कल्पवृक्षाची पालवी : डॉ़ अरुणा ढेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 08:16 AM2019-01-11T08:16:04+5:302019-01-11T08:16:45+5:30
92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ़ अरुणा ढेरे या लोकसंस्कृतीचे कल्पवृक्ष म्हणजे डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या सावलीत वाढल्या आहेत.
प्रा़ डॉ़ प्रकाश खांडगे
92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ़ अरुणा ढेरे या लोकसंस्कृतीचे कल्पवृक्ष म्हणजे डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या सावलीत वाढल्या आहेत. मोठ्या वृक्षाच्या सावलीतील झुडुपं मोठी होत नाहीत़ खुरटली जातात या निसर्गनियमाला अरुणा ढेरे अपवाद आहेत़ त्या कल्पवृक्षाखाली सदैव बहरत राहिल्या किंबहुना संशोधनासोबतच त्यांना लालित्याची पालवी फुटली़ त्यांच्या ललित लेखनाला संशोधनाची बैठक आहे म्हणूनच ते अधिक तेजाळून निघाले.़ नंदादीपाच्या एखाद्या मोठ्या झालेल्या तेजस्वी दीपपाकळीसारखे पावसानंतरचं ऊन, उर्वशी, कृष्ण किनारा यासारख्या ललित लेखनात, मंत्राक्षरसारख्या कवितासंग्रहात त्या सातत्याने रामायण, महाभारत, पुराणे यांच्यातील व्यक्तिरेखा, आदिमतत्त्वातले गहन गूढ, प्रेमाचे विविधरंग, निसर्ग आणि प्रेमाच्या शाश्वत भावनेतले सनातनत्त्व शोधत राहतात़
लोकसाहित्य-लोकसंस्कृती क्षेत्रातील त्यांचे चिंतन ‘अभिजन आणि लोक’मध्ये सातत्याने जाणवते़ १९७५ साली लोकसाहित्य संशोधन मंडळाच्या रूपाने डॉ़. प्रभाकर मांडे यांनी महाराष्टÑात एक चळवळ उभी केली़ तोपर्यंत लोकसाहित्याच्या अभ्यासाला सैद्घांतिक दिशा अभावानेच प्राप्त झाली होती़ या लोकसाहित्य संशोधन मंडळाच्या मार्गदर्शक होत्या प्रख्यात विदुषी डॉ़ दुर्गा भागवत़ पंढरीच्या वारीला वारकरी ज्या निष्ठेने जातात त्याच निष्ठेने, श्रद्घेने लोकसाहित्य-लोकसंस्कृती क्षेत्रातील अभ्यासक लोकसाहित्य संशोधन मंडळाने आयोजित केलेल्या लोकसाहित्य परिषदेला जातात़ डॉ़ प्रभाकर मांडे, डॉ़ रा.़चिं़ ढेरे, डॉ. गंगाधर मोरजे, डॉ़ तारा भवाळकर, डॉ़ मधुकर वाकोडे, विनायक खेडेकर, डॉ. अशोक रानडे अशी संशोधकांची मोठी मांदियाळी ऐंशीच्या दशकात तरुण अभ्यासकांना मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर असे़ त्या तरुण अभ्यासकांमध्ये डॉ़ अरुणा ढेरे, मी स्वत:, डॉ़ बाळासाहेब बळे, डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ़ हरिश्चंद्र थोरात, विनायक पडवळ, धोंडिराम वाडकर असे अनेक जण होतो़ डॉ़ अनिल सहस्रबुद्घेही मार्गदर्शन करीत. त्या वेळी अरुणा ढेरे या परिषदांमध्ये शोधनिबंध सादर करायच्या़ औरंगाबाद, जुन्नर, अंबड, सांगली, नगर, गोवा, श्रीगोंदा अशा अनेक ठिकाणी या परिषदा आयोजित झाल्या़ ज्येष्ठांच्या, वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे कान तयार झाले आणि मनदेखील लोकसाहित्य विचाराभोवती रुंजी घालू लागले़
लोकसंस्कृतीविषयक विचार मांडताना त्यातील साजरेगोजरे शोधून त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न अरुणा ढेरे यांनी कधी केला नाही़ लोकसंस्कृतीकडे पाहताना ‘सावध ऐका पुढल्या हाका’ अशी भूमिकाही त्या घेताना दिसत नाहीत़ परंपरेला त्या ‘झूल’ म्हणत नाहीत अथवा कालौघात नष्ट होऊ पाहणारी ‘हूल’ही म्हणत नाहीत़ लोकसंस्कृतीतील सारे श्रेयस आणि प्रेयस त्या शोधतात, आदिबंध शोधतात आणि हे करताना समकालीनत्वाशी त्याचे धागे जोडतात़ ‘भाष्य’, ‘चिंतन’ या संकल्पनांच्या भूलभुलैयात न पडता त्या पूर्वसुरींचे संदर्भ देत लोकसंस्कृतीची धार आणि काठ एका भावगर्भ ललित लेखिकेच्या नजरेने न्याहाळतात़
विविधता आणि लवचीकता यांच्या ताण्याबाण्यांमधून लोकसंस्कृती आकाराला येते, अशी अरुणा ढेरे यांची धारणा आहे़ परंपरेचा स्वभाव असा असतो की तिच्यात सर्व काही मिळून जाते, मिसळून जाते. नवे निर्माण झाले किंवा बाहेरून मिसळले तरी जुने नष्ट होत नाही़ त्यातले काही गळते, विरते, पण पुष्कळसे तसेच उरते़ त्यावर नव्याचे संस्कार होतात आणि ते काही अंशी बदलते़ म्हणून जुने, परिवर्तनातून आणि नव्याच्या मिसळणीतून निर्माण झालेले जुन्याचे बदलते रूप आणि नवे या तीनही अवस्थांमध्ये परंपरेत अनेक घटक उपस्थित असतात़ या परंपरांच्या रूपवैचियाने लोकसंस्कृतीला बहुरंगी आणि चैतन्यपूर्ण बनवले आहे़ लोकसंस्कृती हा लोकजीवनाचा पाया असल्याने इतिहासाची महत्त्वपूर्ण साधने लोकसंस्कृतीतूनच अभ्यासकांना उपलब्ध होत असतात़ लोकसंस्कृती ही विधायक आणि जीवनसंबंध अशी अव्याहत प्रक्रिया आहे़ आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात व्यक्तिकेंद्री समाजात समूहाची स्वतंत्र वैशिष्ट्ये झपाट्याने नष्ट होत आहेत़. चंगळवाद आणि बाजारपेठीय संस्कृती आपल्या सामूहिक शहाणपणालाच जणू आव्हान देत आहे़ लोकसंस्कृतीविषयी चिंतन करताना त्या म्हणतात, ‘बदलता काळ आणि बदलते जीवन’.
जीवनाचे बदलते स्वरूप हे त्याच्या सातत्यात आणि त्याच्या प्रवाही असण्यात अनुस्यूतच आहे़ किंबहुना परिवर्तन हा जीवनाचा स्वभाव आहे. काळानुसार लोकजीवन बदलत जाते़ पण बदलणे मात्र नैसर्गिकरीत्या घडत जाते. वर्तमानात मात्र जागतिकीकरणाच्या रेट्यात समूहांची स्वतंत्र वैशिष्ट्ये झपाट्याने नष्ट होत आहेत़ भाषा, पोषाख, खाद्यपदार्थ, वस्तू-वास्तू या संस्कृतीच्या बाह्य वैशिष्ट्यांचा लोप होतो आहे आणि एकाच प्रकारची बाजारपेठेच्या ताब्यात असलेली चंगळवादाने आंतरिकरीत्या भारलेली संस्कृती उदयाला येऊ पाहत आहे, असे अरुणा ढेरे यांचे सद्य:स्थितीवरील चिंतन आहे़ डॉ़ रा.़चिं. ढेरे यांचा समर्थ वारसा लाभलेल्या डॉ़ अरुणा ढेरे या कल्पवृक्षाची पालवी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही़
लोककला अभ्यासक