मंगळावर केवळ आपले नाव कोरण्यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:32 AM2017-11-16T00:32:38+5:302017-11-16T00:33:23+5:30

मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीबाबत नेहमीच चित्रविचित्र दावे केले गेले आहेत. कधी कुणाला मंगळावरील छायाचित्रात खेकडा आणि महिलासुद्धा दिसते तर कुणाला एलियनची शवपेटी.

 Just to name your name on Mars ... | मंगळावर केवळ आपले नाव कोरण्यासाठी...

मंगळावर केवळ आपले नाव कोरण्यासाठी...

Next

मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीबाबत नेहमीच चित्रविचित्र दावे केले गेले आहेत. कधी कुणाला मंगळावरील छायाचित्रात खेकडा आणि महिलासुद्धा दिसते तर कुणाला एलियनची शवपेटी. एका वेबसाईटने म्हणे मंगळावर केवळ एलियनच नाही तर पृथ्वी सोडून गेलेले काही महान आत्मेही वास्तव्याला असल्याचा दावा केला होता.
मंगळ ग्रह आणि त्यावरील जीवसृष्टीची शक्यता हा पृथ्वीतलावरील मानवासाठी नेहमीच कुतुहलाचा विषय राहिला आहे. विशेष म्हणजे जेव्हापासून या ग्रहावर जीवनाचे संकेत मिळाले आहेत तेव्हापासून तर काही लोकांनी जणू मंगळावर स्थायी होण्याचे स्वप्नच उराशी बाळगले आहे. तसेही पृथ्वीवरील जमिनीचे भाव आकाशाला भिडले आहेत. अशात मंगळावर जाऊन राहण्यास काय हरकत आहे? काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर मंगळाची दोन छायाचित्रे शेअर झाली होती. क्युरिआॅसिटी रोव्हरने मंगळावरून ही छायाचित्रे पाठविली होती. लोकांनी या छायाचित्रांमध्ये खेकडा आणि महिला शोधून काढली आणि मग काय? मंगळावर जीवन असलेल्या चर्चेला ऊत आला. कदाचित म्हणूनच जगभरातील लोकांनी आता या ग्रहावर जाण्याची तयारी सुरू केली आहे. आश्चर्य हे की कुंडलीतील मंगळ ‘अमंगळ’ मानणाºया भारतीयांचे प्रमाण यात लक्षणीय आहे. पुढील वर्षी मंगळावर जाण्यासाठी नासातर्फे जी मोहीम आखली जाणार आहे त्यासाठी तिकीट बुकिंग सुरू झाले असून सर्वाधिक तिकीट बुकिंग करणाºया देशांमध्ये भारत तिसºया क्रमांकावर आहे. येथील १ लाख ३८ हजार ८९९ लोकांनी मंगळवारीची तयारी केली आहे. जगभरातील एकूण २४ लाख लोक या मोहिमेत सहभागी झाले आहेत. हे ऐकून अनेकांना धक्का बसला असणार? कारण मंगळावर माणसाला उतरविण्याची अमेरिकेची इच्छा असली तरी अद्याप हे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे एवढे लोक मंगळावर कसे उतरणार? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तर सांगायचा मुद्दा हा की ही मंगळवारी काही मानवी नाही. नासाचे जे इनसाईट नावाचे अंतराळयान मंगळावर जाणार आहे त्या यानाला एक सिलिकॉन मायक्रोचिप चिकटवली जाणार असून या चिपवर सर्व प्रवाशांची नावे कोरलेली असतील. याचा अर्थ असा की बुकिंग करणारे लोक स्वत: मंगळावर उतरणार नसून फक्त त्यांची नावे तेथे पोहोचणार आहेत. आणि यासाठी या सर्व प्रवाशांना आॅनलाईन बोर्डिंग पासही दिले गेले आहेत. ही कल्पना नासाला कशी आणि का सुचली हे कळले नाही. पण या लाखो लोकांचे मंगळाचे तिकीट बुकिंग काही मोफत झाले नसणार. यासाठी त्यांनी निश्चितच भरपूर पैसे मोजले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नासाला यातून चांगले उत्पन्न झाले असावे असा अंदाज आहे. शिवाय यानिमित्ताने या मंगळ मोहिमेबद्दल लोकांमध्ये जागरूकताही निर्माण झाली. यापूर्वी जाहीर मंगळ योजनांमध्ये पण मंगळासाठी एकतर्फी तिकिटे बुक करण्यात आली होती. आणि दोन लाखांवर लोक तेव्हाही मंगळवारीसाठी सज्ज झाले होते. गंमत अशी की या लोकांना केवळ मंगळावर पोहोचविले जाणार होते. परतीच्या प्रवासाची कुठलीही ग्वाही नव्हती. म्हणजे कायम मंगळवासी होण्याची तयारीच या लोकांनी केली होती म्हणायची. याला काय म्हणायचे? लोकांचे मंगळवेड की आणखी काही. नावात काय आहे, असे म्हटले जाते. पण या लाखो भावी मंगळवीरांनी ते खोटे ठरविले आहे. कारण त्यांचा हा सर्व खटाटोप शेवटी मंगळावर आपले नाव जाणार यासाठीच आहे ना!

Web Title:  Just to name your name on Mars ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.