न्या. आर. भानुमती : ३३ वर्षांची स्फूर्तिदायी न्यायिक कारकीर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 10:35 PM2020-07-19T22:35:34+5:302020-07-19T22:35:41+5:30

न्या. इंदू मल्होत्रा यांचा अपवाद वगळता बाकी सर्व महिला न्यायाधीश आधी उच्च न्यायालयांवर नेमल्या गेल्या व त्या सर्व पूर्वी वकील होत्या.

Justice R. Bhanumati: 33 years of invigorating judicial career | न्या. आर. भानुमती : ३३ वर्षांची स्फूर्तिदायी न्यायिक कारकीर्द

न्या. आर. भानुमती : ३३ वर्षांची स्फूर्तिदायी न्यायिक कारकीर्द

googlenewsNext

गेली सहा वर्षे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश राहिलेल्या न्या. आर. भानुमती नीयत वयोमानानुसार रविवारी निवृत्त झाल्या. त्यांच्या निवृत्तीने सर्वोच्च न्यायालयात आता न्या. इंदू मल्होत्रा व न्या. इंदिरा बॅनर्जी या दोनच महिला न्यायाधीश कार्यरत राहतील. ७० वर्षांच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयावर आतापर्यंत न्या. भानुमती यांच्यासह न्या. फातिमा बीवी, न्या. सुजाता मनोहर, न्या. रुमा पॉल, न्या. ग्यान सुधा मिश्रा, न्या. रंजना देसाई, न्या. इंदू मल्होत्रा व न्या. इंदिरा बॅनर्जी या फक्त आठ महिला न्यायाधीशांची नियुक्ती झाली आहे. या आठही जणींमध्ये न्या. भानुमती यांचे वेगळेपण असे की, जिल्हा न्यायाधीशांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत मजल मारणाऱ्या त्या एकमेव न्यायाधीश आहेत.

न्या. इंदू मल्होत्रा यांचा अपवाद वगळता बाकी सर्व महिला न्यायाधीश आधी उच्च न्यायालयांवर नेमल्या गेल्या व त्या सर्व पूर्वी वकील होत्या. न्या. मल्होत्रा या थेट सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती झालेल्या एकमेव महिला न्यायाधीश आहेत. मुळात वकिली व्यवसायात पुरुषांच्या तुलनेने महिला खूपच कमी आहेत. त्यातही वरिष्ठ न्यायालयांवर नियुक्ती होणाºया महिला न्यायाधीशांचे प्रमाण त्याहूनही कमी आहे. देशातील २५ उच्च न्यायालयांचा विचार केला, तर हे कटू वास्तव स्पष्टपणे समोर येते. सध्या देशभरातील सर्व उच्च न्यायालयांवर मिळून जे ६८८ न्यायाधीश आहेत त्यात फक्त ८० महिला आहेत. म्हणजे महिलांचे हे प्रमाण जेमतेम ११.६ टक्के आहे.

देशभरातील उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांमध्ये न्या. गीता मित्तल (जम्मू-काश्मीर व लडाख) या एकमेव महिला आहेत. म्हणजे मुख्य न्यायाधीशांमध्ये महिलांचे प्रमाण चार टक्के आहे. सर्वोच्च न्यायालयात ३२ पैकी दोन म्हणजे हे प्रमाण अगदीच नगण्य म्हणजे ६.२ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने व किंबहुना काकणभर सरस कामगिरी करण्याची जिद्द बाळगणाºया सध्याच्या मुलींसाठी अल्पसंख्येने असलेल्या या वरिष्ठ महिला न्यायाधीश स्फूर्तिस्थाने आहेत. त्यातही न्या. भानुमती यांचे करिअर विशेष लक्षणीय आहे. त्याचे आणखीही एक कारण आहे.

उच्च न्यायालयातील महिला न्यायाधीशांपैकी ४९१ वकिलांमधून व १९८ जिल्हा न्यायाधीशांमधून नेमलेल्या आहेत. म्हणजेच एकूणच न्यायाधीश निवडीत जिल्हा न्यायाधीशांहून वकिलांना नेहमीच जास्त वाव असतो. त्यातही महिला असूनही जिल्हा न्यायाधीशांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत मजल मारणे हे स्पृहणीय ठरते. शुक्रवारी त्यांचा न्यायालयीन कामकाजाचा अखेरचा दिवस होता. त्या दिवशी संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयातील वकील संघटनेने त्यांच्यासाठी हृद्य निरोप समारंभ (व्हर्च्युअल) आयोजित केला. त्यावेळी न्या. भानुमती यांनी मनमोकळेपणाने आपल्याविषयी जी माहिती दिली त्यावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होते.

न्या. भानुमती मूळच्या तमिळनाडूच्या. जन्म सामान्य कुटुंबातील. त्या दोन वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे अपघातात निधन झाले. न्या. भानुमती सांगतात की, न्यायालयीन दिरंगाई व किचकटपणाने अन्य लाखो पक्षकारांप्रमाणे माझे कुटुंबही पोळले गेले. न्यायालयाचा आदेश होऊनही वडिलांच्या अपघाती मृत्यूबद्दल एक पैसाही भरपाई मिळू शकली नाही. तरीही खचून न जाता न्या. भानुमती यांच्या आईने अपार कष्ट करून त्यांना व त्यांच्या दोन बहिणींना उत्तम शिक्षण दिले. आईच्याच प्रोत्साहनाने १९८८ मध्ये त्यांची जिल्हा न्यायाधीश परीक्षेत उच्च गुणवत्तेसह निवड झाली. तेव्हापासून आता सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त होईपर्यंत त्यांच्या करिअरचा आलेख कायम चढता राहिला. जिद्द, चिकाटी, सचोटी आणि दुर्दम्य आत्मविश्वास या जोरावर त्यांनी स्फूर्तिदायी करिअर उभे केले.

मृदू बोलणे, विनयशील स्वभाव व संयमित वृत्ती ही न्या. भानुमती यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रगल्भ बुद्धिमत्तेखेरीज अन्य लेणी आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सहापैकी चार वर्षे त्या तेथील एकमेव महिला न्यायाधीश होत्या. तरी त्यांनी वेगळा ठसा उमटविला. न्यायाधीशांची निवड करणाºया ‘कॉलेजियम’च्याही त्या पहिल्या व एकमेव महिला न्यायाधीश ठरल्या. महिलांची न्यायाधीश म्हणूनही भरारी संख्येने अल्प असली तरी अभिमानास्पद आहे. तरी देशाचे सरन्यायाधीशपद भूषविण्याचा मान महिलेला अद्याप मिळालेला नाही. उच्च न्यायालयातील सध्याच्या महिला न्यायाधीशांपैकी कर्नाटकच्या न्या. बी. व्ही. नागरत्ना यांची सर्वोच्च न्यायालयावर निवड होऊ शकते. त्याप्रमाणे रिक्त चारपैकी एका जागेवर त्यांची आताच नियुक्ती झाली, तर त्या भविष्यात आठ महिन्यांसाठी का होईना; पण देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होऊ शकतील, असे गणित जाणकार मांडतात.

खरंच तसे झाले तर दुहेरी व विरळा योग ठरेल. न्या. नागरत्ना या माजी सरन्यायाधीश न्या. ई. एस. व्यंकटरमय्या यांच्या कन्या आहेत. याआधी वडील व मुलगा सरन्यायाधीश झालेले आहेत. दोन वर्षांनी न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या रूपाने त्याची पुनरावृत्ती होणार आहे. न्या. नागरत्ना यांचे सरन्यायाधीश होणे हे त्याहून वेगळे व महिलांसाठी परमोच्च गौरवाचे ठरेल.

Web Title: Justice R. Bhanumati: 33 years of invigorating judicial career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.