मोरांना ब्रह्मचर्याचे न्यायालयीन प्रशस्तीपत्र
By admin | Published: June 3, 2017 12:26 AM2017-06-03T00:26:17+5:302017-06-03T00:26:17+5:30
राजस्थान उच्च न्यायालयाचे न्या. महेशचंद्र शर्मा हे अचाट व अफलातून बुद्धिमत्ता प्राप्त झालेले गृहस्थ आहेत. ईश्वर आणि नियती यांनाही
राजस्थान उच्च न्यायालयाचे न्या. महेशचंद्र शर्मा हे अचाट व अफलातून बुद्धिमत्ता प्राप्त झालेले गृहस्थ आहेत. ईश्वर आणि नियती यांनाही ठाऊक नसणाऱ्या गोष्टी त्यांच्या ज्ञानभांडारात जमा आहेत. गायीच्या देहात ३३ कोटी हिंदू दैवतांचा वास असतो ही श्रद्धा त्यांनी ज्ञान म्हणून स्वीकारली आहे आणि मोरांचे प्रजनन त्यांच्या समागमावाचून होते असेही त्यांनी देशाला ऐकविले आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदावर अशी वेडसर माणसे येतातच कशी, हा प्रश्न साऱ्यांसमोर उभा करणाऱ्या या शर्मांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या आदल्या दिवशी देशाला ही मुक्ताफळे ऐकविली आहेत. स्मृती इराणी जेथे मानव संसाधन मंत्री होतात, पंकज निहलानी सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख होतात किंवा गजेंद्र चौहानसारखी माणसे जेथे एफटीटीआयच्या प्रमुखपदी येतात तेथे शर्मांसारख्यांना न्यायमूर्ती होता येणे शक्यही आहे. तथापि, ज्या गोष्टी आपल्याला ठाऊक नाहीत त्या जाहीरपणे बोलू नये एवढे कळण्याइतपत बुद्धी तरी त्यांच्याजवळ असावी की असू नये? मोरांच्या डोळ्यातून गळणारी आसवे पिऊन लांडोर गरोदर राहते आणि मोर हा सनातन ब्रह्मचर्य पाळणारा प्राणी आहे, हे ज्ञान या इसमाने कुठून मिळविले असेल? आजच्या शाळकरीच नव्हे, तर शाळेबाहेरच्या मुलामुलींनाही ज्या गोष्टी समजतात त्या या न्यायमूर्तीला कळू नये ही आपल्या न्यायव्यवस्थेतीलच नव्हे, तर प्रशासन व्यवस्थेतीलही निवड पद्धतीची गफलत सांगणारी गोष्ट आहे. गंमत ही की, राजस्थान हे मोरांचे वास्तव्यस्थान आहे. येथील शेतात, रस्त्यात, विजेच्या आणि टेलिफोनच्या तारांवर मोर आणि लांडोरी बसलेल्या दिसतात. शहरातील मोठ्या आवारात व रस्त्यांच्या कडेलाही त्या पाहता येतात. शर्माजींना तेथे फिरून त्यांचा समागम पाहता आला नसेल हे मान्य; परंतु मोराचा अश्रुपात मोरणीने गिळलेला तरी त्यांनी कुठे पाहिला वा ऐकला. अशा गोष्टी ऐकून वा वाचून ज्यांना प्रजननशास्त्र शिकता येते त्यांच्या अकलेचे कौतुक तरी आपण किती करायचे? या शर्मांच्या घरातल्या शिक्षित मुलामुलींना तरी त्यांचे हे ज्ञान ऐकून केवढे खजील व्हावे लागले असेल? या इसमाने निवृत्तीच्या आदल्या दिवशी असा निकाल दिला असेल आणि एवढे दिवस असे समज उराशी बाळगले असतील तर सारा जन्म त्याने राजस्थान व पर्यायाने देशाचे केवढे अहित केले असेल याचा विचारही आपल्याला भोवळ आणणारा ठरतो. न्यायाधीशांची निवड करणाऱ्या यंत्रणा व त्यांच्यावर सातत्याने तोंडसुख घेणाऱ्या बार कौन्सिलसारख्या संघटना अशावेळी काय करीत असतात? वास्तविक जिल्हा न्यायालयात दहा वर्षे न्यायाधीश राहिलेल्या किंवा उच्च न्यायालयात दीर्घकाळ अॅडव्होकेट म्हणून अनुभव घेतलेल्या आणि राष्ट्रपतींनी निवडलेल्या इसमालाच न्यायमूर्तिपद दिले जाते. एवढ्या सगळ्या यंत्रणांचे डोळे चुकवून शर्मांसारखी अर्धवट माणसे त्या पदापर्यंत पोहोचत असतील तर या यंत्रणांमध्येच काहीतरी खोट आहे, असे म्हणावे लागेल. न्यायमूर्ती भ्रष्ट असतात हे आपल्या अनेक पराक्रमी न्यायमूर्र्तींनी आजवर दाखवून दिले आहे. ते जातीयवादी असतात हेही देशाला कळले आहे. निवृत्तीनंतर मोठी पदे मिळावी यासाठी सरकारला खूश करणाऱ्या, अन्यायकारक निकाल देणाऱ्या न्यायमूर्र्तींची माहितीही देशाला आहे. पण मोराच्या अश्रुतून मोरणी गरोदर राहते एवढे अज्ञान असलेली माणसे त्या पदावर आलेली आजवर तरी दिसली नाहीत. अशी माणसे साध्या शिक्षकाच्या वा कारकुनाच्या पदासाठीही पात्र ठरत नाहीत. माणूस म्हणून जगताना ज्या साध्या गोष्टी कळाव्या त्याही यांना ठाऊक होत नसतील तर ही माणसे मन आणि मेंदू बंद ठेवून जगतात की काय, असाच प्रश्न आपल्याला पडावा. महेशचंद्र शर्मा हे न्यायमूर्ती असल्याने व त्यांच्या अब्रूला कायद्याचे संरक्षण कवच लाभले असल्याने माध्यमांमधील अनेकांनी त्यांच्या या अज्ञानावर फुले वाहिल्याचे दिसले नाही. मात्र सोशल मीडियावरील दांडगटांनी त्यांची वस्त्रे पार उतरवून व धुऊन टाकली आहेत. नव्या पिढ्या नुसत्या शब्दसाक्षर नाहीत तर त्या शरीरसाक्षरही आहेत, हे ज्यांना समजत नाही त्यांच्या प्रौढत्वाचे गोडवे किती गायचे? आणि त्यांच्या न्यायमूर्ती असण्याचे कौतुक तरी कसे करायचे? शिवाय गाय हा साधा पशू आहे हे सावरकरांपासून साऱ्या विज्ञाननिष्ठ माणसांनी देशाला सांगितले आहे. तिच्या शरीरात ३३ कोटी दैवते वास करतात ही साधी श्रद्धा आहे. श्रद्धा ही ज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहण्याच्या आजच्या काळात शर्मांसारखी माणसे ज्ञानालाच श्रद्धेच्या दावणीला बांधत असतील तर त्यांना भाबडे म्हणायचे, अंधश्रद्ध म्हणायचे की ठार अडाणी आणि मूर्ख? आणि ही माणसे म्हणे समाजाचा न्याय करणार, घटनेवर भाष्य करून तिचे संरक्षण करणार. यांना मृत्युदंडापासूनच्या साऱ्या शिक्षा देण्याचा अधिकार असणार. खरेतर अशा माणसांपासूनच न्याय, न्यायव्यवस्था, समाज व नागरिक यांना संरक्षण दिले पाहिजे आणि जमलेच तर त्या मोरांना आणि लांडोरींनाही ते दिले गेले पाहिजे. जगातील या सगळ्यात देखण्या प्राण्यावर अन्याय करणाऱ्या शर्मांना थोडीशी शिक्षाही झाली पाहिजे.