मराठवाड्याची संघर्ष यात्रा

By admin | Published: April 19, 2017 01:22 AM2017-04-19T01:22:51+5:302017-04-19T01:22:51+5:30

निव्वळ आश्वासनांवर शेतकरी आश्वस्त राहू शकणार नाही़ मराठवाड्यात ५९ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांची कामे रखडलेली आहेत़ पाझर, मालगुजारी,

The journey of Marathwada tour | मराठवाड्याची संघर्ष यात्रा

मराठवाड्याची संघर्ष यात्रा

Next


निव्वळ आश्वासनांवर शेतकरी आश्वस्त राहू शकणार नाही़ मराठवाड्यात ५९ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांची कामे रखडलेली आहेत़ पाझर, मालगुजारी, गाव तलावांमध्ये गाळ आहे़ कालवे नादुरुस्त आहेत़ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहचतच नाही़ त्यासाठी मराठवाड्याची संघर्ष यात्रा कायम आहे़

एकीकडे विरोधक कर्जमाफीची मागणी लावून धरत आहेत, दुसरीकडे सत्ताधारी कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्तीच्या योजना सांगत आहेत़ तरीही मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे़ विद्यमान सरकारने शाश्वत शेती अन् उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या असल्यातरी प्रत्यक्षात आश्वासने पाळली जात आहेत असे दिसत नाही़ तूर खरेदी केंद्राचे काय झाले, सोयाबीनचे तुटपुंजे अनुदान, हमीभावाची नसलेली हमी, रोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्या या सर्वच प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत़ त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीने काढलेल्या संघर्ष यात्रेकडे केवळ राजकीय संदर्भाने पाहता येणार नाही़
अस्मानी, सुल्तानी संकटांनी पिचलेल्या शेतकऱ्यांना संघर्ष यात्रेने लढण्याचे बळ मिळत असेल तर हा विधायक विरोध समजून सरकारने चर्चा केली पाहिजे़ सलग चार वर्षांपासून दुष्काळात होरपळणारा शेतकरी केवळ आश्वासनांनी आश्वस्त राहू शकत नाही़ प्रत्यक्ष कृती दिसली पाहिजे़ मराठवाड्यातील शेती शाश्वत करायची असेल तर पाणी हा महत्त्वाचा विषय आहे़ त्याकडे सरकार किती गांभीर्याने पाहते हे निधी वाटपावरून लक्षात येते़ निजाम राजवटीत गुलाम राहिलेल्या मराठवाड्यातील जनतेला एकमेव उपजीविकेचे, विकासाचे साधन शेतीच राहिले आहे़ एकूण शेती क्षेत्रापैकी ८५ टक्के शेती कोरडवाहू आहे़ मराठवाड्याचा पश्चिमोत्तर भाग दुष्काळप्रवण आहे़ महाराष्ट्रातील प्रत्यक्ष सिंचितक्षेत्राचे प्रमाण हे निर्मित क्षमतेच्या ३८़८ टक्के आहे़ त्यात विदर्भामध्ये ४०़९ टक्के उर्वरित महाराष्ट्रात ४३ टक्के, तर मराठवाड्यात २६़२ टक्के आहे़ तुलनेने मराठवाड्यातील सिंचन कमी आहे़ प्रकल्पांपेक्षाही भूजलाद्वारे मराठवाड्यात अधिक सिंचन होते़ साधारणत: २ लाख ७१ हजार ६१८ विहिरींद्वारे सव्वाचार लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते़ अलीकडच्या काळात विंधनविहिरी (बोअरवेल)ची संख्या सर्वाधिक आहे; परंतु जलतुटीचा प्रदेश असलेल्या मराठवाड्यात अतिउपशावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे़ या विभागात ४ हजार ८०० पाझर तलाव, ५ हजारांहून अधिक गावतलाव, मालगुजारी तलाव, कोल्हापुरी बंधारे आहेत़ गावातील पाणी गावात अडवून ती साठविण्याची मोठी संधी आहे़ त्यासाठी मराठवाड्यातील पाझर तलाव, गावतलाव, मालगुजारी तलाव व कोल्हापुरी बंधाऱ्यातील गाळ काढला पाहिजे़ गेल्यावर्षीच्या पावसाने काही ठिकाणी पाणी असले तरी येणाऱ्या पंधरवड्यात बहुतेक गाव तलाव कोरडेठाक होतील़ तेथील गाळ उपसा करता येईल़ पावसाळ्यात तलाव पूर्ण नाही भरल्यास जवळच्या नदी-नाले व ओहळाचे पाणी तलावाच्या दिशेने वळवावे अथवा उपसा करून तलावात सोडता येऊ शकते़ विदर्भातील मालगुजारी तलावाचा गाळ काढणे व नूतनीकरणासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी शिफारस केळकर समितीने केली होती़ त्याच धर्तीवर मराठवाड्यातील तलावांसाठी शासनाने तरतूद केली पाहिजे़
अर्थतज्ज्ञ प्रा़ एच़एम़ देसरडा, सामाजिक कार्यकर्ते डॉ़ बालाजी कोम्पलवार यांनी सातत्याने अभ्यासपूर्वक शासनाला केलेला पत्रव्यवहार, मांडलेला अहवाल लक्षात घेतला तरी समस्या निराकरणाची दिशा मिळू शकेल़ मराठवाड्यातील सरासरी पर्जन्यमान ५०० मिलि आहे़ म्हणजेच ते २० इंचापेक्षा अधिक आहे़ मराठवाड्याच्या एकूण ६४़९० लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्रावर सरासरी हेक्टरी ५० लाख लिटर पावसाचे पाणी जमिनीवर पडते़ ते नैसर्गिक व उपसापद्धतीने संवर्धित केल्यास प्रत्येक गाव पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी होऊ शकते़
- धर्मराज हल्लाळे

Web Title: The journey of Marathwada tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.