काँग्रेस, भाजपाची शक्तिपरीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:57 AM2017-07-29T02:57:55+5:302017-07-29T02:58:01+5:30
शतप्रतिशत या भाजपाच्या विस्तारवादी भूमिकेचा कस काँग्रेसचा गड बºयापैकी शाबूत असलेल्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यात होणाºया पालिका निवडणुकांमध्ये लागणार आहे.
शतप्रतिशत या भाजपाच्या विस्तारवादी भूमिकेचा कस काँग्रेसचा गड बºयापैकी शाबूत असलेल्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यात होणाºया पालिका निवडणुकांमध्ये लागणार आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मोदी लाटेत नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात भाजपाने काँग्रेसला धक्का दिला असला तरी काँग्रेसने निम्म्या जागा टिकवून ठेवल्या होत्या. त्यानंतर झालेल्या शहादा पालिका निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भाजपाचे मोतीलाल पाटील निवडून आले असले तरी सभागृहात काँग्रेसचे वर्चस्व आहे. मुळात पाटील हे मूळ काँग्रेसी असून निवडणुकीपूर्वी ते भाजपामध्ये दाखल झाले आहेत. ही पार्श्वभूमी पाहता काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना ही निवडणूक एक आव्हान ठरणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर आणि तळोदा तर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या चार पालिकांसाठी नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार असून प्रभागरचना व आरक्षण सोडत ही प्रक्रिया आटोपली आहे. चारही शहरांमध्ये निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. चारही पालिका काँग्रेस वा काँग्रेसशी संबंधित मंडळींच्या ताब्यात आहेत.
सात प्रमुख नेत्यांभोवती ही निवडणूक केंद्रित राहणार आहे. त्यात रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित, आमदार उदेसिंग पाडवी हे भाजपाचे तर काँग्रेसचे माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख, सुरुपसिंग नाईक, अॅड.पद्माकर वळवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा समावेश आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राजकीय पक्ष आणि स्थानिक आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जातात. परंतु अलीकडे भाजपाने ‘शतप्रतिशत’चा नारा दिल्याने येनकेनप्रकारेण भाजपाचा झेंडा लावण्यासाठी नेत्यांची व्यूहरचना सुरू झाली आहे. जयकुमार रावल यांच्यावर निवडणुकीची धुरा आहे. नंदुरबार जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आणि शिंदखेडा हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. शिंदखेड्यातील विद्यमान सत्ताधाºयांनी आता रावल यांच्याशी जुळवून घेतल्याने भाजपाला ते पथ्यावर पडले आहे. काँग्रेसचे हेमंत देशमुख आणि जिल्हाध्यक्ष श्याम सनेर या पारंपरिक स्पर्धकांशी त्यांचा याठिकाणी मुकाबला होईल. दोंडाईचातील पालिका देशमुखांच्या ताब्यातून हिरावल्याने रावल शिंदखेड्यात पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात आहेत. रावल यांना नंदुरबारमध्ये मात्र भाजपातील मतभेदांवर मात करीत यश मिळविण्याचे मोठे आव्हान आहे. राष्टÑवादीतून भाजपात आलेल्या डॉ.विजयकुमार गावित आणि कन्या डॉ.हिना गावित यांनी विधानसभा व लोकसभा निवडणूक जिंकली असली तरी निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना अद्याप स्वीकारलेले नाही. निष्ठावंत गटाचे नेतृत्व आमदार उदेसिंग पाडवी हे करीत असून भाजपा जिल्हाध्यक्ष निवडणूक, समन्वय समिती नियुक्तीवरून त्यांचे गावित पिता-पुत्रीशी खटके उडाले. शहादा पालिकेतील यशाच्या श्रेयावरुन गावित व पाडवी यांच्यात वाद झाले. गावित यांना मंत्रिपदाची अपेक्षा असून ते अद्याप न मिळाल्याने या निवडणुकीत ते कितपत सक्रिय राहतात, हा कळीचा मुद्दा आहे.
गावित यांचे बंधू राजेंद्रकुमार हे राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत तर शरद हे नवापूरचे माजी आमदार आहेत. त्यामुळे गावित यांनी निवडणुकीत अलिप्त राहण्याचे ठरविले तरी त्यांचे समर्थक राष्टÑवादीच्या माध्यमातून सक्रिय होऊ शकतात. रावल यातून कसा मार्ग काढतात, त्यावर यशापयश अवलंबून राहणार आहे. आमदार पाडवी यांच्या मतदारसंघातील तळोदा पालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्याठिकाणी काँग्रेसच्या गडाला धक्के देण्यात यश येते की, पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी मंत्री पद्माकर वळवी हे विधानसभेतील पराभवाचे उट्टे काढतात, यावर पुढील राजकारण अवलंबून राहील.
नंदुरबार आणि नवापूरमध्ये अनुक्रमे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे एकहाती वर्चस्व आहे. अर्थात सत्तांतराची पार्श्वभूमी आणि भाजपाची विस्तारवादी भूमिका लक्षात घेता यंदाची निवडणूक या दोन्ही नेत्यांना सोपी निश्चित नाही. थेट नगराध्यक्ष निवडणुकीमुळे बिगर आदिवासींना नेतृत्वाची संधी मिळणार असल्याने मोठी चुरस आतापासून जाणवू लागली आहे.
- मिलिंद कुलकर्णी