न्याय आणि अन्याय
By admin | Published: June 20, 2016 03:03 AM2016-06-20T03:03:17+5:302016-06-20T03:03:17+5:30
‘न्यायसंस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे’, असे विधान सारेच उच्चारीत असतात पण त्यातील गर्भित अर्थ मात्र असा असतो की आपल्याला अनुकूल आणि अपेक्षित न्याय असेल तरच
‘न्यायसंस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे’, असे विधान सारेच उच्चारीत असतात पण त्यातील गर्भित अर्थ मात्र असा असतो की आपल्याला अनुकूल आणि अपेक्षित न्याय असेल तरच विश्वास अन्यथा अविश्वास. गुजरातेतील अहमदाबादच्या ‘गुलबर्ग सोसायटी’ हत्त्याकांड प्रकरणी न्यायालयाने ६६ आरोपींपैकी केवळ २४ जणांना दोषी ठरविले तेव्हांच याचा प्रत्यय येऊन गेला होता आणि विशेष न्यायालयाने ज्यांना दोषी मुक्रर केले होते, त्यांच्या शिक्षेची सुनावणी झाल्यानंतर त्याचाच आता पुन:प्रत्यय आला आहे. दोषींपैकी ११ जणांवर मनुष्यवधाचा आरोप सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. या साऱ्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी बहुधा फिर्यादी पक्षाची अपेक्षा असावी. त्यांच्या वकिलांनी तशी मागणीदेखील केली होती. परंतु अलीकडच्या काळात फाशीच्या शिक्षेच्या विरोधात जगभर आणि भारतातदेखील जनमत संग्रहित होत आहे. त्याचा परिणाम म्हणून म्हणा किंवा या ११ जणांनी केलेला गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ न वाटल्याने म्हणा, न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची तर अन्य आरोपींना सात ते दहा वर्षांच्या कारावासाची सजा सुनावली आहे. ही शिक्षा फिर्यादी पक्षाच्या आणि विशेषत: जाकिया जाफरी यांच्या दृष्टीने अपुरी आहे. त्यांच्या मते मोठ्या संख्येतील आरोपींना मुक्त करणे आणि ज्यांना दोषी ठरविले त्यांना अल्प शिक्षा सुनावणे हा न्याय नसून अन्याय आहे. सुमारे १४ वर्षांपूर्वी गुजरात राज्य जातीय दंग्यांपायी पेटून उठलेले असताना संबंधित गुलबर्ग सोसायटीवर मोठ्या जमावाने हल्ला केला व त्यात ६९ लोक मारले गेले. त्यामध्ये काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांचाही समावेश होता. जाकिया त्यांच्याच पत्नी होत. त्यांनी सतत पाठपुरावा केला आणि थेट सर्वोच्च न्यायालय गाठले तेव्हां त्या वरिष्ठ न्यायालयाच्याच आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली प्रस्तुत प्रकरणाचा विशेष पथकाने तपास केला व सात वर्षांपूर्वी खटल्यास प्रारंभ झाला. एवढा वेळ खटला चालूनही न्याय झाला नाही वा झाला तो अर्धवट झाला म्हणून जाकिया जाफरी वरिष्ठ न्यायालयात जाणार आहेत. तिथे न्याय होतो की पुन्हा अन्यायच होतो हे सांगणे अवघड आहे. पण अहमदाबादच्या विशेष न्यायालयाने केलेल्या निवाड्याची दोन वैशिष्ट्ये लक्षणीय आहेत. ‘गुलबर्ग’वर झालेला हल्ला सुनियोजित कटाचा भाग असल्याचा फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने आधीच फेटाळून लावला होता. पण दुसरा भाग अधिक महत्वाचा आहे. माजी खासदार एहसान जाफरी यांनी आपल्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्याने जमाव संतप्त झाला व त्याला चिथावणी मिळाली असे न्यायाधीश पी.बी.देसाई यांनी म्हटले आहे. विशेष न्यायालयाचा हा निष्कर्ष अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून वरिष्ठ न्यायालयात आता कदाचित त्याचीच चिरफाड करण्याचा प्रयत्न फिर्यादी पक्षाच्या वतीने केला जाईल.