स्वप्नपूर्तीचा आनंद

By admin | Published: July 25, 2016 03:36 AM2016-07-25T03:36:05+5:302016-07-25T03:36:05+5:30

लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांनी गेली १० वर्षे ज्या प्रकल्पाच्या पूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तो वर्धा-यवतमाळ-नांदेड हा २८३ कि.मी. लांबीचा व १६०० कोटी रुपयांचा

Joy of dreamer | स्वप्नपूर्तीचा आनंद

स्वप्नपूर्तीचा आनंद

Next

लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांनी गेली १० वर्षे ज्या प्रकल्पाच्या पूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तो वर्धा-यवतमाळ-नांदेड हा २८३ कि.मी. लांबीचा व १६०० कोटी रुपयांचा रेल्वेमार्ग त्याच्या पूर्तीच्या दिशेने आता वाटचाल करू लागला आहे. त्याच्या उभारणीचा ६० टक्के खर्च केंद्र, तर ४० टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे. या मार्गाखाली येणारी जमीन संबंधित शेतकऱ्यांशी थेट वाटाघाटी करून दोन वर्षांच्या आत खरेदी करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याने त्याच्या वाटचालीत येऊ शकणाऱ्या कायदेशीर व न्यायालयीन अडचणीही दूर झाल्या आहेत. मुळात या प्रकल्पाचा पाठपुरावा २००८ च्या फेब्रुवारी महिन्यात सुरू झाला. दि. ११ फेब्रुवारी २००९ या दिवशी तेव्हाचे रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते त्याचे रीतसर उद्घाटन झाले. यवतमाळ हा जिल्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांनी ग्रासला असल्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जास्तीचा रोजगार प्राप्त व्हावा यासाठी विजय दर्डा यांनी केंद्र व राज्य या दोन्ही सरकारांकडे त्याच्या आरंभासाठी तगादा लावून धरला. संसदेच्या प्रत्येकच अधिवेशनात ते याविषयी सरकारकडे विचारणा करीत राहिले. काही महिन्यांपूर्वी आताचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन या प्रकल्पाचा समावेश रेल्वेच्या विशेष योजनेत करावा अशी मागणी त्यांनी केली व ती रेल्वेमंत्र्यांनी मान्य केली. तशा आशयाचे पत्रही रेल्वे मंत्रालयाने यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ पाठविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दर्डा यांनी नुकतीच भेट घेऊन हा प्रकल्प विशेष गतीने पूर्ण करावा अशी मागणी केली आणि फडणवीस यांनीही ती मान्य केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास विदर्भ व मराठवाड्यातील हजारो बेरोजगारांना काम मिळेल आणि त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या जलदगती दळणवळणामुळे त्या भागातील उद्योग व व्यवसायांनाही त्याची मोठी मदत होईल. लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी आणि आताचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबतच महाराष्ट्राचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांनीही या प्रकल्पाबाबत विशेष आस्थेने दर्डा यांना साहाय्य केले. शिवाय या भागातील लोकप्रतिनिधी व माध्यमे यांनीही या मागणीचा वेळोवेळी पाठपुरावा केला. गेली दहा वर्षे केंद्र सरकार आपल्या रेल्वे अंदाजपत्रकात या प्रकल्पाच्या पाहणीसाठी काही ना काही रकमेची तरतूद करीत आले. मात्र त्याच्या संपूर्ण उभारणीचा साकल्याने विचार करून त्यासाठी आवश्यक ती रक्कम उपलब्ध करून देणे आणि त्याच्या पूर्तीसाठी प्रशासनाला आवश्यक ते आदेश देणे ही बाब आता प्रथमच झाली आहे. या प्रकल्पामुळे विदर्भ व मराठवाड्यातील अविकसित भागांना विकासाच्या दिशेने अधिक जलद गतीने वाटचाल करणे आता शक्य होणार आहे. या विभागाचा विकासविषयक अनुशेषही त्यामुळे काहीसा भरून निघणार आहे. शिवाय अनेक वर्षांत विदर्भात येऊ घातलेला हा सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प आहे. त्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष धन्यवाद देणे गरजेचे आहे. विजय दर्डा यांचे आजवरचे प्रयत्न आता यशस्वी झाले यासाठी त्यांचेही अभिनंदन करणे आवश्यक आहे.

 

Web Title: Joy of dreamer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.