श्रमाचा आनंद

By admin | Published: June 26, 2015 12:59 AM2015-06-26T00:59:41+5:302015-06-26T00:59:41+5:30

परवा एका ठिकाणी बसलो होतो. त्या घरातील वयोवृद्ध आजोबा मित्रांबरोबर फिरायला निघालेल्या सोळा-सतरा वर्षांच्या नातवाला म्हणाले, ‘अरे जाता जाता एवढे पत्र

The joy of labor | श्रमाचा आनंद

श्रमाचा आनंद

Next

ज्ञानसाधू
वा.गो. चोरघडे

परवा एका ठिकाणी बसलो होतो. त्या घरातील वयोवृद्ध आजोबा मित्रांबरोबर फिरायला निघालेल्या सोळा-सतरा वर्षांच्या नातवाला म्हणाले, ‘अरे जाता जाता एवढे पत्र पोस्टाच्या पेटीत टाकून दे.’ त्यावर तो नातू पाय आपटीत इतका वैतागून म्हणाला, ‘हे काय बा आजोबा, तुम्ही नेहमीच काही तरी कामे सांगून आमची फिरण्याची मजा घालवता.’ वस्तुत: ती मुले ज्या दिशेने फिरायला निघाली होती त्याच रस्त्यावर पोस्टाची पेटी होती. पण तेसुद्धा त्या मुलाला कष्टाचे वाटले. या परिस्थितीत ‘स्वत:ची कामे स्वत: करून घ्यावी. त्यात आनंद असतो.’ हा उपदेश त्यांना कसा रुचणार?
‘स्वावलंबन’ हा शब्द केवळ पुस्तकातच उरला आहे. या स्थितीत श्रमाची महती, त्यापासून मिळणारा आनंद या व्यक्तींना कसा मिळणार? ऋग्वेदात एक प्रसिद्ध मंत्र आहे -
न ऋते श्रान्तस्य सख्याय देवा:।
श्रम करून थकलेल्या श्रमिकांनाच ईश्वर मदत करतो. आळसात सुख मानणारे आणि श्रमाचा तिरस्कार करणाऱ्यांच्या घरात दारिद्र्य, दैन्य नाहीसे करणारा देव म्हणजे श्रम आहे. म्हणून श्रमो हि परमो धर्म:। असे म्हटले गेले आहे. गीताईचे वचन आहे.
यज्ञ-तुष्ट तुम्हा देंव भोग देतील वांछित।
त्याचे त्यास न देता जो खाय तो एक चोर चि।
श्रमाचा, कष्टांचा द्वेष म्हणजे स्वत:च्या उत्कर्षाच्या साधनाचा द्वेष करण्यासारखे आहे. श्रमाशिवाय जगण्यात सर्वनाशाचा धोका पत्करावा लागेल.
तया मग अपावे थोरू आहे।
जेणे ते हातीचे सकळ जाये।
देखा प्राप्तही न लाहे।
भोग भोगू (५.१०८)

ज्ञानदेव पुढे सांगतात.
म्हणोनि तुम्ही समस्ती। आपुलालिया कर्मी उचिती
निरत व्हावे पुढत पुढती।
म्हणिपत असे.
शरीर श्रम हे जीवनाचे श्रम म्हणून गांधी-विनोबांनीही सुचविले आहे. ‘निढळाचा घाम यज्ञीय ते देव्य। जीवनाचे काव्य विन्या म्हणे’ या उलट विनासायास प्राप्त होणाऱ्या गोष्टीत आनंद मानण्याची वृत्ती सध्या बळावत आहे. स्वत:च्या श्रमाने प्राप्त होणाऱ्या साधनांशी जीवनाचे सौख्य निगडित आहे.
यात आनंद असतो.
श्रम एव मनुष्याणां कारणं हित सौख्ययो:
विभवोत्कर्षयोर्योग क्षेमयो स्वर्ग मोक्षयो:।।
असे श्रमगीतेतील वचन आहे. कुठल्याही कार्याची सिद्धी-सफलता परिश्रमाशिवाय प्राप्त होत नाही.

Web Title: The joy of labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.