काक्रापार : ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या वाटेवरील महत्त्वाचे पाऊल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:19 PM2020-07-23T23:19:56+5:302020-07-23T23:20:34+5:30

भारताने पीएचडब्ल्यूआर तंत्रज्ञानाची कास धरण्यामागे भारतीय आण्विक तंत्रज्ञानाचे जनक डॉ. होमी भाभा यांची दूरदृष्टी आहे.

Kakrapar: Important step on the path to energy self-sufficiency! | काक्रापार : ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या वाटेवरील महत्त्वाचे पाऊल!

काक्रापार : ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या वाटेवरील महत्त्वाचे पाऊल!

googlenewsNext

गुजरातमधील काक्रापार आण्विक ऊर्जा प्रकल्पातील तिसऱ्या अणुभट्टीने (केएपीपी-३) बुधवारी ‘क्रिटिकलिटी’ हा महत्त्वाचा टप्पा गाठला. पंतप्रधान, उपराष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री, तसेच विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या उपलब्धीचे तोंड भरून कौतुक केले आहे. अणुभट्टीमध्ये जेव्हा निरंतर अणुविखंडनाची प्रक्रिया नियंत्रित स्वरूपात सुरू होते, तेव्हा त्याला त्या अणुभट्टीने ‘क्रिटिकलिटी’ गाठली, असे म्हटले जाते. हा टप्पा गाठल्यानंतर काही दिवसांतच अणुभट्टीतून व्यापारी तत्त्वावर वीज उत्पादन सुरू होते.

भारतात सध्याच्या घडीला सात आण्विक ऊर्जा प्रकल्पांमध्ये एकूण २२ अणुभट्ट्या ६,७८० मेगावॅट विजेचे उत्पादन करीत आहेत. त्यामध्ये आता आणखी ७०० मेगावॅट विजेची भर पडेल. मग ‘केएपीपी-३’चे एवढे कोडकौतुक कशासाठी, हा प्रश्न स्वाभाविक वाटेल; पण काक्रापारमध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी जे यश प्राप्त केले, ते निश्चितच खूप कौतुकास्पद आहे. त्यामागचे सर्वांत मोठे कारण हे की, हे तंत्रज्ञान संपूर्णपणे स्वदेशात विकसित करण्यात आले आहे. दुसरे कारण हे की, ही भारताची आजवरची सर्वांत मोठी अणुभट्टी आहे. नाही म्हणायला तमिळनाडूतील कुडनकुलम आण्विक ऊर्जा प्रकल्पात एक हजार मेगावॅटच्या दोन अणुभट्ट्या आहेत. मात्र, त्या रशियाच्या साहाय्याने उभारण्यात आल्या आहेत.

भारतात उभारण्यात आलेल्या २२ पैकी तब्बल १९ अणुभट्ट्या नियंत्रित दाब जड पाणी अणुभट्टी (पीएचडब्ल्यूआर) प्रकारात मोडणाºया आहेत. सर्वप्रथम कॅनडाने हे तंत्रज्ञान भारताला दिले होते आणि त्या पहिल्या अणुभट्टीसाठी लागणारे जड पाणी (हेवी वॉटर) अमेरिकेने पुरविले होते. त्यानंतर भारताने स्वबळावर हे तंत्रज्ञान बरेच विकसित केले. ‘लाइट वॉटर’ अणुभट्ट्यांच्या तुलनेत ‘हेवी वॉटर’ अणुभट्ट्यांमुळे अण्वस्त्रांच्या प्रसारास चालना मिळत असल्याचे कारण पुढे करून अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणासाठी झटणाºया संस्था आणि विकसित देश पीएचडब्ल्यूआर तंत्रज्ञानास विरोध करतात. मात्र, भारताने जाणीवपूर्वक हे तंत्रज्ञान पुढे रेटले आहे.

भारताने पीएचडब्ल्यूआर तंत्रज्ञानाची कास धरण्यामागे भारतीय आण्विक तंत्रज्ञानाचे जनक डॉ. होमी भाभा यांची दूरदृष्टी आहे. देशाला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून डॉ. भाभा यांनी १९५० मध्ये भारताचा तीन चरणातील आण्विक
ऊर्जा कार्यक्रम आखला. भारतात जसे खनिज तेलाचे मोठे साठे नाहीत, तसेच आण्विक ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या युरेनिअमचेही मोठे साठे नाहीत. अशा स्थितीत देशाने उर्जेच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे तरी कसे? या प्रश्नाचे उत्तर डॉ. भाभा यांनी आखलेल्या आण्विक ऊर्जा कार्यक्रमात दडलेले आहे. भारतीय आण्विक ऊर्जा कार्यक्रम हा एकमेवाद्वितीय आहे. तो जगातील इतर कोणत्याही देशाच्या आण्विक ऊर्जा कार्यक्रमाप्रमाणे नाही.

युरेनिअमच्या जागतिक साठ्यांपैकी अवघा एक ते दोन टक्के साठा भारतात आहे. दुसरीकडे थोरिअमच्या एकूण जागतिक साठ्यापैकी मात्र तब्बल २५ टक्के साठा भारतात आहे. थोरिअम हेदेखील युरेनिअमप्रमाणेच किरणोत्सर्गी मूलद्रव्य आहे. मात्र, युरेनिअमप्रमाणे थोरिअम अणुभट्ट्यांमध्ये थेट इंधन म्हणून वापरता येत नाही. त्यासाठी थोरिअमचे आधी युरेनिअम-२३३ या समस्थानिकामध्ये (आयसोटोप) रूपांतर करावे लागते.

ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन भारतातील युरेनिअमच्या मर्यादित साठ्याचा वापर करीत अंतत: थोरिअमचे युरेनिअम-२३३मध्ये रूपांतर करून त्यापासून ऊर्जा निर्मिती करता येईल, असा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम डॉ. भाभा यांनी आखला. त्यामध्ये पीएचडब्ल्यूआर तंत्रज्ञानाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. या प्रकारच्या अणुभट्ट्यांमध्ये युरेनिअम नैसर्गिक स्वरूपात वापरात येते. त्याच्या समृद्धीकरणाची (एनरिचमेंट) गरज नसते. युरेनिअमचे समृद्धीकरण हे एक महागडे प्रकरण आहे. शिवाय ‘लाइट वॉटर’ अणुभट्ट्यांच्या तुलनेत ‘हेवी वॉटर’ अणुभट्ट्यांमुळे प्रतिकिलो युरेनिअममागे अधिक ऊर्जा निर्मिती होते.

‘केएपीपी-३’चे यश आणखी एका दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. बहुचर्चित भारत-अमेरिका आण्विक करारानंतर वेस्टिंगहाऊस ही अमेरिकन अणुभट्टी उत्पादक कंपनी दक्षिण भारतात ‘एपी १०००’ प्रकारच्या सहा अणुभट्ट्या उभारणार होती. मात्र, ती कंपनीच दिवाळखोरीत निघाली आहे. त्याशिवाय जीई-हिताची आणि अरेवा या विदेशी कंपन्यांसोबतही भारतात अणुभट्ट्या उभारण्यासंदर्भात वाटाघाटी सुरू होत्या; परंतु त्या कंपन्याही आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे सगळेच मुसळ केरात गेले आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय शास्त्रज्ञांनी काक्रापारमध्ये स्वबळावर जे यश मिळविले आहे, ते खूप महत्त्वाचे आहे. जे देश ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहेत, त्यांनीच विकास साधला आहे आणि जगाच्या जडणघडणीवर प्रभाव टाकला आहे. भारताला महासत्ता म्हणून उदयास येण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करायची असल्यास ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावेच लागेल. ‘केएपीपी-३’ हे त्या वाटेवरील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे!

Web Title: Kakrapar: Important step on the path to energy self-sufficiency!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Gujaratगुजरात