवर आणले. बऱ्याच प्रकरणांमध्ये कंबोडिया सरकारचा सहभाग असल्याचं स्पष्ट दिसत असतानाही दाराने आपली लेखणी ही प्रकरणं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चालवली. जे दिसेल त्यावर दारा मुक्तपणे लिहीत राहिला; पण मग असं असताना दाराने पत्रकारिता का सोडली ?
३० सप्टेंबर रोजी दारा आपल्या कुटुंबासमवेत प्रवास करत होता. कंबोडियातील शिआनुकविले या शहरात त्याला अटक केली गेली. हे ठिकाण कंबोडियामध्ये सायबर घोटाळ्यांचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. समाज माध्यमावर चुकीचे संदेश पोहोचवून समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचे आरोप त्याच्यावर ठेवले गेले. तीन आठवडे दारा तुरुंगात होता. कंबोडियाचे माजी नेते हुन सेन आणि त्यांचा मुलगा कंबोडियाचे पंतप्रधान हुन मॅनेट यांची माफी मागणारा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित केल्यानंतर त्याची तुरुंगातून जामिनावर सुटका करण्यात आली; पण त्याच्यावरील आरोप अजूनही मागे घेतले गेलेले नाहीत. कंबोडियन सरकारच्या बदनामीचा गुन्हा सिद्ध झाल्यास दाराला दोन वर्षांचा तुरुंगवास होण्याची शक्यता आहेच.
तुरुंगातून बाहेर आल्यावर आपण पत्रकारितेतून निवृत्त होत असल्याचं दाराने जाहीर केलं. ‘समाज माध्यमावर आपण चुकीच्या बातम्या पसरवल्या. त्यामुळे लोकांची दिशाभूल होऊन सरकारची बदनामी झाली. अशी चूक आपण पुन्हा करणार नाही’ म्हणत दाराने जाहीर माफी मागितली. आपला निर्णय पंतप्रधान हुन मॅनेट यांनाही कळवला. ‘अटकेदरम्यानची चौकशी, तुरुंगवास यामुळे आपण घाबरुन गेलेलो आहोत. तुरुंग अधिकाऱ्यांनी आपल्यावर बळाचा नको इतका वापर केला. या सगळ्यात पत्रकारितेला लागणारं धाडस मी गमावलं आहे’, असं सांगणाऱ्या दाराने आपल्यावरील आरोप मागे घेण्याबाबत न्यायालयाला विनंती केली आहे. दाराने पत्रकारितेतून निवृत्ती घेतल्याने जगभरातील पत्रकारितेला धक्का बसला आहे. त्याच्या निवृत्तीने पत्रकारितेचा मोकळा श्वास घोटला जात असल्याचं सिद्ध होत असल्याच्या प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवरून व्यक्त होत आहेत.
फेब्रुवारी २०२३ पर्यंत कंबोडियातील ‘व्हाॅइस ऑफ डेमोक्रसी’ या माध्यम समूहासाठी दारा काम करत होता; पण ते बंद पडल्यावर त्याने समाज माध्यमांवर आपल्या बातम्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. त्याने ‘स्कॅम फार्मस’ ही मालिका चालवून ऑनलाइन घोटाळे, लोकांची आर्थिक फसवणूक आणि मानवी तस्करी यावर दणकून लिहायला सुरुवात केली. दाराचं हे पत्रकारितेतलं धाडस पाहून अमेरिकेचे सचिव एंटनी ब्लिंकेन यांनी दाराला आंतरराष्ट्रीय पत्रकारितेतला सन्मान समजला जाणारा ‘हीरो पुरस्कार’ २०२३ मध्ये जाहीर केला.
खाणीकडे जाणारा रस्ता बनवण्यासाठी एका पर्यटन स्थळाचा बळी दिला गेला. या गोष्टीवर दाराने समाज माध्यमावर आवाज उठवला. ही बातमी समाज माध्यमावर येताच दुसऱ्या दिवशी दाराला अटक करण्यात आली. या अटकेमुळे दाराची पत्रकारिता संपल्यात जमा झाली. पनाॅम पेन ही कंबोडियाची राजधानी. त्याच्याजवळ असलेल्या कंडाल या ग्रामीण प्रांतात दाराचा जन्म झाला. लहानपणी आजीकडे राहणारा दारा पहाटे ३ वाजता उठून घराबाहेर पडायचा. १० कि.मी. चालत जायचा. आजी वारल्यानंतर अनेक दिवस दारा पॅगोडामध्ये राहिला. नंतर पनाॅम पेन येथील नातेवाईकांकडे राहू लागला. तिथे तो इंग्रजी शिकला. त्याला इंग्रजी वर्तमानपत्र वाचण्याचा छंद लागला. शाळा सुटल्यानंतर दारा सायकल दामटवत ‘कंबोडिया डेली’च्या कार्यालयात जायचा. तिथे बाहेर भिंतीवर वर्तमानपत्राचे कागद चिकटवले जात. ते वाचण्याचा दाराला छंद जडला होता. काही काळानंतर कार्यालयात असलेल्या संग्रहित लिखित साहित्याची वर्गवारी करण्याचं काम त्याला मिळालं. ते काम करता करता दाराने पत्रकारितेचे धडे गिरवले. आपल्या साहसी बातमीदारीने दाराने अल्पावधीत आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख तयार केली. दाराने जेव्हा पत्रकारितेतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर ‘जे झालं ते योग्य नाही’ अशी प्रतिक्रिया जगभरात व्यक्त होते आहे.
मुस्कटदाबी हे तर सरकारचंच धोरण !
सरकारविरुद्ध आवाज उठवेल त्याचा आवाज दाबणं हे कंबोडियन सरकारचं धोरण आहे. अलीकडे अनेक घटनांमध्ये सरकारी दडपशाहीचे दणके लोकांना खावे लागले आहेत. दारासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पत्रकारावर सूडबुद्धीने कारवाई केल्यानंतर पत्रकारिता स्वातंत्र्य, मानवी हक्क याबाबत सजग समुदायांकडून कंबोडिया सरकारवर जगभरातून टीका होते आहे.