काजवे टिमटिमू लागले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2016 02:08 AM2016-06-04T02:08:05+5:302016-06-04T02:08:05+5:30

कुणाचेच कोणाखेरीज अडत नाही, राजकारणात तर नाहीच नाही हे सर्वकालिक सत्य असले तरी, क्षमता वा वकूब नसणारी मंडळी किंवा उंची नसणारी व्यक्तीही जेव्हा उंटाचा मुका घेऊ पाहाते;

Kajave started shimmer! | काजवे टिमटिमू लागले !

काजवे टिमटिमू लागले !

Next

कुणाचेच कोणाखेरीज अडत नाही, राजकारणात तर नाहीच नाही हे सर्वकालिक सत्य असले तरी, क्षमता वा वकूब नसणारी मंडळी किंवा उंची नसणारी व्यक्तीही जेव्हा उंटाचा मुका घेऊ पाहाते; तेव्हा काही प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहात नाहीत. कोर्ट-कचेऱ्यात अडकून तुरुंगातला मुक्काम वाढलेल्या भुजबळांना पर्याय देऊ पाहणाऱ्या मंडळींच्या बाबतीतही नाशिककरांच्या मनात असेच प्रश्न उपस्थित झाले असतील तर आश्चर्य वाटायला नको.
राष्ट्रवादीतील बडे प्रस्थ म्हणवणारे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ सध्या दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यासह अपसंपदेसारख्या अन्य आरोपांमुळे गजाआड आहेत. त्यांच्या जामिनाचे निर्णय होण्यापूर्वीच नित्य नवे गुन्हे दाखल होत असल्याने तुरुंगातील त्यांचा मुक्काम वाढत चालला आहे. त्यामुळे सुमारे दीड दशकांपासून त्यांचे एकछत्री मांडलिकत्व पत्करून असलेल्या नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यच्चयावत नेत्यांना आता पक्षाचे कसे व्हायचे, याबद्दलची चिंता तर सतावत आहेच; पण त्याचसोबत प्राप्त परिस्थितीचा लाभ उचलत आपले नेतृत्व पुढे रेटण्याची संधीही खुणावत आहे. त्याचदृष्टीने नाशकातील काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींची म्हणजे शरद पवार यांची भेट घेऊन चर्चाही केली आहे म्हणे. अर्थात, नाशिक महापालिकेसह जिल्हा परिषद आदि. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी वर्षभरावर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने तयारी चालविली आहे, मात्र भुजबळांच्या अटकेमुळे आलेले राष्ट्रवादीतले हबकलेपण दूर होऊ शकलेले नाही. पण, प्रश्न असा आहे की, या थिजलेपणातून पक्षाला बाहेर कुणी काढायचे?
नाशिक शहर व जिल्ह्याच्या पक्षकारणात भुजबळ काका-पुतण्याचे पूर्णपणे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व निर्माण करताना ‘जाणत्या राजा’चे खास म्हणवणारे माजी खासदार देवीदास पिंगळे असोत, की धाकली पाती अजित पवार यांचे विश्वासू समजले जाणारे माजी आमदार दिलीप बनकर; आदिंना असे काही बेदखल केले गेले की आजवर ते जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा डोके वर करू शकलेले नाहीत. भुजबळांना नामोहरम करण्यासाठी पक्षांतर्गत विरोधकांनी ‘ओबीसी-मराठा’ जात कारणाचा मुद्दा पुढे करण्याचा प्रयत्न केला तर ‘मराठा कार्ड’ चालवत भुजबळांनी साध्या महापालिकेच्या वॉर्डात पराभूत झालेल्या मराठा समर्थकासच आपल्या काखोटीला बांधत थेट विधान परिषदेत धाडले. परिणामी तोही मुद्दा निकाली निघाला. त्यामुळे भुजबळांना शह देऊ शकेल असे पर्यायी नेतृत्वच स्थानिक पातळीवर उभे होऊ शकले नाही, किंबहुना तसे ते उभे होऊ दिले गेले नाही. भुजबळ आज ‘मधे’ असल्याने पक्षाला नेतृत्वाची पोकळी भासते आहे, ती म्हणूनच. परंतु ही पोकळी भरून काढू शकेल असे नावच समोर नसल्याने खुद्द राष्ट्रवादीच्याच मर्यादा उघड होऊन गेल्या आहेत. परिस्थिती सापेक्षतेतून आज पक्षांतर्गत भुजबळविरोधी गट सक्रीय होऊ पाहात असला व त्यातील काहींनी पक्षाध्यक्षांची भेटही घेतली असली तरी त्या पर्यायांबाबत खुद्द पक्षानेही आश्वस्तता बाळगावी अशी स्थिती नाही. पिंगळेंसारख्या नेत्याचे पायच काय, अख्खा देह जिल्हा बँक, मार्केट कमिटी व नाशिक सहकारी साखर कारखान्यातील अनेकविध चौकशांमध्ये अडकला आहे. इतरांची नावे तरी काय घ्यायचीत, की ज्यांना लोकांनीच कोणत्या न कोणत्या स्तरावर मतदानाद्वारे बाद ठरविले आहे. शरद पवार व अजित पवार यांच्या मर्जीतले म्हणविण्यातच धन्यता मानणारे व त्यांच्या वलयामुळेच प्रकाशमान होणारे काही काजवे आज टिमटिमत असले तरी, त्यामागेही खुद्द पक्षश्रेष्ठींचा किंवा अन्य वरिष्ठांचाच काही संकेत तर नसावा ना; अशी शंका घेण्यास जागा आहे ती त्यामुळेच.
- किरण अग्रवाल

Web Title: Kajave started shimmer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.