फक्त गुरगुरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 10:18 PM2018-04-17T22:18:14+5:302018-04-17T22:18:14+5:30
जळगावची जागा आम्ही जिंकणार आणि रावेरची पाडणार, अशी डरकाळी शिवसेनेची मुलूखमैदान तोफ असलेले सहकार राज्यमंत्री, उपनेते गुलाबराव पाटील यांनी फोडली.
जळगावची जागा आम्ही जिंकणार आणि रावेरची पाडणार, अशी डरकाळी शिवसेनेची मुलूखमैदान तोफ असलेले सहकार राज्यमंत्री, उपनेते गुलाबराव पाटील यांनी फोडली. त्यांची ही डरकाळी असेल तर प्रश्न येतो की, त्यात रावेरची जागा जिंकण्याचा निर्धार का नाही? लोकसभा निवडणुकीला अद्याप वर्ष बाकी आहे. शिवसेनेचे एक आमदार त्या मतदारसंघातील आहेत. तरी जिंकण्याचा विश्वास त्यांना का वाटत नाही, हा गहन प्रश्न आहे. त्यामुळे ही डरकाळी नव्हे तर केवळ गुरगुरणे होते, असाच याचा अर्थ काढावा लागेल. शिवसेनेच्या मुख्यालयातून डरकाळी फुटली, की त्याचे प्रतिध्वनी संपूर्ण महाराष्टÑभर उमटतात, असा शिवसैनिकांचा समज आहे. आता संपर्कप्रमुख नियुक्त झाले असल्याने ते आपल्या मतदारसंघात जाऊन बैठका, आढावा घेतात. जळगावात संजय सावंत आले आणि त्यांच्या उपस्थितीत गुलाबरावांनी ‘शिवतीर्था’सारखे जोरदार भाषण केले. सावंत आणि जळगावातील संभाव्य उमेदवार आर.ओ.पाटील हे उपस्थित असल्याने त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. रावेरचे संपर्कप्रमुख विलास पारकर हजर नसल्याने त्यांनी तेथील संघटनस्थितीविषयी फारसे उत्साहवर्धक वक्तव्य केले नाही. आता संपूर्ण जिल्ह्यात सेनेचे तीन आमदार आहेत. गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण, किशोर पाटील हे पाचोरा तर चंद्रकांत सोनवणे हे चोपडा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. गेल्या निवडणुकीत भाजपा व शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असताना सेनेने या तीन जागा राखल्या. हे तिन्ही मतदारसंघ पूर्वीच्या युतीच्या फॉर्म्यूल्यानुसार सेनेकडेच होते. तिन्ही ठिकाणी सेनेचे उमेदवार यापूर्वी निवडून आले आहेत. त्यामुळे पक्षसंघटन, गावपातळीवर पोहोचलेले काम, सहकारी व ग्रामपातळीवरील संस्थांवर असलेले वर्चस्व याचा लाभ सेनेला झाला. पण उर्वरित ७ मतदारसंघात सेनेला यश मिळालेले नाही. चिमणराव पाटील (पारोळा) व चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर) यांनी चांगली लढत दिली. ही पार्श्वभूमी असताना लोकसभा निवडणुकीत यशाचे गणित कोणत्या आधारावर मांडले जात आहे, हे कळायला मार्ग नाही. युतीचे राजकारण सुरु झाल्यापासून सेनेने जळगाव व रावेर या दोन्ही जागा कधी लढलेल्या नाहीत. हे नजरेआड करुन चालणार नाही. खान्देशातील धुळे आणि नंदुरबारची स्थिती फार वेगळी राहणार नाही. बबनराव थोरात आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री व धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे यांचे प्रयत्न असले तरी दोन्ही मतदारसंघात पक्षसंघटन मजबूत करण्याची आवश्यकता आहे. विधानसभा निवडणुकीला सक्षम उमेदवार मिळविण्यापासून सेनेला तयारी करावी लागत आहे. ऐनवेळी उमेदवाराने नकार देणे, त्याच त्या उमेदवाराला परत तिकीट देणे असे प्रकार घडत असताना जिंकणे-पाडण्याची भाषा करण्यापेक्षा संघटन मजबुतीला सेनेने महत्त्व देणे श्रेयस्कर ठरणार आहे.