सर्वेक्षणानंतर कल्लोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:31 PM2018-10-12T13:31:14+5:302018-10-12T13:32:40+5:30
कामगिरीचे एका संस्थेकडून सर्वेक्षण
मिलिंद कुलकर्णी
भारतीय जनता पार्टीने महाराष्टÑातील लोकसभेच्या ४८ तर विधानसभेच्या २८८ मतदारसंघाचे तसेच स्वत:च्या खासदार आणि आमदारांच्या कामगिरीचे एका संस्थेकडून सर्वेक्षण करवून घेतले आणि त्याचा अहवाल बंद लिफाफ्यात संबंधित लोकप्रतिनिधीच्या हाती दिला. बंद खोलीतील बैठक, त्यात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी दिलेली कथित तंबी वा मार्गदर्शन, सूचना आणि बंद लिफाफ्यातील अहवाल असे सगळे असूनही चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगली आणि हलकल्लोळ माजला.
प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या चर्चेनुसार धुळ्याचे खासदार आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या स्रुषा रक्षा खडसे यांच्यासह सहा खासदार आणि १२१ आमदारांपैकी ३० टक्के आमदारांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. ही दोन्ही नावे मातब्बरांची असल्याने राजकीय वर्तुळात विशेषत: भाजपामध्ये खळबळ उडणे स्वाभाविक होते. डॉ.सुभाष भामरे हे धुळ्यातील प्रसिध्द वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. वडील रामराव पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, तर आई गोजरताई या आमदार होत्या. शिवसेनेकडून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक त्यांनी लढविली होती. प्रतापराव सोनवणे या विद्यमान खासदारांऐवजी डॉ.भामरे यांना भाजपामध्ये आणून २०१४ मध्ये तिकिट देण्यात आले. अमरीशभाई पटेल या कॉंग्रेसच्या माजी मंत्र्याचा पराभव करीत ते लोकसभेत पोहोचले. स्वच्छ प्रतिमा, मृदू स्वभाव, कष्टाळू वृत्ती असल्याने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले. धुळे-मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग, सुलवाडे-जामफळ पाणीयोजना आणि पाकिस्तानच्या सीमेत चुकून गेलेला लष्करी जवान चंदू याची सुटका अशा महत्त्वाच्या बाबींमध्ये डॉ.भामरे यांचे योगदान आहे. परंतु लोकप्रिय नेता, मास लीडर अशी त्यांची प्रतिमा नाही. राजकारणातील छक्के पंजे खेळून सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याइतके राजकीय चातुर्य त्यांच्यात नाही, हे वास्तव आहे. पण त्यांची कामगिरी इतकी खराब नाही, जेवढी सर्वेक्षणात सांगितली जात आहे. त्यामुळे हा भामरे समर्थकांना धक्का आहे. कामगिरी खराब असती तर त्यांना मोदी आणि शहा यांनी मंत्रिमंडळात कायम ठेवले नसते, हा मुद्दाही त्यांच्या समर्थकांकडून मांडला जात आहे.
दुसरीकडे खडसे यांच्या पाठीमागे आरोप आणि वावड्यांचा ससेमिरा कायम आहे. त्यात सर्वेक्षणाची भर पडली. अखेर खडसे यांनी त्यांच्या गावी मुक्ताईनगरात पत्रकार परिषद घेऊन सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर केले. यासाठी पक्षनेतृत्वाकडून परवानगी घेतल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. खासदार रक्षा खडसे यांना ५६ तर स्वत: खडसे यांना ५१ टक्के मतदारांची पसंती असल्याचा दावा त्यांनी केला.
भामरे यांचे मंत्रिमंडळात कायम असलेले स्थान आणि खडसे यांची पत्रकार परिषद पाहता सर्वेक्षणाच्या बाहेर आलेल्या बातम्यांमधील तथ्याविषयी शंका घ्यायला जागा आहे.
स्वकीय लोकप्रतिनिधींना निवडणुकीच्यादृष्टीने सजग आणि सतर्क करण्यासाठी भाजपाने सर्वेक्षण केले असेल आणि त्यात काही त्रूटी, सुधारण्याची संधी त्यांना लक्षात आणून दिली असेल. पण त्यातून वावड्या उठल्याने हलकल्लोळ माजला, असेच चित्र आतातरी दिसत आहे.