काश्मीरमधील बहुभाषा संमेलनाचे औचित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 06:31 AM2019-04-10T06:31:47+5:302019-04-10T06:31:52+5:30

88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४, ५ एप्रिल २०१५ रोजी घुमान (पंजाब) येथे झाले.

Justification for Multilingual Convention in Kashmir | काश्मीरमधील बहुभाषा संमेलनाचे औचित्य

काश्मीरमधील बहुभाषा संमेलनाचे औचित्य

Next

88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४, ५ एप्रिल २०१५ रोजी घुमान (पंजाब) येथे झाले. त्या काळात ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त पंजाबी लेखक कवी स्व. गुरुदयाळ सिंग यांनी मराठी संमेलन पंजाबमध्ये होणे ही तर देश जोडण्याची पुन्हा सुरू झालेली प्रक्रिया आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हा देश अनेक भाषा, संस्कृती, तसेच जातीधर्मामध्ये विभागला गेला आहे़ त्याच्या विविधतेतील एकता हिच त्याची शक्ती आहे. म्हणूनच भाषा वाचविणे आणि भाषांचा समन्वय निर्माण करणे, ही भूमिका वेळोवेळी अनेक थोरामोठ्यांनी मांडली आहे. साने गुरुजींनी तर आंतरभारतीचे स्वप्न पाहिले होते तेही महाराष्टÑातून. त्यानंतरही गुलजार यांच्यापासून अनेक मान्यवरांनी बहुभाषा संमेलनाची कल्पना मांडली, त्यातूनच प्रतिवर्षी बहुभाषा संमेलन घेण्याचा निर्णय झाला. भाषा वाचवा याच्याऐवजी ती वाढवा, अशी भूमिका घेऊन भाषांचा परिघ अधिक विस्तारित नेण्याच्या उद्देशाने संस्थेकडून घुमान बहुभाषा संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.


मराठी भाषेचा पंजाबी आणि काश्मिरी भाषांच्या सहकार्याने भारतीय भाषांसाठी पुढाकार अशी या संमेलनाची संकल्पना आहे. प्रत्येकाने आपल्या भाषाचा अभिमान बाळगून इतर भाषांचा सन्मान केला पाहिजे. कारण आजही भारताला जोडणारी एकच अशी प्रभावी भाषा नाही. आपल्याला पुन्हा-पुन्हा इंग्रजीचाच आधार घ्यावा लागतो. या पार्श्वभूमीवर इंग्रजीला विरोध न करता, भारतीय भाषांची जोडणी होणे मात्र आवश्यक आहे. या भावनेतून यंदाचे संमेलन निसर्गाने लटलेल्या कवी, लेखक आणि कलाकारांना नेहमीच भुरळ घालणाऱ्या काश्मीरमध्ये होत आहे.


पहिले घुमान बहुभाषा संमेलन पंजाबमध्ये झाले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. ‘कधी-कधी छोट्या वनस्पतीला टिकविण्यासाठी संपूर्ण जंगल टिकण्याची आवश्यकता असते.’ ही भूमिका भाषातज्ज्ञ डॉ.गणेश देवी मांडत असतात. त्यांनी २०१० साली ‘भाषासंगम’ या नावाने अशाच धर्तीवर एक संमेलन बडोदा येथे घेतले होते़ भाषा टिकल्या तरच देशही सामर्थ्यवान, हाच विचार या संमेलनामागचाही असल्यामुळे भाषांच्या संदर्भात भरीव काम ज्या डॉ.गणेश देवी यांनी केले आहे, त्यांनाच या संमेलनाचे अध्यक्ष होण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली. त्यांच्याच नेतृत्वाखाली ही वारी पुढे निघाली आहे. आता पुढचे संमेलन काश्मीरमध्ये होत आहे. ज्या काश्मीरने कधी काळी भारताचे बौद्धिक नेतृत्व केले होते, तो आज मात्र दहशतवादाने होरपळत आहे. अशा काळात सरहद संस्थेने हे बहुभाषा संमेलन काश्मीरमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ साहित्यिक राजन खान, प्रशांत तळणीकर, संजय सोनवणी, नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते अरुण नेवासकर, तसेच काश्मीरमधील अनेक महत्त्वाच्या साहित्यिकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.


ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. सत्यव्रत शास्त्री, प्रोफेसर रहमान राही, तसेच पद्मश्री सुरजित पाथर, नसीम शफाई यासारखे अनेक साहित्यिक, महत्त्वाचे प्रकाशक आणि नामवंत कवी, तसेच कलावंत या संमेलनात सहभागी होणार आहेत. जम्मू-काश्मीर कल्चरल अकादमी आणि सांस्कृतिक परिषद यांसारख्या संस्थांनाही यात निमंत्रित केले आहे. विविध भाषांतील ३०० ते ४०० लोक यात सहभागी होतील. डॉ. गणेश देवी, तसेच प्राणकिशोर कौल यांच्या मार्गदर्शनासाठी या काश्मीरमधील संमेलनाचे नियोजन सुरू आहे. काश्मीरमध्ये पर्यटकही जात नसताना अथवा दररोज हिंसाचाराच्या घटना घडत असताना या संमेलनाचे प्रयोजन काय, असाही प्रश्न विचारला गेला. यापूर्वीही दोन वेळा येथील हिंसाचाराच्या घटनांमुळे हे संमेलन रद्द करण्यात आले होते. मात्र, महाराष्टÑातून आलेल्या लेखक आणि साहित्यिकांनी व्यक्त केली. म्हणूनच या देशाच्या भाषिक ऐक्याची चळवळ आपण विद्येची देवता असे जिचे वर्णन करतो, त्या सरस्वती शारदापीठापासून संस्कृत भाषेचे व्याकरणकार पाणिनी ऋषी, इतिहासकार पंडित कल्हण, तसेच आचार्य अभिनव गुप्त यांच्यामार्फत, संत कवयित्री कल्लेश्वरी, हब्बा खातून आणि गुलाम सय्यद अहमद महजून हे मोतीलाल साकी आणि दिनानाथ साकी यांच्यापर्यंत, काश्मीरची स्वत:ची मोठी अशी साहित्यिक आणि भाषिक परंपरा आहे, जी ऋषिमुनींची आणि पार्वतीची भूमी आहे, असा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतो, त्या काश्मीरमध्ये हे बहुभाषा संमेलन होणे म्हणजे, महाराष्टÑ आणि काश्मीरच्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा मिळण्यासारखेच आहे.
फाळणीच्या काळात देश धार्मिक विद्वेषामध्ये जळत असताना, काश्मीर खोऱ्यात मात्र एकही दंगल अथवा हत्याकांड झाले नाही. तेव्हा महात्मा गांधीना अंधारामध्ये आशेचा किरण केवळ काश्मीरमध्येच दिसत होता. दुर्दैवाने भविष्यात शत्रूच्या डावपेचांना यश मिळाले आणि याच काश्मीर दहशवादाच्या गर्तेत सापडले आहे. अशा काळात तेथील अंधार दूर करण्यासाठी देशभरातील विविध भाषांच्या लोकांनी तिथे यावे, काश्मिरी भाषा, तिचे उर्वरित भारताशी संबंध, काश्मीरच्या प्राचीन परंपरा याबरोबरच भारतीय भाषांच्या भवितव्यावर चर्चा व्हावी, हा संमेलनाचा उद्देश आहे. दारा शुकोह ज्या ठिकाणी विविध धर्म आणि विचारांच्या लोकांना बोलावून संवाद साधत असत, त्या परिमहलमध्ये काश्मिरी साहित्यिक आणि उर्वरित भारतातील साहित्यिकांचा संगम कदाचित काश्मीरमधील भविष्यातील शांततेत नांदी ठरावी, अशी आशा.

- संजय नहार,
संस्थापक अध्यक्ष सरहद.

Web Title: Justification for Multilingual Convention in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.