जरा हटके, जरा बचके... मुंबई मेरी जान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 01:30 AM2020-06-09T01:30:36+5:302020-06-09T01:30:48+5:30

देशपातळीवर हॉटेल, मॉल्स, प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी राज्य सरकारने त्याला परवानगी दिलेली नाही.

Just move, just escape.. mumbai meri jaan | जरा हटके, जरा बचके... मुंबई मेरी जान

जरा हटके, जरा बचके... मुंबई मेरी जान

Next

कोरोनामुळे सर्वच व्यवहारांना लागलेले कुलूप हळूहळू उघडायला प्रारंभ झाला आहे. खासगी कार्यालयांच्या टेबलांवरील धूळ झटकली गेली. बागबगीचे माणसांनी गजबजले. ‘मॉर्निंग वॉक’ची दिनचर्या नव्या उत्साहाने सुरू झाली. दुकानांची शटर सताड उघडली गेली. काळा धूर सोडत मोटारी-दुचाकींची लगबग सुरू झाली. एका विषाणूने स्टॅच्यू केलेले आजूबाजूचे विश्व पुन्हा हलू लागले, धावू लागले.

देशपातळीवर हॉटेल, मॉल्स, प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी राज्य सरकारने त्याला परवानगी दिलेली नाही. एकीकडे जनजीवन सुरू करण्याची इच्छा, आर्थिक चक्र गतिमान करण्याची अपरिहार्यता, तर दुसरीकडे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अवघड झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती या कात्रीत सरकारसह सारेच सापडले आहेत. ज्या देशाची लोकसंख्या १३५ कोटींच्या घरात आहे, तेथे सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर अंमलबजावणी होण्याचा आग्रह धरणे हे हास्यास्पद आहे. सोमवारी उपनगरांतील डोंबिवली व विरार या लक्षावधी नोकरदारवर्गाचे आश्रयस्थान असलेल्या शहरांत हेच दिसून आले. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय लोकल अजून सुरु झालेली नसून ती लागेच सुरु होण्याची शक्यता नाही. लोकलखेरीज हे शहर म्हणजे कुबड्यांशिवाय पंगू व्यक्ती अशी अवस्था आहे. मात्र, अशा परिस्थितीत खासगी कार्यालये अत्यल्प कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु झाली तरीही बसगाड्यांकरिता पाच किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांनुसार ‘एका आसनावर एक’ असे बसवून या हजारो कर्मचाऱ्यांना नेणे अशक्य असल्याने त्या प्रवाशांनीच ‘एका आसनावर दोनजण’ बसविण्याची ‘तडजोड’ स्वीकारली. अर्थात, ही ‘तडजोड’ आपल्या जीवावर बेतू शकते, याची जाणीव असूनही केवळ आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या पोटा-पाण्याकरिता ते ही जोखीम पत्करायला तयार झाले. अगोदर बसगाडीच्या रांगेत दोन तास उभे राहायचे व त्यानंतर तब्बल तीन-साडेतीन तासांचा बसचा प्रवास करून कार्यालय गाठायचे, ही सर्कस जोवर रेल्वेसेवा पूर्ववत होत नाही, तोवर त्यांना करायची आहे. शासकीय व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी गेली अडीच महिने हा द्राविडीप्राणायम करीत आहेत. मुंबई व उपनगरांकरिता तसेच पुणे, नागपूर आदी मोठ्या शहरांकरिता बसखेरीज सार्वजनिक वाहतुकीची मेट्रो सेवा २० वर्षांपूर्वीच उभारली जाणे गरजेचे होते. तसे झाले असते तर कदाचित या शहरांमधील गर्दी रेल्वे, बस आणि मेट्रो यांमध्ये विभागली जाऊन या सेवा लवकर सुरु करणे शक्य झाले असते. कोरोना असो की, निसर्ग वादळ प्रत्येक गोष्टीत ‘माझा’ टीआरपी पाहणाºया वाहिन्यांकडून सध्या सर्व काही सुरळीत होण्याचा आग्रह धरला जात असतानाच महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही कशी चीन अथवा स्पेनशी स्पर्धा करत आहे, असे गळेही काढले जात आहेत. ब्रिटिशकालीन साथरोग कायद्याने नोकरशाहीच्या हाती अनेक अधिकार देऊन त्यांचे हात बळकट केले आहेत. त्यामुळे काही नोकरशहा रुग्णवाढ टाळण्याकरिता निर्बंध सैल करायला तयार नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने बंधने सैलावण्याबाबत तीन पक्षांच्या तीन भूमिका आहेत. त्यामुळे याचा परिणाम जनजीवन पूर्ववत होण्यावर होत आहेत. असे सतत बिचकत घराबाहेर पडण्याचा, आज सुरु झालेल्या गोष्टी उद्या लागलीच भीतीने बंद होण्याचा पायंडा पडला, तर त्याचा आणखी विपरीत परिणाम लोकांच्या मनोधैर्यावर व आर्थिक चक्र पूर्ववत होण्यावर होणार आहे. लोकांमधील साठेबाजी करण्याचा व पर्यायाने वस्तूंचा काळाबाजार, चढ्या दराने विक्री वगैरे अनुचित प्रकार वाढण्याचा धोका आहे. मरिन लाईन्स येथे फिरायला येणाºयांनी रविवारी गर्दी करताच सोमवारी पुन्हा दंडुकेधारींनी परिसराचा ताबा घेतला; हे उचित नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्या दिशेने या शहराची जडणघडण झाली असून, या शहरात वावरताना आपली काळजी कशी घ्यावी, हे मुंबईकरांएवढे अन्य कुणालाच ठावूक नाही. ‘ऐ दिल हैं मुश्किल जीना यहाँ, जरा हटके, जरा बचके ये है बॉम्बे मेरी जान’ या गीतामध्येच तो संदेश दिलेला आहे.

 

Web Title: Just move, just escape.. mumbai meri jaan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.